फॉलोअर

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

कविता - उपवर मुलीची आई

आज एक वेगळ्या धाटणीची कविता मांडतेय ... सध्या सोशल मिडीयावर सतत मुलीची आई कसे संसार मोडते ? कसे मुलीला वळण लावत नाही वगैरे टीका सातत्याने होतांना दिसतात ...
आज मी मुलीच्या आईची बाजू मांडतेय ...
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...

♾♾♾♾♾♾♾♾
 उपवर मुलीची आई 
♾♾♾♾♾♾♾♾

सोशल मिडीयावर जिच्या पापांचा रोज पाढा वाचल्या जायी
यथेच्छ जिला शिव्यांची लाखोली रोजच वाहिली जायी.. अहो तिच मी बाई ..
दुसरी तिसरी कोण , मी उपवर मुलीची आई .

मुलीला मी बिघडवून टाकते ;
अती लाडाकोडात वाढवते ;
लेकीच्या संसारात विष कालवून संसार मोडण्याची असते जिला घाई
तिच मी मुलीची आई ...

मुलींच्या लग्नात अटी ठेवणारी मी ...मुलीला काहीबाही शिकवणारी मी;
लग्नसंस्था मोडकळीस आणणारीही  मी ;
भारतीय संस्कृती लयास जाणारेय जिच्या पायी ..
तिच मी कैदाशीण मुलीची आई

यांच्या मुलांना मी फितवून टाकते
गोड बोलून घोळात घेते ;
सासुरवाडीची गोडी लावते ...
अहो , पण तेव्हा जाते कुठे यांच्या मातृत्वाची पुण्याई
मी तर बापुडी मुलीची आई.

दुष्ट क्रूर काय हवे ते म्हणा ; हवी ती दुषणे द्या हवे ते बोल लावा ...
लेक देतेय तुम्हाला  ... फुटाण्याची पूडी नाही ...
कशीही वाटो तुम्हाला ही मुलीची आई .

दिल्या घरी तू सुखी रहा म्हणायला आयुष्य मराठी सिनेमा नाही ..
लेकी प्राण आहेत आमचा ... कुणा कसायांना दिलेल्या गाई नाही.
तिचे सुख तिच ठरवणार .. ते दुसऱ्या कुणी ठरवायचे नाही.
माणूस जपलाय तिच्यातला जपण्या आधी बाई ...
सारं घेते पारखून तिच मुलीची आई.

लग्न करून देतेय लेकीचे तिच्याच  सुखासाठी ...
मी असणार मी बोलणार तिच्या प्रत्येक हक्कासाठी
गृहकृत्यदक्ष बनवलेय तिला हक्काचा घरगडी नाही
जिचं  प्रत्येक सुख बांधलय लेकीच्याच पायी ...
तिच मी मुलीची आई.

फेमिनीझम चा मारताय शिक्का ; विचार करून बघा
काही वर्षे तुमचा लेक नांदायला पाठवून बघा
पोटचा गोळा दुसऱ्याला देताना जीवाची होते कशी लाही
सोपे नाही हो इतके होणे मुलीची आई.

कन्या 'दान'  करणार नाही केव्हाच ठरवलय मी ..
हुंडाबळी मारहाण काय साधा ओरखडा  येउ देणार नाही मी .
घराचे दार आणि मनाची कवाडे सदैव खुली ठेवेन मी
लेकीसमोरच्या प्रत्येक संकटात जी ढाल बनून राही ..
तिच मी खंबीर मुलीची आई
🔏© यशश्री रहाळकर
           नाशिक
         18/12/18

१२ टिप्पण्या:

  1. मुलीच्या आईच्या वेदना खूप यथोचित पणे मांडल्या आहेत...ख खू छान

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी...

      हटवा
  3. प्रत्युत्तरे
    1. आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी...

      हटवा
  4. आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी...

    उत्तर द्याहटवा
  5. आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी...

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!