फॉलोअर

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

मोती , ॲन्जल आणि मी

मोती , ॲन्जल आणि मी 
〰〰〰〰〰〰〰〰
            अखिल मानवजातीचे दोन भागांत विभाजन करायचे झाल्यास, ' भाग१-कुत्रा अत्यंत आवडणारे ' आणि भाग २.... अपेक्षेप्रमाणेच कुत्रा न आवडणारे असे तुम्हाला वाटले ना !  अन्हं ... ' भाग २ - कुत्र्याला अत्यंत घाबरणारे ' ...तमाम श्वानप्रेमी आणि मनेकाजींची माफी मागून स्पष्ट करू इच्छिते की कुत्रा हा अत्यंत इमानी, प्रामाणिक आणि राखण्या करण्यास अत्यंत उपयुक्त पाळीव प्राणी आहे , याबाबत दुमत नाहीच आहे . शालेय निबंधात इतरांप्रमाणेच 'आवडता पाळीव प्राणी : कुत्रा ' असे आम्हीही लिहिलेय हो ! आक्षेप आहे तो या श्वानप्रेमींवर ..
            आपल्या घरी पाहूणे म्हणून आलेल्या व्यक्तीला आपण चहा कॉफी विचारली आणि त्यांनी मला ॲसिडीटी होते नको काहीच; असे सांगितले तर तुम्ही सहज स्विकारता ... " बघू बरं कशी होते"  म्हणून जबरदस्तीने चहा पाजता का ?? तद्वतच एखादी व्यक्ती " तुमच्या कुत्र्याला बांधून ठेवा ... भीती वाटते " 🥺 असे म्हणाली तरी "काही नाही करत ग तो ..  रॉकी किंवा टॉमी my good boy ... बैस ह्म्म " असे सांगून आम्हा लोकांची परीक्षा पाहत असतात .😟 हे टॉमी वगैरे मंडळी अखंड भूंकत असतात आणि उगाचच आपण चोर असल्या सारखे वाटत राहते.
             कुत्रा पाळणाऱ्या लोकांकडे मी बरेचदा जाण्याचे टाळतेच.  एकतर ती मंडळी बरेचदा हे विसरूनच जातात की आपल्याला कितीही प्रिय असला तरी आपल्या कुत्र्याचे इतरांना मुळीच कौतुक नसते .. ते अखंडपणे पोटच्या लेकराचे करावे तसे त्याचे कौतुक करीत असतात ...माझा टॉमी कसा good boy आहे ... किंवा माझी ल्युसी कशी good girl आहे ... त्यांच्या टॉयलेट हॅबीट्स , ते कसे घर स्वच्छ ठेवतात , ते कसे हव नको सांगतात त्यांना walk आवडतो मी नसली की तो काहीही  कसा खात नाही ... इथपासून ते कुत्रा मुलांचे भांडण सोडवतो , फोन receive करतो वगैरे वगैरे हे लोक मोठ्या अभिमानाने ऐकवत असतात ... आपण भ्यालेल्या सश्यासारखे अंग चोरून सोफ्याच्या कडेला बसलेलो ... आणि समोरच चार पाच पावलांवर आक्रमक पावित्र्यात टॉमी .....😨
             बरं ! यांच्या प्रिय कुत्र्याला 'कुत्रा ' म्हणू नका हाही यांचा आग्रह असतो तुम्ही जरी त्याला family member मानत असाल तरी इतरांच्या दृष्टीने तो कुत्राच असतो ... आणि त्याची (ते कबूल करत नसले तरी) त्यांना अत्यंत भिती वाटत असते .
         सकाळी morning walk ला आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला जाणाऱ्या लोकांचे अतीव कौतुक आदर वाटतो मला ... एकतर समाजहीतासाठी ते कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आणि लांब दोरी बांधतात .. दुसरे म्हणजे ते भरपूर चालतात ... आमच्या परीचयातील एक काका त्यांच्या रॉनीला घेऊन अखंडपणे चालत असतात ... इतके की त्यांच्या गुडघ्याच्या वाट्याच झिजल्या नसत्या तर नवल !
              माझ्या लेकीच्या वर्गमित्राने आपल्या आईसमोर लहान भाऊ आण नाहीतर कुत्रा आण असे पर्याय ठेवून घर डोक्यावर घेतले होते .. तिने काय केले माहीत नाही ...माझ्या पुढे असा पेच कधी पडला नाही पण मी पहिलाच पर्याय निवडला असता यात शंकाच नाही 😝 ...
            माझ्या आईच्या मैत्रीणी नवरे घरी नसले किंवा जेवायचा कंटाळा आला की दूध पोळी कुस्करून खायच्या आणि एकमेकींना म्हणायच्या "आज मी मोती कुत्रा " .... हे मोती प्रकरण इतके फिट्ट बसले होते डोक्यात की लग्न जमलेले असतांना भावी नवऱ्याने विचारले " मोती आवडतो तुला ? " ... मी तडकून उत्तरले " मला मोतीच काय पण कोणताच कुत्रा मुळीच आवडत नाही ...😡" .... 😳तो बिचारा मोती  pearl या अर्थाने विचारत होता ...🤦🏻‍♀त्याने  चार दुकाने हिंडून आणलेल्या मोत्याच्या ब्रासलेट वर मी अक्षरशः पाणी ओतले ... मात्र त्यामुळेच की काय गेले कित्येक वर्षे कुत्राच काय कोणताच प्राणी पाळायची इच्छाच त्याला झाली नसावी.
              बंगल्यात किंवा एकाट घरात सोबत किंवा राखण म्हणून कुत्रा पाळतात हे योग्यच आहे मात्र अपार्टमेंटमध्ये जेव्हा लोक कुत्रा पाळतात तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांची दया येते ... आमच्याच खालच्या मजल्यावर एक भाडेकरू नुकतेच  राहावयास आले त्यांच्या कडे पामेरीयन ( हम आपके है कौन मधला टफी ) प्रकाराचे कुत्रे sorry कुत्री आहे ... तिचे नाव Angel असे पुढे कळले .... तर ह्या Angel ला बाल्कनीत ठेवून ते संध्याकाळी बाहेर गेले ... चार पाच तास अखंडपणे ही Angel भुंकत होती ...  सोसायटीतील अर्ध्या लोकांनी डोक्याला बाम लावले उरलेल्यांनी घरमालकाला शिव्या घातल्या .... शेवटी एकदाचे ते परतले ... तेव्हा ती Angel शांत झाली "तिला एकटेपणा अगदीच सहन होत नाही " त्या बाई प्रेमाने उत्तरल्या ...🤭
               आता ही angel म्हणावी की demon हा प्रश्न आम्हा पामरांना पडला .... रस्त्यांवर भटकणाऱ्या आणि रात्री एकत्रितपणे कर्कश्य भुंकणाऱ्या मुक्त भटक्या कुत्र्यांबद्दल तर बोलण्याचेही धारीष्ट्य आमच्यात नाही ... अश्या मध्यरात्री भेसूर रडणाऱ्या श्वानांवर खिडक्या आणि बाल्कनीतून रीकाम्या तेल शांपूच्या बाटल्यांचा भेदक आणि अचूक मारा केला जातो ... किती निर्घृण आहे हे असे एखाद्या श्वानप्रेमीस वाटले तर काहीच चूकीचे नाही ... आपल्याकडे माणसे वगळता  सगळ्याच  प्राणिजगताचा हल्ली लोकांना कोण कळवळा आहे .
               पूर्वी शेतांवर राखण म्हणून किंवा  श्रीमंतांच्या महालात कुत्रे पाळलेले असायचे . खरेतर कुत्रे अत्यंत इमानी राखणीस वेळेला कोल्ह्या लांडग्याशी झुंजतील .... शेतातील कोंबड्या गुरेढोरे यांची जागती राखण करायला त्यांचा खरा उपयोग .... काही दिवसांपूर्वी 'अल्फा ' नावाचा एक हॉलिवूड पट पाहिला ... अलौकिक सुंदर. त्यात आदीमानवाची रानटी कुत्र्याशी ओळख व पुढे गट्टी कशी झाली हे फार सुरेख दाखवले होते . इतक्या इमानी प्राण्याला आजकाल अक्षरशः शो - पीस म्हणून पाळले जाते ... बरेचदा status symbol म्हणून मिरवले जाते ... ह्या गोष्टीचे मनस्वी दुःख होते . 'पग ' ह्या प्रकारचे कुत्रे वोडाफोन ने प्रसिध्द केले .. नंतर लोक ते आवडीने पाळू लागले खरेच ते लोभस दिसते ... पण म्हणून अनेक परदेशी ब्रीड चे कुत्रे भारतात आणून पाळतांना त्या कुत्र्याला आपले वातावरण योग्य आहे का हा विचार मात्र हे श्वानप्रेमी कितपत करतात कोण जाणे ??
           अमेरीकेत  घराघरांत कुत्रा पाळला जातो असे वाचनांत आले . तेथील एकांडे जगण्याच्या पद्धतीमुळे कदाचित पाळीव प्राणी ही त्यांची गरज असावी ..... मात्र भारतात जिथे लोकांना नाती लाभलीयेत , कुटुंब अजूनही शाबूत आहेत ,प्रेम करणारी गप्पा मारणारी मित्रमंडळी आहेत तरीही कुत्रा पाळण्याची गरज वाटू लागलीय , ही चिंतेची बाब आहे . कुत्रा ही शिवी आहे , हे कधीच पटले नाही मला .. त्याच्यातील दोन पाच टक्के इमानीपणा  माणसानं घेतला तरी सारे जग बदलेल .
©🔏यशश्री रहाळकर
         नाशिक
      १५/१२/18

२१ टिप्पण्या:

  1. आम्ही दुसऱ्या गटातील. घाबरणारे. छान लिहिलेस. पण अजून एक या कुत्रप्रेमिंची सवय दुसऱ्याच्या घराबाहेर आपल्या कुत्र्याला घाण करायला बसवायचे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हा हा ... असेल .... धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी

      हटवा
    2. Khupch khare lihile ahes mi ya saglya anubhav arun gele ahe amchya kade kutra ahe toki ,tula tar mahitach ahe ,mitrana tyacha kuthlyahi prakarcha tras hou naye yachi sarv to pari amhi sarva chhan kalji gheto,ani vyaktigat malahi evdhi nahi awad pali pranyanchi pan ata savyine mihi prem karte tyachyavar tehi khup prem kartat g ani ho tu mhante kutra hi shivi nahi hou shakat he khup bhavle,pan te pab kutre mala titke se nahi aadat bai, he hi agdi kharay ani manse na kutrya che ati laad kartat ani mansana zidkartayt,he hi thambayla havay kutra apla sobati ahe tasech manse ani nati hi apli jagnyachi toniks ani garaj ahe he hi titkech khare,lekh sundar nehmi pramane.


      हटवा
    3. अगदी खरे आहे मी अनुभवलय ....तुमचे विचार खरेच विचार करायला लावणारे आहेत .
      मनापासून धन्यवाद !

      हटवा
    4. अगदी खरे आहे मी अनुभवलय ....तुमचे विचार खरेच विचार करायला लावणारे आहेत .
      मनापासून धन्यवाद !

      हटवा
    5. अगदी खरे आहे मी अनुभवलय ....तुमचे विचार खरेच विचार करायला लावणारे आहेत .
      मनापासून धन्यवाद !

      हटवा
  2. Yash aamhi dusarya gatatil aahot. Kutre te palalele aso ki roadwarche tyala " Had Had " kelyashiway aamche jamatch nahi. Tuza lekh khupch chhan aahe tu lihitesh khup Sundar. Tuzya hatatch Saraswati Mata aahe.
    Pan mastch hmm

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हातात आहे की नाही माहित पण सरस्वतीने हात ठेवलाय डोक्यावर तो तसाच असू देत बास ..
      मनापासून आभार प्रतिक्रियेसाठी

      हटवा
    2. हातात आहे की नाही माहित पण सरस्वतीने हात ठेवलाय डोक्यावर तो तसाच असू देत बास ..
      मनापासून आभार प्रतिक्रियेसाठी

      हटवा
    3. हातात आहे की नाही माहित पण सरस्वतीने हात ठेवलाय डोक्यावर तो तसाच असू देत बास ..
      मनापासून आभार प्रतिक्रियेसाठी

      हटवा
  3. खुपच सुंदर ! असेच वेगवेगळ्या विषयांवर लिहित रहा.--
    ज.स.शिंदे सर.

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!