आज एका आगळ्या विवाह सोहळ्याचं साक्षीदार व्हायला मिळालं... वाजंत्री, सनई चौघडे,अक्षदा , जेवणावळी, विधी ,अत्तराचा घमघमाट , मुंडावळ्या बांधून सुरेख नटलेले नवरी नवरदेव .... आता तुम्ही म्हणाल यात काय आगळं ? सगळ्याच लग्नात हे आणि असच असतं ना! ... फरक फक्त एव्हढाच आहे की नवरदेव फक्त 64 वर्षांचा तर नवरी 59 वर्षांची ... दोघेही प्रथमवर हे विशेष... त्यातही 50 वर्षे एकमेकांवर अखंड केलेले आगळे प्रेम .💖💖
साधारणपणे 60 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ... पालखेडच्या पाटलांचा मोठा चौसोपी वाडा होता... जमीन जुमला, सोनं- नाणं , गुरेढोरे, गडी माणसे सारं सारं भरभरून होतं; पण पाटलीण बाई तरीही खूप खूप दुःखी असायच्या... गडी माणसांकडे दरवर्षी पाळणा हलायचा पण त्यांची कूस सुनीच होती.नवस सायास, गंडेदोरे पीरही झिजवून झाले... शेवटी लग्नाला 15 वर्षे झाल्यावर त्यांनी पाटलांना दुसऱ्या लग्नाची गळ घातली. पत्नीवर मनापासून प्रेम असणाऱ्या पाटलांना ही कल्पना मुळीच मान्य नव्हती .. शब्दाने शब्द वाढला .. रागारागाने पाटील घरातून निघाले ते थेट नदी किनाऱ्यावरील महादेवाच्या मंदिरात जाऊन बसले... तेथेच 4 वर्षांचा एक बालक त्यांना भेटला... कोण कुठचा काहीही त्याला सांगता येत नव्हते ... हरवला का कुणी आणून सोडला कोण जाणे?? मायाळू स्वभावाचे पाटील त्याला घरी घेऊन आले ... पत्नीला म्हणाले , " हा शंकराचा प्रसाद हाये.. आता ह्योच आपला लेक ... पुन्यानंदा दुसऱ्या लग्नाचा विषय काडलासा तर बगाच." त्या पोराचं नाव शिवा ठेवलं .. मोठ्या मायेनं दोघे त्याचा सांभाळ करू लागले.. त्याचा पायगुण होता का काय कुणास ठाऊक ? पाटलीण बाईंची कूस उजवली. नक्षत्रासारखी लेक जन्मली. शिवानेच तिचं नाव ठेवलं गौरी... तिच्या जन्माने शिवावरच्या प्रेमात जराशी वाढच झाली. आपली दोन्ही लेकरं शिकताहेत , जोडीनं मोठी होताहेत याचा त्यांना केव्हढा अभिमान होता.. शिवा आपला लेक नाही हे त्यांनी कधीही लपवले नाही मात्र शिवाच्या सगळ्या कागदपत्रांवर त्यांनी बाप म्हणून आपलं नाव जोडले...पण हे असे सारे निर्मळ नियतीला मान्य नसावे.
शिवा आणि गौरीचे जग एकमेकांत गुंतलेलं होतं... क्षणभरही दोघे एकमेकांशिवाय राहत नसत. शिवा कायम गौरीची पाठराखण करत अवतीभवती असायचा... तिच्या मस्तीखोर आणि हट्टी स्वभावाशी जुळवून घ्यायचा. तिच्या उपदव्यापांनी शिक्षा झालीच कधी तर तिच्या वाटचा मारही मुकाट खायचा. गौरी 10 वर्षांची असेल तेव्हाची गोष्ट... मामाच्या मुलीच्या लग्नाला पाटलीण बाई तिला सोबत नेणार होत्या. शिवाची नवव्या वर्गाची महत्वाची परीक्षा त्याला नेता येणार नव्हते. चार दिवस शिवा आणि गौरीनं रडून रडून घर डोक्यावर घेतलं... शिवाला सोडून गौरी जायला तयारच नव्हती... पाटील बाई वैतागून म्हणाल्या " गौराई उद्या लगीन झाल्यावर कसं हुनार... नवऱ्याच्या घरला जातांना शिवाला संग नेता यायचं न्हाई..." जरा विचार करून गौरी म्हणाली " तर मग मी शिवाशीच लगीन करीन."
सोप्यात पेपर वाचत बसलेले पाटील चमकलेच ...गौरी तशी लहान होती पण शिवा आता कळत्या वयात होता... त्याच क्षणी शिवाने ठरवलं लग्न करीन तर गौरीशीच. हळूहळू काळ जसजसा जाऊ लागला तसतसे शिव अन गौरी एकमेकांत गुंतून जाऊ लागले... सहवासाने झालेली मैत्री अन फुललेले प्रेम वाढतच गेले...दोघेही कागदोपत्री बहिणभाऊ असले तरी प्रत्यक्षात कुणीही नव्हते. शिवाचे 12 वी पर्यंतचे शिक्षण जाऊन येऊन तालुक्याला झाले .. तो अभ्यासात तल्लख होता ..
पाटलांच्या मनाने वेगळेच घेतले . शहरात त्याची राहण्याची व्यवस्था केली त्याच दिवशी त्याच्याकडून वचन घेतलं पुन्हा कधीही परतून त्यांच्या घरी येणार नाही... आपला इतक्या प्रेमानं सांभाळ केलेल्या पित्याला त्यानी सहज ते वचन देऊन टाकले. त्याची वर्षातून एकदा भेट घेऊन त्याचा राहण्याचा व इतर सर्व खर्च ते देत असत. मात्र घरी चल असे कधीही म्हणाले नाही. इकडे गौरीकडून वचन घेतले की ती कधीही नागपूरला जाणार नाही ... तिथेच शिवा शिकायला होता. त्या दोघांना ही न दुखावता पाटलांनी त्यांची ताटातूट घडवून आणली. मानलेल्या का असेना; आपल्याच दोन लेकरांनी लग्न करणे त्यांना मान्य होत नव्हते...
पाटलांनी गौरीच्या लग्नाची मोहीम जोरात हाती घेतली.शिवा आणि गौरी थोड्याच काळात काय ते समजून चुकले..गौरीने शिवाला अखेरचे पत्र पाठवले आणि सांगितले ," मला विसरून जा. लग्न कर सुखात रहा. माझे कुणाशीही लग्न झाले तरी हृदयात तूच असशील." शिवाने लग्नाचा विचार मनातून काढून टाकला... स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित केले.पदवी पर्यंतचे शिक्षण त्याने पाटलांची मदत स्वीकारत घेतले पुढे नम्रतेनं त्यांची मदत नाकारून तो लहान मोठ्या नोकऱ्या मिळेल ती कामे करू लागला. त्याच्या मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन तो कलेक्टर बनला. ही आनंदाची बातमी पाटलांना धावत जाऊन द्यावी असे त्याला वाटले पण आपले वचन स्मरून त्याने मन आवरते घेतले. 4 ओळींची बोटभर तार करून त्याने पालखेडशी कायमचा संपर्क तोडला.
इकडे गौरीचे आयुष्य खडतर योगायोगाने भरलेले होते. तिच्या पत्रिकेत असणाऱ्या कुठल्याश्या वाईट योगांमुळे तिचे लग्न जुळता जुळेना. पाटलांनी खूप प्रयत्न केले पण योग नव्हता हेच खरे... एक स्थळ त्यांनी जमवून आणले तर दोनच दिवसांत साप चावल्याचे निमित्त होत तो मुलगा गेला... 😢 एक स्थळ तर सुपारी फोडूनच पाठवले त्यांनी ;त्याची गाडी घाटात उलटून तो गेला.. सोन्यासारख्या पोरीवर ठप्पा बसला.कोणीही तिच्याशी लग्नाला तयार नव्हते,पंचक्रोशीत चर्चा झाली.तिचे वय 30 चे वर उलटले .. काळजीने खंगुन एके दिवशी पाटलीण बाईंनी राम म्हटले. उतारवयात झालेल्या पोरीचे आपल्या पश्चात काय होणार? या काळजीने पोखरून पाटीलही इहलोकीची यात्रा संपवते झाले... गौरी एकाकी पडली. गडगंज संपत्तीची मालकीण पण आपले म्हणावे असे कोणी नाही...अनाथ, टाकून दिलेल्या, निराधार बालकांना तिने आपलेसे केले... वाड्याचे रूपांतर मोठ्या आश्रमशाळेत केले... हळूहळू कार्याविस्तार होत गेला आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून तिने मोठ्ठा नावलौकिक मिळविला.
12 जानेवारी 2020 ला जिजाऊंच्या जन्मदिनी तिचा "उपेक्षितांची माता' म्हणून मोठा सन्मान होणार होता.. ती सत्कार स्वीकारायला गेली आणि भोवळ येऊन कोसळली. तिचा सत्कार माजी जिल्हाधिकारी शिवा पाटील ह्यांच्या हस्ते होता. कित्येक वर्षांचा विरह तरीही मनातील प्रेम जसेच्या तसे ताजे होते. आता त्या प्रेमाच्या आयुष्यात आपल्याला स्थान आहे की नाही दोघेही संभ्रमात पडले. शिवाने तिची सारी माहिती काढली.. एक दिवस धीर करून तिला भेटायला बोलावले... कित्येक तास दोघे त्याच्या बंगल्यावर गप्पा मारत होते .. काळाची वर्षे जणू मध्ये नसावी असे. ती जायला निघाली तेव्हा शिवाने तिला राहिलेले आयुष्य माझ्या सोबत घालविणार का ? म्हणून विचारले. "आता ह्या वयात लोक काय म्हणतील?" गौरीने विचारले. शिवाने जरासा विचार करत हसत हसत उत्तर दिले "आपण लग्न करूयात.. मस्त धुमधडाक्यात" अश्या प्रकारे 14 फेब्रुवारी 2020 प्रेमादिनाला 50 वर्षे दुरावा सहन केलेलं हे प्रेमी युगुल एक झालं. दोघांनीही आपली वचने कायम पाळली ... शिवा कधीही पाटलांच्या घरी आणि गौरी कधीही नागपूरला गेलेच नाही ..😊👍

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!