आमच्या शाळेच्या सोशल मीडियाच्या ग्रुप वर एका गर्भवती मैत्रिणीला दुसरीने विचारले , "तुला मुलगा हवा की मुलगी?" तिनं चटकन मनातले खरेखुरेे ..... "मुलगा" हे उत्तर दिले आणि सगळ्या जणी जणू तुटूनच पडल्या तिच्यावर. मुलगी किती छान असते... तीच कशी काळजी घेते मुले कशी विचारत नाहीत वगैरे... काही दिडशहाण्यांनी तर जणूकाही ती गर्भलिंग परीक्षाच करून आली आहे अश्या भाषेत तिला सुनावले. हीच मनोवृत्ती स्त्री भ्रूण हत्यांचे कारण असल्याचेही एक म्हणाली...मी थक्क होऊन तो सारा संवाद वाचत होते.गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मुलीच्या जन्माचे स्वागत, मुलगी होणे भाग्याचे, मुलगीच खरा आधार.... अश्या आशयाचे ढोल वाजवले जाताहेत. खरंतर मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं हा निसर्गधर्म आहे ... मुलीच्या जन्माला प्रोत्साहन वगैरे योग्य आहेच म्हणून मुलाच्या जन्माची अपेक्षा नकोच हा विचारही चुकीचा नव्हे का?आज मी जरा विरुद्ध बाजूचे विचार मांडणार आहे.
गेल्या काही दिवसांत स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या भयंकर निर्घृण कृत्यांची आठवण सुद्धा अंगावर काटा आणणारी आहे...निर्भया पासून काल परवाच्या जळीत कांडा पर्यंत... सगळ्याच घटनांमध्ये कुमारवयीन आणि कमी वयाची मुले गुन्हेगार आहेत. या अनुषंगाने एक आई म्हणून एक गोष्ट नक्कीच जाणवली की आता मुलगे अश्या घरात जन्माला यावेच जिथे आई त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवू शकेल... ज्या घरातला पिता मुलाला स्त्री चा आदर करायला शिकवेल..,अर्थात स्वतः च्या वागणुकीतून 👍 अलक्ष्मी ने उन्मत्त झालेले, पैसेवाल्यांचे माजोरडे बैल वेसण घालून बांधू शकतील असे भाऊ असणे, असे मित्र असणे ही येत्या पिढीची तीव्र गरज आहे. नुसता पैश्याला वारस नको तर संस्कारांचा, सद्विचारांचा वारसा घेऊन जन्माला येणारा मुलगा हवा.आजवर मुलीच्या आईची जी जबाबदारी होती ती शंभर पटीने आता मुलाच्या आईच्या खांद्यावर आहे... निर्व्यसनी, सुजाण, स्त्रियांचा आदर करणाऱ्या घरांमध्ये मुलगा जन्माला यायला हवा.... ज्या घरांत विपरीत परिस्थिती आहे तेथील आईने तर त्या मुलाला आपल्या वरचा अन्याय अत्याचार पुन्हा होऊ नये म्हणून विशेष दखल दिली पाहिजे.
वरील काही किंवा तत्सम घटनांमधील राक्षस सोडले ना तर मुलगा वाईट नसतो हो ! प्रत्येक बापाची लेक जशी राजकन्या असते ना तसा तोही एक राजपुत्र असतो...लाडाकोडात वाढलेला, करीयर , जबाबदारी ह्यांचे ओझे सतत डोक्यावर घेऊन जगणारा, सततच्या स्पर्धेत पिचून गेलेला.... जगभरातल्या आकर्षणाने भुलणारा... निसर्गधर्म म्हणून तिला असतात तश्या वयात येतांना अनेक अडचणी असणार त्यालाही. त्याने रडायचं नाही कारण तो कणखर व्हायला हवा.. बहिणींचा तो आधार त्याने सगळं सांभाळून घ्यायला हवं... सतत त्याला ,"आज तू विचारत नाहीस आम्हाला उद्या उतारवयात वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवशील" ह्या शब्दांत त्याला हिणवलं जातं. लग्नानंतर मुलीच्या अंगावर पडणाऱ्या जबाबदाऱ्यांचे ओझे ......आपण कित्ती कौतुक करतो त्यांचे👍 मुलाचे करतो कधी कौतुक??? तो तर जन्मजात जबाबदाऱ्यांचे ओझे घेऊनच येतो. मोठं व्हायचं ... कुणीतरी मोठ्ठ माणूस व्हायचं, खूप पैसे कमवून आईवडिलांना सुखात ठेवायचं... हा ताण इवलासा असल्यापासून झेलणारा तो जीव किती घुसमटून जात असेल. प्रत्येक नात्यांकडून त्याच्यावर येतात त्या अपेक्षा... आईवडील म्हातारे झाले की सांभाळायचे, बहीण सासरी गेली की तिचे सगळे नीट करायचे, धाकटा भाऊ असेल तर त्यालाही सांभाळून घ्यायचे.... त्यात दुसरे भावंड हुशार म्हणजे हा बेजबाबदार ठरणार.मुलेही आजकाल शिक्षणाच्या निमित्ताने दूरच्या गावांना किंवा परक्या देशांत जातात... तिथे जुळवून घेणं सासरी जाण्याइतकच अवघड आहे... जपान , चीन , आफ्रिका ह्या देशांमध्ये 2/3 महिन्यांच्या प्रोजेक्ट किंवा इंटर्नशीप साठी गेलेली 20/22 ववर्षांची मुले आईला फोन करून रडतात अक्षरशः... खाण्याचे प्रचंड हाल करून अर्धे होऊन परततात.त्यांचं हे शिक्षण नोकरीच्या निमित्ताने जाणं कधीकधी आयुष्यभराचं असतं... सासरी जाणंच नव्हे का एकप्रकारचं???
बरं ह्या सगळ्यांत 27 ते 30 वर्षे मित्रांसोबत चकाट्या पिटत स्वतंत्रपणे घालविल्या नंतर एक दिवस लग्न होऊन बायकोची जबाबदारी अंगावर पडते.स्त्री चा लग्नाआधी पिता तर लग्नानंतर नवरा कायदेशीर पालक असतो...आजवर मस्तमौला जगणाऱ्या त्याला अचानकपणे बंधनांत बांधले जाते. मुली आईवडिलांना सोडून सासरी जातात , जनरीतच आहे ती.. त्याची पूर्वतयारी मानसिक पातळीवर केल्या जाते... त्यांचे नवीन कुटुंबात सामावून जाणे, आईवडिलांना सोडून येणे ह्याचे खूप कौतुक होते... खचितच कौतुकास्पद आहेच ते👍 पण ह्याच वेळी त्याच्या आयुष्यातही आमूलाग्र बदल होत असतात... एक वेगळ्या स्वभावाची नवीन व्यक्ती आपली म्हणून सामावून घेणं सोपं नसतं.पुरुष म्हणून निसर्गानं देऊ केलेलं पुरुषत्व सिद्ध करण्याचे परफॉर्मन्स प्रेशर नक्कीच असते त्याच्यावर. त्यात नवीन पत्नीवर आपली छाप पाडायची, सासरी जरा सांभाळून टेचात राहायचं, त्यांनाही आपलं मानायचं ...त्यांचे वाढदिवस लग्न कार्य साजरे करायचे.... या साऱ्यात आई आणि पत्नी ह्या दोघींना सांभाळत त्यांचे मन जपायचे... अवघड .....तारेवरची कसरत आहे ही. मात्र ह्या साऱ्यांचा स्त्रियांना स्वतः चा उदोउदो करतांना विसरच पडतो.पुढे कधीतरी हाच अल्लड मुलगा ... एकदिवस बाबा होणार असल्याचे त्याला समजते. मुलीची आई होतांना तिच्या शरीरात निसर्ग सोयीने सारे बदल घडवत मातृत्व फुलवत असतो... मात्र मुलाचा बाप होतांना त्याच्यावर कोसळते ती नवीन जबाबदारी ..बाप म्हणून त्याला स्वतः ला घडवावं लागतं. आता आणिक एका इवल्या जीवाला सांभाळणं वाढवणं ....त्याला मोठं करत जातं.. सगळ्यांच्या शिक्षणाची, लग्नाची , भविष्याची तरतूद त्याला करायची असते... त्याचं डोकं अखंड हिशोब करणार कॅल्क्युलेटर बनत.... किती कविता आणि किती लेख त्याच्या ह्या ताणाची दखल घेतात??? आईपणाचा ताण खरेच मोठा पण बाप होतांना तो आपसूक असला तरी सहज सोप्पा मात्र नाहीच.
मुलगी म्हणजे नक्षत्र, देवाचं वरदान, पूर्वजन्मीचे पुण्य .....सारं मान्य पण मग मुलगा म्हणजे काय??? आपण आता ह्या प्रगत जाणिवांपर्यंत निश्चित पोहोचलो आहोत की मुलीचं काम/ क्षेत्र वेगळं आणि मुलांचं वेगळं असा भेद उरला नाहीये... आता घराघरांतून बाबा लोक झटपट होणारे पदार्थ करून आपले आणि घरच्यांचे पोट भरतात, बाहेर पडताच मुले बाबांच्या जवळ असताना दिसतात... मॉलमध्ये बघा, मुलांना क्लास ला सोडणं आणणं, कपडे मशिनला लावणं , भाज्या चिरून देणं वगैरे बरीचशी काम आनंदाने करतात👍 थोडक्यात संसार दोघांनी मिळून करायचा आहे ह्याची जाणीव असल्याचे दिसते.ज्या घरांत मुलगी नाही तिथे चटपटीत पणे पाने घेणे, वाढणे ,मागचं आवरणे ही कामे करून मुले आपल्या आईला मस्त मदत करतात.आईच्या आजारपणात ही कणखर मुले हळवी होतांना दिसतात..भर उन्हात कारचे टायर पंचर झाले की हीच मुले सगळ्यांना सावलीत बसवून भर उन्हात तापलेल्या गाडीचे टायर बदलतात.. मुलगी जन्मास येणं ही नशीबाची कृपा असेल तर मुले त्याच नशिबाचा आधार आहेत. एक पुरुष यशस्वी होतांना त्याच्या पाठीमागे एक स्त्री असते असे म्हणतात ... पण एक स्त्री यशस्वी होते तेव्हा तिला घडविणारे, स्वातंत्र्य, आधार देणारे, साथ देणारे अनेक पुरुष असतात. एखाद्या वडिलांनी तिला शिक्षणाची संधी दिली असते, एखाद्या भावानी अभ्यासात मदत केली असते, एखाद्या कलीगनी कामाला हातभार लावला असतो...एखाद्या नवऱ्याने सांभाळून घेतलेले असते.....स्त्री स्वयंपूर्ण आहे हाही अतिरेकच म्हणावा लागेल विचारांचा.... मुली हल्ली आईवडिलांचा सांभाळ करतांना दिसतात तेव्हा त्यांच्या नवऱ्याने सुद्धा मोलाची साथ दिलेली असते ,हे आवर्जून लक्षात घ्यायला हवे.म्हातारपणी वृद्धाश्रमात आईवडिलांना पाठविणारे मुलगे आहेत... असतील काही स्वार्थी पण त्याच वेळी स्वतःच्या आईवडिलांचे सारे व्यवस्थित करून आपल्या पत्नीच्या आईवडिलांना ही सांभाळणारी मुले आहेत ना!त्यांना विसरून कसे चालेल?? मुलगी सासरी जाते हा क्षण जितका अवघड आहे तितकाच कदाचित आपला आपला मुलगा करत वाढविलेला मुलगा, घर, संसार एका नवख्या मुलीच्या हवाली करणे आहे👍 सियाचीनला सारख्या ठिकाणी ज्या लष्करातील मुलांच्या बदल्या होत असतील त्या 20/22 वर्षांच्या मुलाच्या आईचे काळीज काय म्हणत असेल हो?? मुलाची आई होणेही सोप्पे नाही.. आयुष्याची बाजी लावून वाढविलेल्या मुलाला मातृभूमीसाठी पाठवणे केव्हढे महान आहे हे.
कुणालाही मुलगा असो वा मुलगी, त्यांना वाढवतांना आईवडील म्हणून फारसा फरक पडत नाही. आपण जन्माला येणाऱ्या बाळाकडे अपत्य म्हणून बघायला हवे,तसेच विकासाच्या, फुलण्याच्या सर्व संधी देऊन वाढवायला हवे. सध्या जिकडे तिकडे मुलीच्या आईचा गौरव होतांना दिसतो.. सोशल मीडियावर तिला महान म्हणून चितारलेलं असतं... मात्र मला सुजाण, सुयोग्य मुलांना घडविणारी आई जास्त श्रेष्ठ वाटते... मी स्वतः मुलीची आई आहे मात्र मुलाची आई देखील तितकेच किंवा बरेचदा अधिक त्याग करत असते. ती देखील तितक्याच आदराची हक्कदार निश्चित आहे.आपल्याकडे राजपुत्र जन्मलाय तर आपण अधिक नशीबवान आहात.. भविष्यातील एक अख्खे कुटुंब आपण घडविणार आहात... जिथे घरांतला पुरुष तंगड्या पसरून सोफ्यावर लोळत जागेवर पाणी मागणार नाही, जिथे स्वतः चे कपडे स्वतः धुणारा पुरुष असेल ,स्वतः तो पान वाढून जेवायला बसेल, जिथे स्त्रीचा ..तिच्या कष्टांचा आदर होईल, जिथे माणुसकी, स्वधर्म, स्वराष्ट जागे करता येईल.मुलांच्या आईंनो!....खरेच नशीबवान आहात तुम्ही ... तुमच्या राजपुत्राला तुम्हाला स्त्रियांचा आदर करणारा, त्यांना मनुष्य म्हणून वागविणारा, जाणीवपूर्वक घडवता येण्याची संधी मिळाली आहे... उद्याचा येणारा प्रत्येक दिवस, साराच समाज तुमच्या संस्कारांकडे डोळे लावून बसला आहे.
©🔏 यशश्री रहाळकर

Wa mast lihilays..👏👏👌🌹
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवाKhup chan mam
उत्तर द्याहटवाVery true
उत्तर द्याहटवायशु किती किती सुंदर लिहिलं आहेस.खूप भिडला लेख काळजाला... आभार....
उत्तर द्याहटवा