फॉलोअर

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

तिचं कपाट

👩 तिचं कपाट  🗄
〰〰〰〰〰〰〰〰
        ' Minimalism ' अर्थात किमान चौकट प्रबंधन नावाची एक झक्कास concept वाचनात आली.नाव जरासं बोजड असलं ना तरी अर्थ अगदी सोपा .... केवळ जीवनावश्यक वस्तू बाळगणे बाकी सामानाची हकालपट्टी .... गरजेपुरते कपडे, फर्निचर, शूज वगैरे... अत्यंत उत्साहाने मी नवऱ्याला लगेच वाचून दाखवली . अत्यंत शांतपणे माझ्या कपाटाकडे बोट दाखवून तो म्हणाला  " minimalism ची  इथूनच कर सुरूवात . "  मी minimalism पेपरमध्येच गुंडाळत .. शहाजोगपणे बाजूलाच असणाऱ्या सिल्क साडी सेल वर लक्ष केंद्रीत केले .
           खरचं , एकदा पहायला हवय ह्म कपाटाकडे , ओसंडून वाहणारे मुंगीलाही शिरायला जागा नसणारे माझे कपाट डोळ्यासमोर आणत मी मनाशी म्हणाले . " आता साडी घेण्यापूर्वी आधी कपाट घे !  " असे दिवाळीपूर्वीच्या आवरासावरीच्या वेळी नवऱ्याने ऐकवले होते. तरीही मी फक्त तीनच साड्या घेतल्या दिवाळीला . एखाद्या ऑक्टोपस सारखे माझे कपडे नवरा ,लेक आणि सासूबाईंच्या कपाटात आपले पाय पसरवत होते . माळ्यावरच्या सूटकेस तुडुंब भरल्या होत्या ... माझ्या कपाटाची जी स्थिती तिच थोड्याफार फरकाने प्रत्येक " तिच्या  कपाटाची " असते . याचा अर्थ आम्ही स्त्रिया आळशी असतो किंवा हावरट असतो असे मुळीच नाही.
             प्रत्येक तिच्या कपाटात तिचं सारं जग सामावलेलं असत . इतक्या चमत्कारीक वस्तू भरून असतात की एखाद्या प्रदर्शनातही हे वैभव पहायला मिळणार नाही . आता माझ्या कपाटात माझ्या मुंडावळ्या अजून आहेत , लग्नाला दहा वर्षे झालीत तरी त्या मी जपून ठेवल्यात . त्या पाहिल्या की अजूनही हळवं कातर व्हायला होतं ...  ड्रेस वरील चांगल्या ओढणी मी जपून ठेवते ... त्या पुढे जन्मात कधी कशावर वापरत नाही हा भाग वेगळा . एक नावडत्या कपड्यांचा खण ज्यात मी देणाऱ्याने प्रेमानी दिलेय म्हणून साठलेले कपडे आहेत . झालेच तर कधीकाळी बारीक होऊ या स्वप्नपूर्तीसाठी ठेवलेल्या जुन्या जीन्स, स्कर्ट ... आणि असंख्य पर्सेस हॅंड बॅग्स ... वगैरे
              प्रत्येक ' तिच्या ' कपटात तिच्या सगळ्यात मौल्यवान ठेवी दडलेल्या असतात . आई, आजी  हयात नसतील तर त्यांच्या स्पर्शाची आठवण म्हणून ठेवलेली साडी , नवऱ्याने मनापासून " हा गुलाबी रंग तुझ्यावर खुलून दिसतो " अशी पहिल्यांदा दाद दिली ती खास साडी , लग्नातला शालू नुसता हात फिरवला तरी सगळे क्षण मनाच्या कॅमेरात उलडणारा , मामा मामीचा आठव देणारी.. आजोळीची धमाल आठवायला लावणारी अष्टपुतळी, पहिल्यांदा गोड बातमी कळली तेव्हाची साडी , कधी नव्हे ते सासूबाईंनी घेतलेली साडी , आजेसासूबाईंची लाडकी नातसून म्हणून  वारश्याने मिळालेली पैठणी  , लेकानी पहिल्या पगारात घेतलेली साडी नी लेकीने तुला हाच रंग छान दिसतो म्हणून हट्टाने घ्यायला लावलेली  भडक मॉडर्न साडी , विहीणबाईंने दिलेली भारी साडी अन झळकणारा अभिमान .... साऱ्या साऱ्या केवळ कपडे किंवा  वस्तू म्हणून मर्यादित नसतात तिच्यासाठी . तर तिच्यापुरता मांडलेला भावनांचा खजिनाच असतो . प्रत्येक कपडा तिच्यासाठी आठवणींचे भांडार घेउन आलेला असतो . ती बांधायला पाहते  ते क्षण....  जपायचा प्रयत्न करते त्या आठवणी .
               माझ्या आधीच्या पिढीचं बरं होत .. तीनच प्रकार घरात नेसायची साडी , आलीगेली साडी ( म्हणजे साधारण बाहेर नेसून जायची )आणि लग्नाकार्यात नेसायची साडी ...बास. तेव्हा घरातले सगळ्यांचे कपडे एकाच कपाटात मावत असत . आता आमचे धेडगुजरी झालेय सारे म्हणजे दररोज बाहेर आम्ही साधारणपणे ड्रेस घालतो , त्यात जरा बदल म्हणून अनारकली घेतो ,  शिवाय सुटसुटीत म्हणून कुडते आणि लेग्गिंस वापरतो , आता पार्टी म्हटली की वनपीस हवाच , शिवाय मैत्रीणींबरोबर चील करतांना स्कर्ट किंवा केप्री हवाच हवा ... मूव्हीला जातांना म्हणून जीन्स तर for a change प्लाझो हवा . किटीची थीम traditional तर नऊवारी हवी , नवरात्रासाठी लेहेंगा गरारा हवा ,  क्लब पार्टीज ना लेटेस्ट डिझायनर साडी हवी ... हे सगळे का जवळच्या नात्यातल्या लग्नात घालणार मग साडी हवी ... मावसबहीणीच्या लग्नात नेसलेली का चुलत बहिणीच्या लग्नात नेसणार ?? शी कसं दिसेल ते ? म्हणून नवी साडी घ्यावीच लागणार . शिवाय दिवसभर मोकळं वाटावं म्हणून गाऊन नावाची कफनी हवीच , त्यासारखे सुख नाहीच .
      या साऱ्यामुळे  ' तिचे ' कपाट तुडुंब भरलेले असते ... नव्हे ती तिची नितांत गरज आहे . पुरूष बिचारे सुखी प्राणी कपड्यांचे प्रकारही फारसे नाहीत आणि काहीही घातले तरी चालते ... सगळ्या भावंडांची लग्ने ते एकाच ड्रेसवर निभावून नेतात.
             आई , मावशी , मैत्रीण , बहीण कुणाचेही कपाट पहा ... तिच्या सारसर्वस्वाचे प्रतिबिंब जणू आरशाआड लपवून बसलेले असते . तिच्या सुखाचे आनंदाचे ते मूलभूत परीमाण असते ... त्यातील वस्तूंची किम्मत बाजारभावावरून ठरवताच येत नाही. तिचं कपाट ही तिची हक्काची स्वतंत्र अलिखित जागा असते ज्यात कुणाचाही हस्तक्षेप नसतो ... धृवताऱ्यासारखी संसारात अढळ तपश्चर्या करून एक एक करत तिने साठवलेला तो खजिना असतो .. तो रीता करताच येऊ शकत नाही .
          कधीतरी तिची दुडूदुडू पावले टाकत बागडणारी लेक अचानक मोठी होते ...अन कॉलेज मध्ये साडी डे ला साडी हवी म्हणत तिच्या कपाटात शिरकाव करते ... " तुला हवी ती घे ग " ती म्हणते . लेक एक एक साडी उलगडून काढते  अन ती भूतकाळात रमत " ही ना तुझ्या बाबांनी आणली आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला.. surprize ह्म्म " तिचं कपाट गालातल्या गालात खुदकन हसतं .
©🔏यशश्री रहाळकर
           नाशिक
           26/12/18

४ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!