फॉलोअर

रविवार, ३० डिसेंबर, २०१८

वयं मोठं खोटं

😳 ll वयं मोठं खोटं ll 😱
★★★★★★★★★★★★
          तिला वय विचारू नये म्हणतात ... पण मी माती खाल्लीच . माझ्या घरी कुमारिका पूजनाकरिता जिला बोलवायचे होते तिच्या आईला मी बोलून बसले  " सहा वर्षां ची आहे म्हणजे सौम्याला 26 नं फ्रॉक बसेल ना ग ??" सौम्या तीव्र फणकाऱ्याने किंचाळली " काहीही काय सांगतेस मम्मा.. अजून 2 months आहेत म्हणजे 60 days नंतर मी 6 yrs ची होईन ग ! "
देवा रे ! एकदा का आत्म्याने  ' स्त्री ' देह धारण केला की तिला वय विचारायचं नसतं... हे अगाध ज्ञान वेगवेगळ्या अनुभवा अंती मला प्राप्त झालंय. या कायम लहान असावे असे वाटण्यामागे काय बरं कारण आहे माहीत नाही पण कोणत्या का वयाची असेना तिला वय किंवा संबंधित प्रश्न विचारायचे नाही हे आता मला पुरतं कळून चुकलंय.
           कीटी असो किंवा गेट टूगेदर स्त्रिया चढाओढीने ' मी कशी इवली न मी कशी बाहुली ' हे सांगत असतात . कोणत्याच सोशल मीडियावरील प्रोफाइल मध्ये खरे वय त्या लिहितच नाहीत . म्हणजे 35 वय असेल तर 30 आणि 30 असेल तर 25 असा ढोबळ रेषो सहज खपून जातो हो ! पण कधीकधी प्रत्यक्ष आणि काल्पनिक वयातील तफावत काळ, काम, वेगाची सारी गणितच बदलून टाकतात. 
           गंमत सांगते ... माझ्या एका काकूची लेक 24 वर्षांची आहे .. (हे मी इतके खात्रीने सांगतेय कारण तिचा जन्म बरोब्बर माझ्या 9व्या वाढदिवसाला झाला होता ) परवाच्या एका घरगुती कार्यक्रमात काकूने ती माझ्यापेक्षा फारतर एक दोन वर्षांनी मोठी असल्याचे विधान केले 😆 मी इरेला पेटत तिच्या गणिताची शाळा घेतली " काकू तुझा तर बालविवाहच म्हणायचा ग ! पण 10 व्या वर्षीच तुला मुलगी झाली हे मात्र आश्चर्यच म्हणायचे " माझा हा स्पष्टवक्ते पणाचा खटाटोप अंगलट आला ... आता ती काकू भेटेल त्याला मी कशी वाया गेलीये उद्धट उर्मट??? आहे हे चवीने रंगवून सांगते. खरे बघायला गेलं तर ती काकू माझ्या पेक्षा वर्षांने मोठी झाल्याने मला काहीही फरक पडणार नव्हता ... पण माझा एक सद्गुण म्हणा की दुर्गुण आड येतोच मला जन्मतारखा वर्षे हे उत्तम लक्षात राहतात .
              "मी किती वर्षांची असेल ग ??" हा भिशीतील माझा अत्यंत नावडता😏 खेळ आहे. कारण मी मूर्खांसारखी माझं खरं वय सांगून बसले की बाकीच्यांचा माझ्याहून लहान होण्याचा अट्टाहास माझ्या डोक्यात जातो . " अय्या इंजिनियरींग फायनल ला आहे माझा पिंट्या .. वाटत नाही ना ?? अग लग्न लवकर होत आमच्या वेळी ..." वगैरे वगैरे ऐकून घेण्यात मला काडीमात्र रस नसतो . माझेच शब्द गिळतां ना मला ठसका लागतो ..अग बयो  लहानपणी म्हणजे पाचव्या वर्षी झालाय का लग्न? बरं तेही मान्य पण सातव्या वर्षी मूल झाले असे कसे होईल .
             91 वर्षांच्या आजीनेही मला वय ओळख विचारले तरी मी माझ्याहुन दोन वर्षांनी लहान असेच उत्तर देते 😂पण येथेही तुम्ही फसताच  साठीच्या पुढच्या स्त्री चे वय उर्ध्वगमन करीत असते . म्हणजे वाढत्या वयाबरोबर वयाचा आकडा वाढता असतो .. आता तिला तिचे वय झपाट्याने वाढवायचे असते .... "मी कशी तरणी " पेक्षाही " मी कशी हरणी " यात तिला प्रचंड रस असतो . मग पासष्टीची आजी वयाचा आकडा अंमळ वाढवून सांगते " अग सांगतेय काय ? सत्तरी गाठली न मी गेल्या महिन्यात .. आता सगळीे कामं करते  , हिंडतेय फिरतेय म्हणून वाटत नाही हा भाग वेगळा " ..... कृष्णा! तुझ्या बायकांनी आमच्यात कोण लहान असा पेच कधी टाकला का रे बाबा ?? नसावाच तरीच तू निवांत बासरी वाजवत बसला असावा.
          मागच्या पिढीत एक बरं होतं नवरा बायको पेक्षा फारतर चार सहा वर्षांनी मोठा असायचा . आताच्या नवीन ट्रेंड  नुसार  सर्रास 20 वर्षे लहान किंवा 20 वर्षे मोठे नवरे केल्याने ... वय काय हवे ते सांगता येते 👍 म्हणजे " आप्पा आहेत ग साठी चे पण मी 39 म्हणजे मी ईशा अन आप्पा म्हणजे विक्रांत सरंजामे " 😇
       31 डिसेंबर ला सारे जग नववर्षाचे स्वागत करत असताना माझी एक मैत्रीण अत्यंत दुःखी असते .. तिचा वाढदिवस नेमका त्याच दिवशी असल्याने नवीन वर्षात आपले वय वाढलेलं असल्याची खंत तिला आहेच शिवाय केवळ एकच  दिवसामुळे आपले जन्मसाल बदलल्याचं अतीव दुःख तिला आयुष्यभर भोगावे लागणार आहे . 😖
            आपला देश शून्याचा शोध लावणारा..  अनेक नामवंत गणितज्ञ आपल्याच देशातले ... एव्हढेच काय भारतीय माणसे जगभरात त्यांच्या स्टॅटास्टिक च्या  ज्ञाना करीता नावाजली जातात ..आपले dna गणितीय कामांकरीता सगळ्यात योग्य मानले जातात ... हे सगळं खरं हो पण वय सांगताना हेच dna कुठे झक मारायला जातात कोण जाणे ??
         उद्याचा दिवस कॅलेंडरचेच नाही तर तुमचे माझे सगळ्यांचेच वय वाढवणारा आहे .... पण हरकत नाही  वाढू देत वाढले तर . येणारे नववर्ष अनेक सुखद क्षणांची , मधुर भेटींची , हव्याहव्याश्या व्यक्तींची अन अनेक दिवस वाट पाहिलेल्या यशाची भली मोठठी पोतडीच घेऊन येणार आहे ..... या सगळ्यांच्या मोबदल्यात वय थोडस वाढतंय खुशाल वाढू देत... किती ?? ते मात्र विचारू नका .😊👍
🎊Happy New Year 2019 🎊

©🔏यशश्री रहाळकर
           नाशिक
        30/12/18

१३ टिप्पण्या:

  1. इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..... नवीन वर्ष नवीन आशा.....वय वाढलं तरी काय झालं खूप काही नवीन शिकता येईल..... खूप गोष्टी ज्या आत्तापर्यंत जमल्या नव्हत्या त्या करता येईल.... Positive विचार केला तर हम भी आसमान की बुलंदियोंको छू सकते है......उमर बढ रहि है उम्मीदे और भी बाकि है मेरे दोस्त.....

    उत्तर द्याहटवा
  2. वयाचे आणि माझा ही गोंधळ आहे, मला कळत नाही ते लपवण्यात काय मजा असो, वयाची आंधळी कोशिंबीर एन्जॉय करायची

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!