फॉलोअर

रविवार, २२ मार्च, २०२०

तिचा काळा बॉयफ्रेंड

फार काही रसाळ वर्णने असावीत अशी ही कथा नाही किंवा फारच भयंकर काही घडले असाही भाग नाही... अजूनही आपण भारतीय लोक रंगांच्या बाबतीत फारच आग्रही असतो.. म्हणजे तसे वागतांना दाखवतो की "रंगाने कुठे काय फरक पडतोय?" पण प्रत्यक्षात प्रत्येकाच्या मनात मात्र गोरी गोरी पान व्यक्तीच जोडीदार म्हणून असते... मग मुलांनाच का नावे ठेवा? मुलींनाही गोराच नवरा हवा असतो.. आणि बाळ होणार आहे अश्या प्रत्येक गर्भवतीला गोरेपान बाळच हवं असतं.. 80% गर्भवतींचे प्रश्न असतात ,"बाळ गोरे होण्यासाठी काय खावे?" मग केशर घातलेल्या दुधाचा बळेच मारा सुरू होतो. गंमत म्हणजे ह्या सगळ्या वातावरणात त्यांचं प्रेम जुळलं ... दोघांमध्ये पौर्णिमा आणि अमावस्या इतका रंगांचा फरक होता. 
                    
गौरी गोखले माझी रुममेट... गौरी नावाप्रमाणे गोरीपान... दुधाळ वर्णाची , घारे डोळे .. सुखवस्तू घरातील मुली असतात तशी जराशी स्थूल प्रकृती ... बाकी नाकात मार खाल्लेला... अंमळ अपरं नाक आणि गोल चेहरा. चेहऱ्यावर मोहक गोडवा. गौरी दिसायला गोड होतीच पण पाहता क्षणीच जाणवायचा तो तिचा गोरापान रंग... तिच्यापुढे आम्ही सगळ्या आम्हालाच काळ्या ठिक्कर वाटत असू.... प्रत्यक्षात आम्हीही बऱ्याच उजळ असलो तरीही. आम्ही चार मैत्रिणी जवळपास 3 वर्षे एकाच रूम मध्ये राहत होतो. गौरीच्या घरचे सगळे तसेच धप्प गोरेपान... काळा रंग औषधालाही नव्हता .आम्हाला तिच्या रंगाचं कोण कौतुक!  "हा रंग गौरीला शोभून दिसेल... तिला काय सगळेच रंग शोभतात ना!" असा साधारण संवाद असायचा.  गौरी मात्र बेफिकीर होती... ना तिला त्या रंगाचं भूषण होतं ना काळजी... कध्धी म्हणून उन्हात स्कार्फ बांधला नाही की सनस्क्रीन लावली नाही. म्हणतात ना भरभरून एखादी गोष्ट देवाने दिली की त्याची मुळीच किंमत उरत नाही तसं काहीसं गौरीचं झालं होतं.

गौरी बरेचदा लपून छपून तिच्या मित्राला भेटायला जायची. आमच्यासाठी हे एक ओपन सिक्रेट होतं. रात्री तासनतास त्याच्याशी फोनवर गप्पा मारायची. विशेषतः अभ्यास करतांना डुलकी येऊ लागली की फोन ठरलेला. तिचा मित्र पुण्याला कुठल्याश्या कॉलेजला इंजिनिअरिंग करत होता... हिच्यासाठी मात्र तो कायम available असायचा. महिन्यातून 3/4 वेळ तरी तो खास तिला भेटायला म्हणून औरंगाबादला यायचा. आम्ही लॉ कॉलेजच्या गर्ल्स होस्टेलवर ... नियम कडक .. त्याला थेट भेटता येत नसे.. मात्र ही काहीतरी कामे काढून बाहेर पडायची आणि ते दोघे भेटत असत. एकदा मी उत्सुकतेने विचारलं...

" गौरी नाव काय ग तुझ्या मित्राचं?"

"तो काही मित्र नाहीये नुसता.. माझा बॉयफ्रेंड आहे. कृष्णा ढोकणे नाव त्याचं... आमचं सातवीत असल्यापासूनच प्रेम आहे एकमेकांवर."

गौरी लाजत माहिती देत होती.
गौरीसारख्या सुंदर मुलीला बॉयफ्रेंड असणारच ना!... असा आम्हा बावळ्यांचा विचार होता . आम्हाला कुणालाच साधा मित्रही नव्हता... वर्गांत मुली वेगळ्या, मुलं वेगळी बसत. साधं कुणी कुणाला ओळख दाखवत नसे की स्माईल देत नसे... या साऱ्यात गौरीचं प्रकरण फार भारी वाटायचं. तो भेटून गेला की गौरी खूप खुश असायची ..... मस्त रोमँटिक गाणी गुणगुणायची. तो आवर्जून एखादी छोटीशी भेट तिला आणायचा.. फार महागडी नाही पण पाहताच आवडावी अशी सुरेख... कधी बांगडी, कधी कानातले , कधी अंगठी. आणि प्रत्येक वेळी एक सुरेख प्रेमपत्र गुलाबी सेंटेड पेपरवर जांभळ्या शाईने लिहिलेलं... त्याच अक्षर पाहूनच गौरी प्रेमात पडली असावी... इतकं सुरेख...  कागदभर अक्षरे नाचायची जणू. हळूहळू गौरीचा आम्हा मैत्रिणींवर विश्वास बसल्यावर तिने ती प्रेमपत्रे दाखवण्यास सुरुवात केली. मजकूर टिपिकल असायचा... तिची किती आठवण येते असे काही ,कधी प्रेमकविता तर कधी आयुष्यभर साथ दे वगैरे मजकूर असायचा. मात्र पत्रातून तो प्रामाणिक वाटायचा... तो गौरीत चांगलाच गुंतला असावा.

"तू नाही कधी पत्र लिहीत गौरी?"

"नाही ग ! एकतर मला त्याच्यासारखं काही लिहिताच येत नाही आणि माझं अक्षर पाहून तो सोडून देईल ना मला !"

म्हणत गौरी खो खो हसत सुटली. गौरी त्याला कधी गिफ्ट देत नसे , ना ग्रीटिंग ,ना लव्हलेटर .....  गौरी त्याच्या बाबतीत बेफिकीर असायची... दर वेळी कोणत्या नवीन ठिकाणी हे भेटायचे कोण जाणे? जवळपास दोन वर्षांनी आम्हाला कृष्णा ढोकणेला भेटण्याचा योग आला. म्हणजे आम्हीच तो आणला... दोन वर्षे गौरीकडून त्याच्याविषयी ऐकून ऐकून आमची उत्सुकता कमालीची वाढली होती. गौरीचा चार दिवस पिच्छा पुरवल्यावर ती आम्हाला बरोबर घेऊन त्याला भेटायला गेली. एका गार्डनमध्ये आम्ही भेटलो.. गौरीने आम्हा तिघींची ओळख करून दिली..  ... आणि घोर निराशा.. कृष्णा नावाप्रमाणेच होता अगदी. व्यवस्थित नीटनेटका जंटलमन वाटावा असा असला तरी.. पाहता क्षणी जाणवायचा तो त्याचा काळाभोर रंग... येथे काळेपणाची मर्यादा संपते असला काळा. आमची घोर निराशा झाली... चांगलं कलरफुल आयुष्य गौरीने black आणि white करून टाकल्याचं मनस्वी वाईट आम्हाला वाटलं.

रूमवर परतल्यानंतर आम्ही गौरीला झाप-झाप झापलं. मुळात आमचा आक्षेप त्याच्या रंगावर होताच पण तो न दाखविता आम्ही इतर मुद्दे पुढे केले... "ढोकणे" हे काय आडनाव आहे?? गौरीला अज्जिबात शोभणार नाही .. मग जात आठवली.. एकीने तर स्पष्ट सुनावले..

"गौरी त्याच्याकड खूप पैसे असतील ना ! इतकी वेडी झालीस का पैश्यासाठी?"

"नाही ग तो गरीब घरचा आहे . पार्ट टाइम नोकरी करून शिक्षण घेतो."

"अरे देवा! मग पहिलंस तरी काय तू त्याच्यात?? पैसेवाला असता तरी एकवेळ समजू शकलो असतो."

आमचं निलाजरी अनावश्यक ढवळाढवळ सुरू होती.. गौरी ते अगदी सहज घेत होती.

"अग पुढे मुलं कसे होतील हा तरी विचार कर जरा."

" त्यात काय झेबऱ्यासारखे होतील काळे पांढरे..."

मिश्किल हसत दिलेले गौरीचे उत्तर ऐकून आम्ही गप्प बसलो.. आम्ही तिचा नाद सोडला की तिने आमचा कोण जाणे.? ह्या अश्या मुलाच्या प्रेमात पडली ही ...तेही सातव्या वर्गात म्हणजे अगदीच टिन एज वेडेप्रेम. पुढे आम्ही कधीही कृष्णा ढोकणे चा विषय काढला नाही की तिनेही काढला नाही. काळ लोटला तसे आम्ही आपापल्या मार्गाने आयुष्यात पुढे निघालो. नवीन नवीन रोज फोन, मेल्स ,चॅट असायचे नंतर जो तो आयुष्याच्या व्यापात बुडून गेला... हळूहळू संवाद कमी होत कधी थांबले कळलेच नाही. दोनेक वर्षांनी कळले... तिच्या गावातल्या एका मुलीकडून की तिचे लग्न ठरले आहे  .. तिने आम्हाला बोलावले नाही की सांगितले नाही... कुणी अभ्यंकर होता , तोलामोलाचा फॉरेनला सेटल... हे ऐकून आनंदच झाला. ते वेड्या वयातलं प्रेम का कुठे खरं असतं? एकुणात कृष्णा ढोकणेचा नाद सोडला असावा... त्याचे काय झाले असेल बिचाऱ्याचे कोण जाणे? हळूहळू गौरी आणि कृष्णा विषय , रोजच्या कटकटींत डोक्यातून पार हद्दपार झाला.

मध्यंतरी चांगला 10 वर्षांचा काळ लोटला. नात्यातल्या एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादला जाण्याचा योग आला. आम्ही ट्रेनने आदल्या दिवशी दुपारीच पोहोचलो.. हाताशी बराच वेळ होता .. मग आहोंना घेऊन जरा औरंगाबाद फिरवून आणते म्हणून बाहेर पडलो. गुलमंडीतमस्त पायी दुकाने धुंडाळली, स्पेशल भल्ला खाऊ घातला.. मग निराला बाजारात फिरत मँगो मस्तानी खाल्ली. शेवटी वरद गणेशाचे दर्शन घेऊन परत जायचे ठरले. हे वरद गणेश मंदिर अगदी आमच्या हॉस्टेल जवळ पायी जाण्यासारखे... आम्ही उठसुठ जायचो, विशेषतः परीक्षा असली की, पेपर कठीण गेला की, रिझल्टच्या दिवशी... सगळ्या आठवणी गोळा करत डोळे मिटले.. मागे फिरणार तर गौरी उभी. तिने कडकडून मिठीच मारली... दोघींचेही डोळे वाहू लागले.खूप वर्षांनी आम्ही दोघी भेटलो होतो... तिचे घर जवळच होते .आम्हाला खूपच आग्रह केला तिने चला घरी म्हणून... शेवटी हो नाही करता करता हे तयार झाले. अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर तिचे घर होते.

प्रशस्त म्हणावे असा 3 बेडरूमचा फ्लॅट... सुरेख सजवलेला..अप्रतिम सुंदर पडदे, भिंतींचे रंग , फर्निचर, टेरेस गार्डन त्यात झुला... अतिशय कलात्मकता सगळीकडेच जाणवत होती. ह्यांनी पाहता क्षणी घराची स्तुती करताच... घराचे इंटेरियर तिच्या नवऱ्याने स्वतः दखल देऊन केल्याचे ती म्हणाली ...नवऱ्याची सौंदर्यदृष्टी सुरेख असल्याचेही ती बोलली. तिने तिच्या नवऱ्याला फोन करून बोलवून घेतले... चहा नाष्ता होईपर्यंत दाराची बेल वाजली... माझे डोळे बाहेर पडायचेच बाकी होते... दारात कृष्णा ढोकणे उभा होता... गप्पांच्या नादात मी दाराबाहेर नेमप्लेट बहुदा पहिली नसावी. निर्मळ हसत त्याने माझ्या आहोंशी ओळख करून घेतली.. आणि विविध विषयांवर त्यांच्या गप्पा रंगल्या. गौरी मला आतल्या खोलीत घेऊन गेली. मलाही तेच हवं होतं.. कित्येक प्रश्न तिला विचारायचे होते... तिने ते माझ्या चेहऱ्यावर वाचले असावेत.

आत जाताच मी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. तिने हातानेच मला थांबवत नेहमीच्या मिश्कीलपणे प्रश्न केला..

"तू पहिलंस का मला नीट?? कशी दिसतेय मी?"

मी निरुत्तर... गौरीचं पुढे म्हणाली..

"मी खूप खूप सुखात आहे.. मज्जेत आहे हे पुरेसं नाहीये का?"

माझे दंड धरून गौरीने गरागरा मला फिरवले...तिचे अवखळपण ...बालिशपण अजूनही तसेच होते.

"अग पण अभ्यंकर??"

"हां ! ती स्टोरी एव्हढीश्शी आहे... आमचं लग्न मान्य नव्हतंच घरी कुणाला अपेक्षितच होतं ते ! आईने जीव द्यायची धमकी दिली... मग सांगेल त्याच्याशी लग्नाला तयार झाले.. देवव्रत अभ्यंकर त्यांना हवा तसा जावई होता..  लग्नाचा धडाका उडवला.. त्यांच्या 100 अटी पूर्ण करत प्रचंड पैसे ओतून साखरपुडा झाला... लग्नही  ठरले.  फॉरेनचा जावई मिळतोय म्हणून अक्षरशः पैसा ओतला होता बाबांनी. लग्नाच्या दिवशी सकाळी मी तयार होत होती... साडे दहाचा मुहूर्त होता... आणि पावणे दहा ला कळले.. देवव्रत पळून गेलाय त्याच परधर्मीय मुलीशी आधीच लग्न झालेलं होतं... घरी सांगायची हिंमत नव्हती.."

"मग"
मी उत्सुकतेने विचारलं..

"मग काय ? हे त्याने मला आधीच सांगितलं होतं .. मीच त्याला पळून जायचा पर्याय सुचवला.. फट्टू होता ग तो."

म्हणत ती खो खो हसत सुटली..  माते तुम्ही धन्य आहात ,अश्या अविर्भावात मी हात जोडले.

"मग वेळेवर कृष्णाची एन्ट्री मी प्लॅन केलीच होती. तुम्ही पाहिलेल्या मुलगा फसवून पळून गेला आता मी माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करणार मी ठणकावून सांगितले... आई बाबा तयार झालेच... आणि ठरल्या मुहूर्तावर माझे आणि कृष्णाचे लग्न थाटात पार पडले... शिवाय घरच्यांनी बिनबोभाट जावयाला स्वीकारले, उलट वेळ निभावून नेली म्हणून जास्तीच मानाने वागवले."

मी पार क्लिन बोल्ड... पोरीने काय वेड्यात काढलं मायबापाला! 

" हे बघ . आम्हाला पळून जाऊन लग्न करणं सहज शक्य होतं पण मग मी कायमचे माझ्या घरच्यांना दुरावले असते. दुःखी झाले असते.. तेही आणि मीही. शिवाय मला माझी सगळी हौस मौज करून लग्न करायचे होते.... थाटात"

म्हणत गौरीने डोळे मिचकावले.

"हे सगळं कसं सुचलं बाई धन्य आहेस तू?"

"मी नाही ग हा सगळा प्लॅन कृष्णाचा हं!... आता लाडका जावई आहे गोखलेंचा...  होणारच होता तो... माहितीच होते मला.. त्याच्या ह्याच हुशारीवर तर भाळले होते मी. हुशार , माणसे न तोडता जपणारा, प्रेमळ समंजस... आईबाबांचा रोज त्याला फोन असतो.. मस्त गप्पा होतात . त्याच्या आईवडिलांसारखी माझ्याही आईबाबांची काळजी घेतो... सगळे चेकअप कंपनीकडून करून घेतो मागच्या महिन्यात बाबांच्या डोळ्यांचे ऑप्रेशनही इथेच करून घेतले स्वखर्चाने "

तेव्हढ्यात तिचा पिल्लू शाळेतून परतला....  4 वर्षांचा गौरव जरा बिचकतच माझ्या जवळ आला... मी त्याला म्हणाले ,
"तुझं नाव मी गेस करू .. झेब्रू !"
 तसा टाळ्या पिटत हसत सुटला... " बरोब्बर ! मम्मी मला लाडाने झेब्रू म्हणते."
त्याच्या बरोबर आम्ही दोघीही हसत सुटलो... फोन नंबरची देवाण घेवाण झाली आणि आम्ही निरोप घेतला.

परततांना अहो म्हणाले, 
"काय भन्नाट हुशार माणूस आहे... इंप्रेस ! प्रचंड माहितीचे भांडार आहे...एव्हढ्या मोठ्या चीफ मॅनेजरच्या पोस्ट वर आहे पण किती साधा किती प्रामाणिक, दिलखुलास गप्पा मारल्या... फार आवडला बुवा आपल्याला .. लकी आहे तुझी मैत्रीण."

मी मनापासून म्हणाले,

"खरंच लकी आहे गौरी."

कित्येकदा आपण सगळेच जोडीदार निवडतांना अत्यंत फुटकळ मुद्द्यांना अनावश्यक महत्व देतो नाही ! पुढे प्रत्यक्ष आयुष्यात ते मुद्दे अगदीच बिनमहत्वाचे आहेत हे कळून चुकतं. रंग हा त्यातलाच एक... खरं प्रेम ह्या रंगापलीकडे पाहू शकतं.... वरवरचं रुपरंग ह्या पलीकडे जाऊन गुण पाहणं गौरीला लहान वयांत शक्य झालं... सगळ्यांना जमेलच असं नाही.
©🔏यशश्रीफार काही रसाळ वर्णने असावीत अशी ही कथा नाही किंवा फारच भयंकर काही घडले असाही भाग नाही... अजूनही आपण भारतीय लोक रंगांच्या बाबतीत फारच आग्रही असतो.. म्हणजे तसे वागतांना दाखवतो की "रंगाने कुठे काय फरक पडतोय?" पण प्रत्यक्षात प्रत्येकाच्या मनात मात्र गोरी गोरी पान व्यक्तीच जोडीदार म्हणून असते... मग मुलांनाच का नावे ठेवा? मुलींनाही गोराच नवरा हवा असतो.. आणि बाळ होणार आहे अश्या प्रत्येक गर्भवतीला गोरेपान बाळच हवं असतं.. 80% गर्भवतींचे प्रश्न असतात ,"बाळ गोरे होण्यासाठी काय खावे?" मग केशर घातलेल्या दुधाचा बळेच मारा सुरू होतो. गंमत म्हणजे ह्या सगळ्या वातावरणात त्यांचं प्रेम जुळलं ... दोघांमध्ये पौर्णिमा आणि अमावस्या इतका रंगांचा फरक होता. 
                    
©🔏यशश्री रहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!