👩मधल्या फळीची शिलेदार👱
गेल्या काही दिवसांत कुटुंबव्यवस्था आणि जेश्ठांचे प्रश्न हे मुद्दे ऐरणीवर आलेले आहेत. कुटुंबातील लहान मुलांन प्रमाणेच जेष्ठ व्यक्तींना काळजी आणि प्रेमाची निश्चित गरज आहे ... याबाबत दुमत नाहीच . पण आज मी जिचे प्रश्न मांडणार आहे ती आहे घरातील कर्ती स्त्री ... सून. गेले काही दिवस सोशल मीडियावर जिचा उद्धार जाहीरपणे 😈 राक्षसी दुष्ट चेटकीण असा केला जातो .... तिच ही बाई . हो ना ! कुटुंब व्यवस्था नष्ट होणार कारण सूनेला वळण नाही... संसार मोडताहेत कारण सूनेच्या आईची ढवळाढवळ , वृद्ध वृद्धाश्रमात जातात कारण सूनबाई ... मुलांना वळण नाही कारण हिच दुष्ट बाई... यांच्या श्रावणबाळांना जादूने भुरळ घालून तोडणारी हिच ती चेटकीण..... असे काहिसे चित्र मनात तयार व्हावे अशी प्रतिमा हेतूपूर्वक रेखाटली जातेय. आजकाल मुलींपेक्षा सासू लोकच सूनेच्या आगमनापूर्वी धास्तावलेले असतात... जणू आपण घरात एक निखारा आणतोय आणि तो पेटून कधीही घरादाराची राख करेल .
दुसरी कडे कथा कादंबरी आणि सिरीयल्स मधून आजही आदर्श सूनबाईची प्रतिमा उंचावली जातेय. तुळशीला पाणी घालणारी , उठसूट देवापुढे दिवे लावणारी , कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणे याशिवाय दुसरी कोणतीही महत्वाकांक्षा नसणारी .... नवऱ्याचे वाट्टेल तसे वागणे सहन करणारी So called पतीव्रता. या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी असणारी खरतरं सून ही माणूस आहे हे मात्र सारेच विसरून जातात.
मुलींच्या आईने तिला अमुक ढमुक वळण लावावे... थोडक्यात तिला संसार बिनबोभाट करण्या योग्य मटेरीयल बनवावे ..एव्हढा एकच मार्ग प्राचीन महानतम अश्या आपल्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांना माहित असावा. यात माझा रोल काय असावा असा विचार किती घरातील जेष्ठ करतात? तिचे एकटीचेच खांदे पेलणार का सारे ?? यावर काही महान लोक आम्ही तर तिला अगदी मुलीसारखी वागवतो असा आव आणतात .... प्रत्यक्षात हे शक्य नाही, या ड्रामेबाजी पेक्षा तिला माणूस म्हणून वागवता का ? हेही तितकेच महत्वाचे ती superwomen नाही हे तुम्ही मान्य करता का ?
आजही कुटुंबात येणाऱ्या सूनेसाठी सोळाव्या शतकातील अपेक्षा केल्या जातात . त्या वेळी ८/९ वर्षांची मुलगी असायची आता ती २५ ते ३० या सर्रास वयोगटातील असते हे आपण का विसरतो?? ती काही संस्कारक्षम वगैरे नसते उलट पूर्ण वैचारीक बैठकअसणारी स्वतःची स्वतंत्र मते असणारी असते. एक किंवा फारच झाले तर दोन अपत्ये असणाऱ्या घरात लाडाकोडात वाढलेली असते ... या सत्याचा स्विकार सर्वाधिक महत्वाचा आहे. याचा अर्थ ती बिघडलेली आहे असा होत नाही तिची जगण्याची स्वतःची पद्धत निश्चित असणार आहे आयुष्याचा मोठ्ठा टप्पा तिने पार केला आहे.
बरेचदा लोकांच्या अपेक्षांमध्येही कमालीची विसंगती आढळते... जसे भरपूर पगार असणारी मोठ्या पदावर नोकरी करणारी सून हवी पण तिने आमचे सगळे सणवार सोवळे ओवळे सुट्ट्या काढून केलेच पाहिजे ... आता जवाबदारीच्या पदावर असणाऱ्या सूनेने दर वेळी सुट्टीचे कसे जमवाने? हा विचार व्हायला हवा. अप्रतिम सुंदर वाह अगदी ह्या कॅटेगरीत मोडणारी सून आहे पण ती बहुतांश वेळ पार्लर आणि जिमला घालवते याची तक्रार करायची.... खूपच कष्टीक टापटीप संसार करणारी सून हवी पण ही कशी गबाळी आहे काकूबाई आहे म्हणून बोटे मोडायची. एकाच व्यक्तीत दोन विरोधाभासी गोष्टींची मूळात अपेक्षाच चूक नाही का??
कित्येक स्त्रियांना आपण घरात सून नसून कामाचा घरगडी आणतोय असे वाटते ... तोही हसतमुख ... वंशवृद्धी करणारा शक्यतो मुलाला जन्म देणारा ... त्यांना व्यवस्थित वाढवणारा ... आपली सेवा आनंदाने करणारा शिवाय नोकरी करून पगार हसत हसत घरच्यांना सोपवणारा अक्कलशून्य घरगडी...😃😃 मान्य सगळे मान्य ...... पण तुमचे काय ? सूनेची भूमिका तिच पुरातन जेष्ठांची मात्र आधुनिक.... असे कसे? आजकाल सगळ्या सिनियर सिटीझन्स ना मस्त enjoy करायचय .... उत्तम आहे जरूर करा पण घरातील नातवंडे तुमचीही आहेत ना !
जेष्ठांना वृद्धाश्रमाचा रस्ता सून दाखवते असा जो सर्रास आरोप केला जातो तो धातांत खोटा आहे. त्या वेळी आपण २५/३० वर्षे संस्कार केलेले आपल्या पाच सात पिढ्या उद्धरणारे पुत्ररत्न काय भूमिका बजावते हा प्रश्न कुणालाच पडत नाही. कोणत्याही घरात नविन येणारी मुलगी आपल्या पतीचे सर्वप्रथम पाणी जोखते. तोच आपला जोडीदार आहे त्याला आपलेसे केलेच पाहीजे हिच भावना तिची असते. त्याच्या आवडीनिवडी आत्मसात करते. त्याला आपल्या आई वडीलां विषयी प्रेम आदर आहे हे लक्षात आल्यावर ती त्यांचा अपमान करण्यास धजावत नाही. मात्र स्वार्थी मुलांचा विचारच होत नाही ... त्यांना मुळातच आई वडीलांचे प्रेम नसेल तर सून काय जादू करणार हे तिच्या पथ्यावरच पडते. मूळात घरातील काडीही बदलायचे स्वातंत्र्य जिला नाही ती काय सासू सासऱ्याना कुठे पाठवणार??? या बाबतीत तुमचे संस्कार आणि मुलाची भूमिका हिच गोष्ट सर्वाधिक महत्वाची आहे. वेळ आली तर बायको सोडू पण आईवडीलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही ही ठाम भूमिका ते घेत नाही ... असे का ?? हे कोणीच विचारत नाही.
उलट ज्याना मी मधल्या फळीची शिलेदार म्हणतेय त्या सामान्य असल्या तरी असामान्य कर्तृत्व करणाऱ्या आहेत . आपली घरे संसार ... सासूसासरे सारे व्यवस्थित सांभाळत असतांनाच त्या आपल्या आईवडीलांचा आधार बनल्या आहेत. कुठे केवळ एक अपत्य म्हणून तर कुठे केवळ बहिणीच आहेत म्हणून.... त्याहीपलिकडे जाउन नाकर्त्या भावांनी जवाबदारी झटकली म्हणून ... ह्या मुली आहेत ज्या सासूसासरेच नाहीत तर आईवडीलांचाही भक्कम आधार बनल्या आहेत. स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचारा एकदा सून पाठवू शकते वृद्धाश्रमात .... तिला देतोय का तेव्हढे अधिकार ?? स्वतःच्या नाकर्त्या जबाबदारी पासून पळ काढणाऱ्या मुलांना झाकण बंद करा.
काही दिवसांपुर्वी चीन मधील कुटुंबसंस्था या विषयावरील लेख वाचनात आला . लोकसंख्या नियंत्रणासाठी तिकडे एकच अपत्य सक्तीचा कायदा गेली काही दशके होता. आता या एकुलत्या एक अपत्याचे लग्न झाले की दोघांचेही आईवडील आणि त्यांचे पिल्लू असे सात जणांचे कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. काय हरकत आहे असा विचार आपल्याही कडे करायला ? या मधल्या फळीला आजमावून तर पहा! शिलेदार सज्ज आहेतच. 👍🏻
🔏© यशश्री रहाळकर
नाशिक
( आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत 🙏धन्यवाद ! )
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८
मधल्या फळीची शिलेदार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शीर्षक उत्तम !
उत्तर द्याहटवाधन्यवाद! अशाच साध्यासरळ तरीही दर्जेदार लेखांसाठी वाचत रहा kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
हटवाधन्यवाद! अशाच साध्यासरळ तरीही दर्जेदार लेखांसाठी वाचत रहा kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
हटवाधन्यवाद! अशाच साध्यासरळ तरीही दर्जेदार लेखांसाठी वाचत रहा kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
हटवाखरंचच आहे. मुलीकडं माणूस म्हणून पहा.. मैरीज मटेरीयल म्हणून नको..
उत्तर द्याहटवाआपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी...@ kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
उत्तर द्याहटवाआपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी...@ kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
उत्तर द्याहटवायशश्री खूप छान लेख. असा विचार केला तर समस्या बऱ्याच कमी होतील.
उत्तर द्याहटवाअगदी खरं आहे हे. लोकांचा सुने कडे पहाण्याचा दृष्टिकोन कधी सुधारणार देव जाणे. अवास्तव कल्पनाविलास करणाऱ्या सीरिअल्स या भयानक वस्तुस्थितीत अजून भर घालतात.
उत्तर द्याहटवा