मुलं मोठ्ठी झाली... स्वतंत्र झाली...
तसतशी मला "यशोदा" कळू लागली.
एक सर्वस्वानं रीती झालेली आई म्हणून ...
मोठ्या झालेल्या मुलांच्या झबल्या टोपड्यात रमणारी बाई म्हणून...
अवघं आयुष्य कृष्णाने व्यापून घेतल्यावर
कुणीतरी येऊन सांगत "हा" माझ्या पोटचा गोळा आहे..
तुझा कुणीच नाही... तू आहेस फक्त दायी.. सांभाळकर्ती
कृष्णमय झालेली यशोदा कसे पेलत असेल हे वादळ??
सुने अंगण, रिकामे घर आणि काठोकाठ भरलं मन..
त्याच्या बाळलीला, त्याच्या खट्याळ खोड्या..
त्याची मुरली... त्याचे माखन, त्याचे मित्र त्यांचा दंगा...
सारं त्याचं झाल्यावर कसे वेगळे करत असेल ती स्वतःला?
इवल्याश्या गावात वाढलेला आपला लेक
मोठ्या शहरात नीट राहील ना! नीट खाईल ना!
एक नाही हजार शंका असतील पोखरणाऱ्या तिला...
त्याला माझी आठवण येईल का? हा दुखरा कोपरा असेलच काळजात..😢
आपला लेक गोकुळाला विसरून तिकडेच रमला तर..
परक्या देशात, नवीन माणसांत कायमचा राहून गेला तर...
कधी भेटेल , कधी जवळ घेईन, कधी गोंजारेन मी त्याला?
यमुनेच्या काठावर डोळ्यांच्या घागरीही रित्या होत असतील कदाचित...
कुणीही मांडली नाही तिची उरलेली कथा.. कृष्ण सोडून गेल्यावरची
जुनाट घराच्या पायऱ्यांवर हल्ली .. कित्येक यशोदा दिसतात मला
डोळ्यांत प्राण आणून वाट बघणाऱ्या, आपापल्या कृष्णाच्या बाळलीलांत रमलेल्या...
म्हणूनच कदाचित यशोदेची कृष्णानंतरची कथा कुणी लिहिली नाही... त्यात काही उरलंच नसावं बाकी
✒️ यशश्री रहाळकर
खरंच आईच्या मनातील भावना छान मांडल्या आहेत
उत्तर द्याहटवाWah... अप्रतिम यशश्रीजी
उत्तर द्याहटवाअगदी माझ्याच भावना तुमच्या शब्दात उतरल्या.. खुप छानं
उत्तर द्याहटवा👍😊
उत्तर द्याहटवा