फॉलोअर

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

फसलेल्या जहाजाची कहाणी


नेहमीप्रमाणे दिवेलागणीच्या वेळेला लोड शेडिंगमुळे  गावातले दिवे गेले आणि गावातले रिकामटेकडे पारावर जमले. तात्या, नाना, सोपान्या, संतु, हणम्या वगैरे रिकामटेकडे तसेही पारावरच बूड चिकटवून बसलेलेच असत... आता त्यांच्या फुकाच्या बढाया आणि वायफळ चर्चेच्या रतीबाला आयते श्रोते मिळाले. अर्ध्या गौऱ्या मसणात गेलेला अण्णा तरातरा चालत आला आणि सुपारीचे खांड फोडू लागला. 

"हे बेन समद्यांची तेरवी जेवनार .." 

म्हणत उगाच खसखस पिकली. हातावरच्या तंबाखूच्या चुकट्या तोंडात गेल्या... आणि बार भरून तयार नानाने आपले पांडित्य पाजळले...

"तर मंडळी समद्याहीले म्हाहीतच हाये... जगावर मोट्ट संकट आलीलं हाये...."

त्याला अडवत चार तोंडे एकदम किंचाळली ..

"कोरोन्या सोडला न चिन्यायनी... बाप्पा !नवं काय सांगतलं तुनी.. हे तं शेम्बड पोरगं बी सांगल..."

पुन्हा भाषणाचा जॉनर पकडत नाना गंभीरपणे म्हणाला...

"ते नव्ह! ... चक्  चक् चक्!.."

नानाने मुंडकं रामसें बंधूंच्या भुतापेक्षा वेगाने फिरवलं... आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. सोपान्या एकदम आवेशाने किंचाळत म्हणाला..

"ह्या बेन्या नकट्यांची नवी करामात आशिन... मी काय म्हंतो... येक अणुबॉम्ब टाकून दियाचा ना ! फटक्यात काम तमाम..."

त्याची री ओढत चार डोकी हलली..
"न्हाईतर काय लोन्च घालायचं का त्या अणुबॉम्बाच..."

आपल्या हातून कमान जातेय हे पाहून नानाने पुन्हा जोमात खिंड लढवली..

"ते परवडलं .. आक्षी भयानक गोची झाली न बाप्पा! नरड्यात हाडुकावाणी अडकलं ना त्ये... पुढं बी जाय नाय अन् मांग बी येई न्हाई.... का करता आता??"

म्हणत जे काही डोकं बडवल त्यानं की प्रकरणाचं गांभीर्य लोकांच्या लक्षात आलं... बिडीवाले नव्या बिड्या शिलगावून आणि तंबाखूवाले नवा बार भरून तयार झाले... अण्णाने मोठाईकी घेत म्हटलं ...

"नान्या लेका! जगाच्या पंचायती हाये तुला! सांग बाबा समदं बैजवार..."

"बाप्पा हे भलमोट्ट झाज फसलं (हात शक्य तितके फाकवत ) ..... पार आडवं झालं ना ... ट्रॅफिक जॅम केला मनं त्याहिनी... समिनदरात. तेल न्हाई पानी न्हाई आवो (दोन बोटे नाचवत) लोटापन्याची बोंब झाली म्हन तिकडे गोऱ्याहीच्या देशात..."

आता मात्र लोक भूत बघितले ह्या आवेशाने डोळे ताणून ताणून पाहू लागले.... म्हाद्या चिडत म्हणाला..

"काय नाना! काय बी फेकू नै मानसान... तुले शाना समजित हुतो म्या... हॅट लेका! 20 ₹ ची घेतल्याली .. उतरली ना राव!..."

नाना फेकाफेकी करतोय म्हणून सगळे शिव्या घालत असताना त्याचा जिगरी दोस्त तात्या धावून आला...

"आरं ! वाईच ऐका आपला दोस्त खोटं न्हाई बोलायचा... आठ बुक शिकेल हाय त्यो... रोजच्या बातम्या पायतो... तुम्ही कोन पायता सांगा बरं येकेक ..."

सगळे आपसूक मुकाट बसले आणि नानाने तात्याकडे ठेवणीतले हास्य फेकत पुन्हा सूत्रे स्वीकारली.आता मूळ मुद्द्यावर थेट येत ...

" समिनदरात झाज आडवं घातलं बेन्यानं... मंग तथं ट्रॅफिक जॅम झाला म्हने..."

"आरं आरं! पुन्हा त्येचं ... लेका नान्या समिनदर केव्हडा जहाज केवडं ... काहून काईच्या काई सांगतो बे तू...??"
हणम्याने जुन्या भांडणाचा वचपा काढायचं ठरवलं..

नानाने मग कंदीलाच उजेड वाढवला... जमिनीवर काडीने चित्र काढून सांगू लागला...

"इजिप्त नावाचा देश हाये.. त्येला खेटून असा कालवा हाये... हा असा...तथं मोठमोठाल्ली जहाजं जात्याल. ते हे आस आडवं लावलं ना बाप्पा... मंग...."

"लेका घटकेत समीनदराचा कालवा केला ना तू..."

हणम्या काही गप्प बसणार नव्हता. एकच खसखस पिकली... एव्हढ्यात शहरात शिकायला असलेली पण लॉक डाऊन मुळे गावाकडे परतलेली तरुण पोरांची टोळी आली.. नामा, पिंट्या , बाबल्या, शिवा, सच्च्या... सगळे येऊन टेकले... आपल्या बोलण्यात येत असतील तेव्हढे इंग्लिश झाडत सचिन उर्फ सच्च्या बोलू लागला...

"Right येकदम right बोलता तुमी नाना काका.... अहो खरंच झाज फसलंय.... स्टॉर्म म्हंजी वादळ झालं मनं तथं... आन त्ये डायव्हर झाजाचा ... आता आपुन डायव्हरच म्हनु  .. त्यो भेलकांडला ना... स्ट्रेट जानार झाज हे असं खात्या हाताले वळलं  आन थेट वाळूत घुसलं....."

"च्याक् च्याक्! कसलं वादळ आन कसलं काय रं... बेन पिऊन टाईट आसन... आता हे कूट दाखवनार न्यूज वाले..."

पिंट्याने अक्कल पाजळली.. आणि सगळे लोक हसताना बघून म्हाद्याचं टाळक सटकलं...  म्हाद्या म्हणजे "रोजचा एकच प्याला" संघटनेचा अध्यक्ष... त्याच्या भावना दुखावल्या....

"कोनाच्या बाप्पाची पेतो काय रं! आं! माज्या पैश्यान पितो ना...माज्याकडे पाहून दात काडता काय?? एका बुक्कीत दात पाडीन..."

त्याचा भेलकांडत जाणारा आवेश पाहून जहाज कसं फसल असेल ? हे ध्यानात घेत त्याला आवरत... तात्या म्हणाला....

"आपुन त्ये जहाज वादळानचं फसलं असं समजुया...काही कोनी पियेल नव्हतं.... हां! चाला म्होरं पोर हो! मंग पुडं??"

पुन्हा एकदा सेमी इंग्लिश सच्च्याने फलंदाजी स्वीकारत धडाकेबाज फटकेबाजी सुरू केली...

"... हे आस्स झाज चिनहून नेदरलँड ला निंगाल...(चीन हायेच म्हणत लोकांनी रागाने कडकडा बोटे मोडली...) पनामाचा फ्लॅग हुता त्या झाजावर... इजिप्तच्या शेजारी समिनदरात भूमध्य आणि लाल समुद्र याहिले त्यो कालवा जोडतो  त्याचं नाव हाये सुएझ ... तथं हे झाज आडवं झालं आन त्येच्या पाठिमांगे अशे तीन चारशे झाज... ऊबी समिनदरात... आता कसं करा? काय करा?... मोटिच difficult शिच्युएशन झाली म्हन... बिझनेस ठप्प झाले म्होरच्या कंट्रीतले..."

मुंबई पल्याड धाव नसणाऱ्या आणि भूगोल नावाच्या विषयाशी आयुष्यात पाला न पडलेल्या ह्या श्रोत्यांना अनेक प्रश्न पडू लागले... पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू म्हणून सूत्र सांभाळत नाना म्हणाला..

"आरं लेकांनो! दोन वर्सा मांग पोल्ट्रीचा टरक नव्ह का हाय वे ला उलथला ... त्या सरदारजीला नव्ह का.. पूड घेता इना माग काडता इना... कशी रांग लागली हुती गाड्याहीची ... मंग तसाच परकार ... "

आता सगळ्यांनी माना डोलावल्या... अण्णा माणुसकीचा कळवळा दाटून येऊन म्हणाला ...

"त्या जाजा वरच्या मांसायले चा-पानी काही देल्ला का न्हाई?? आपल्या गावात अस्तं तं कवाच चा पानी भाकर टुकडा देला असता आपुन.. "

बाबल्या एकदम खुश होत म्हनाला...
"हाव ना आंना !...आन शेल्फी बी काडला असता गोऱ्याहीच्या सोबत..."

एकदम आनंदाचे कारंजे उसळत तरुण पोरे चित्कारली..

"शेल्फी विथ एव्हर गिव्हन ... लै भारी ना!"

तालुक्याच्या गावी टमटम चालविणारा..  स्वतःला उत्कृष्ट चालक मानणारा सोपान्या स्टेअरिंग हाती घेत म्हणाला...

"मी त्या डायव्हरला म्हनलं असतं पीटर भाऊ !.. आता पीटर बिटर आसलंच नाव अशीन ना कैतरी... तं पीटर भाऊ! पाय जो दोन हात मांग घे मंग दोन दोन हात धुत्या हाताले... मंग पुंना मांग ... निघल झाज हाय काय आन न्हाई काय??न्हाईतर तू व्हय बाजू ...  घे उतरून !म्या देतो काहाडून."

सेमी इंग्लिश सच्च्या पुन्हा मदार सांभाळत म्हणाला...
"मामा! पीटर का मुन?? आपल्या देशाची 25 लोक होत्ये ना ... झाज चालवाईले. कुनिबी असन रामा, शिवा गोविंदा... आन त्ये झाज लोडेड होतं फुल्ल लोडेड... ते काई जीपाड नव्ह गावातलं .. ईट इज 400मीटर लांब... म्हंजे म्हंजे ...पाटलाच्या वावराएव्हढं..."

मोठ्यात मोठी उपमा म्हणून दुसरं काहीच त्याला सुचलं नसावं... त्याची ही उपमा ऐकून लोकांच्या डोळ्यांतून बुबुळे बाहेर आणि तोंडातून "आरं बाप्पा रे!" असे चित्कार उमटले. पुन्हा एकदा तंबाखूचे बार भरले गेले आणि बिड्या नव्याने पेटल्या. संधीचा फायदा घेत नाना पटापट स्वतःला माहीत असलेली माहिती पुरवू लागला.

"आरं गडयांनो! कवा धरनं त्येचं तर सांगत हुतो मी ... जाज  मोट्ट हाये आक्षी 10 मजली घरा इव्हड !...त्यात मानसं न्हाई सामैन हाये.... दोन का तीन लाख टन वजन हाये त्येचं. त्याचा म्होरचा भाग वाळूत फशेल हाये... आता उपसा करत्याल म्हन त्ये....त्या जाझावं मोठाल्या मशिनी, तेल हाये आनीक काय काय हाये... आन मत्वाचं म्हंजे ते कागद हायेत ..."
(म्हणत त्याने पुन्हा 2 बोटांची खूण केली...)

ह्या विषयात विशेष रुची असणारा आणि दिल्लीचा मामा असणारा पिंट्या अधिक माहिती देत म्हणाला...

"दिल्लीला गेलतो मांगतल्या टाइमाले तवा पहिला बाप्पा त्यो घानेरडा परकार... तिकडं टमरेल नस्त्यात कागुद वापरतात टॉयलेट पेपर म्हनत्यात त्याला..."

छि छि ! करत सगळ्यांनी नकळत नाक दाबून धरले... नानाला ज्या विषयी गंमत सांगायची होती तो विषय आता खऱ्या अर्थाने सुरू झाला... नाना उत्साहाने सांगू लागला..

"त्ये पेपर सरव्याहून जास्त बनवत्ये कंपनी सुझानो... त्यायनी पष्ट सांगतलं ... झाज फशेल हाये.. आता टॉयलेट पेपर कमी पडत्याल ... म्हंजे आता तुमची तुमी धुवून घ्या गड्याहो!..."

"हे म्हंजे भलतंच झालं न भौ!"

म्हणत हास्याच्या खळखळाटाने पार दुमदुमून गेला...
तोंडातला तोब्रा थुंकत सोपान्या आवेशाने म्हणाला...

"आपल्या गावाकडं आस्त तं रात्रीतून रिकामं केलं असतं आपुन ... मंग आपोआप वळलं असतं त्येचं त्येचं जाझ...
त्या बेन्या सरदाराची पोल्ट्रीची गाडी कशी केल्ती... एक आंड ठेवलं न्हाई का येक कोंबडं..."

त्याची ही कल्पना सगळ्यांना जाम आवडली .नाना आपला पुन्हा टॉयलेट पेपरकडे वळत दोन बोटं उंचावत म्हणाला..

"त्या पेपरचं का केलं आस्त आपुन... आपल्याले मोकळी हवा आन लोटा पाहिजे कसं?"

पुन्हा एकदा खसखस पिकली... म्हाद्या आपला मदिराप्रेमी कल्पनाविलास मांडत उपाय सुचवू लागला...

"तालुक्याला नेऊन इकुन टाकलं आस्त आपुन तर ... मंग झक्कास चार दिस ईदेशी पिली असती ना राव!"

विदेशीची कल्पना सगळ्यांनाच पसंत पडलेली दिसली. एव्हढ्यात गावातली बारकी पोरं आईचा निरोप घेऊन धावत आली... सगळ्यांना आपापल्या घरी जेवायला बोलावलं होतं... आणि ह्या वानरसेनेला  भयंकर भूक लागली होती. 

"दिवं येतीलच की इव्हढ्यात... घटकाभरात ईतो म्हना..."

पारावरची रंगलेली मैफिल सोडणे सगळ्यांच्या जीवावर आलं असावं... पण वानरसेना उत्क्रांत पिढी होती... रात्रभर लाईट येणारच नसल्याची माहिती त्यांनी आधीच काढली होती... हाफ चड्डी बाळ्या धापा टाकत म्हणाला

"आप्पा! पार हाय वे ले जाऊन आलो आंमी...  मोट्या डिप्पीच्या खांबावर टरक धडकला हाये ... खाम झोपल्यात पार... आता उद्यापतूर लाईट इनार न्हाई...हे रांगा लागल्यात टरकांच्या पार ओढ्यापतूर...."

पटापट पायात पायताण सरकवत बुडाची धूळ झटकत जो तो विचारू लागला... 

"टरक मंदी काय हुतं रे पोरहो!..मदतीला जायाला पाहिजे. मायला सांग आलोच हायवे पतूर जाऊन इतो. "

फसलेलं जहाज नाही पण फसलेला ट्रक आणि त्यांनी झालेला ट्रॅफिक जॅम बघायलाच हवा म्हणून  सगळे भराभर हाय वे च्या दिशेने निघाले.

✒️ यशश्री रहाळकर




 



 

1 टिप्पणी:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!