कालसापेक्ष (भाग 2)
♾♾♾♾♾♾♾♾
पूर्वार्ध :- https://kattayashashri.blogspot.com/2019/01/blog-post_5.html?m=1
मी रखमाबाई वर अक्षरशः किंचाळले " रखमा डोळे आहेत का बटणं आहेत ?? तो.. तो ग समोरच्या खांबाला टेकून उभा आहे दिसत नाहीये ... पांढरा झब्बा पायजमा घातलाय ,सोनेरी काड्यांचा चष्मा , विरळ केस... बघ बघ ... इकडेच बघतोय . एव्हढा माणूस दिसेना तुला ?? " ... रखमाबाई आपला हात वासलेल्या तोंडाकडे नेत बोंब मारू लागली " झपाटल्यागत काहून करताय ओ बाई ! तिथे रस्त्या पलीकडं कुणीबी न्हाई ...त्यो तुम्ही म्हनताय तसला बी न्हाई नी कुणीच न्हाई . " रागानं दात ओठ खात मी रखमाला घराबाहेर काढलं ... " वेडी आहे का मी ?? कुणी नाही म्हणे जा ग जा तुझ्या कामांना ... मागच्या महिन्यात पगार वाढवून मागितलास, दिला नाही ना मी ... नाहीच देणारेय जा जा निघ" म्हणत तिच्या तोंडावर धाडकन दार लावून घेतलं.
त्या दिशेला पाहणं च नको म्हणून मी त्या बाजूची सगळी दारे- खिडक्या बंद केल्या पडदे सोडले आणि मस्त पुस्तक घेत आडवी झाले .क्षणभरात गाढ झोपेतही गेले . मस्त हलकं हलकं वाटत होतं मला .. मी माहेरी गेले अंगणात भोंडल्याची गाणी ..आईनाना सगळे जमले होते ... फक्त मी खेळत मात्र नव्हती मी बघत होते सिनेमाच्या खेळासारखं ... शाळेत गेले ,पुढे लग्न लागले अगदी सासरी माप ओलांडून आले तेव्हा नजर वर करून पहातेय तो काय ?? घरात तोच माणूस खांबा पलिकडचा रोखून पहात तसाच उभा ...मी खडबडून जागी झाले.बराच वेळ झोप लागली असावी पण आराम झालाच नव्हता .. उलट खूप खूप थकवा आला होता मोठा प्रवास केल्यागत ... अती ताणान डोकं जड झालं होतं ... घराची डोअर बेल घणाणत होती ... धाकटे चिरंजीव वैतागत ओरडत घरात आले " काय हे आई केव्हाची बेल वाजवतोय?? कितीदा सांगतो latch key द्या ... पण नाही,लहान आहेस" " अरे सारंग राजा जरा डोळा लागला रे !"
माझा दुखरा आवाज अन थकलेला चेहरा पाहून त्यानं विचारलं " काय ग आई बरं नाही का वाटत? " मी तिथेच सोफ्यावर बसकण मारली . पाठोपाठ घरात येणाऱ्या सुमेधने मोठ्या लेकाने कॉलेज मधून येताच घराचा ताबा घेत कॉफी केली अन क्रोसीन दिली . कशीबशी घेत मी पुन्हा आडवी झाले ... पुन्हा तोच खेळ सुरू झाला ...मी धावतेय जणू वेगाने ... जुने दिवस मंतरलेले क्षण ..लग्नानंतर आम्ही केरळला गेलो होतो... पार क्षितिजाला टेकलेला समुद्र वाळूवर हे आणि ती बसलेले ... गुलाबी सुरेख साडीत ..ती मीच होती की तेव्हाची... हे सगळं मी पाहत होते तेव्हढ्यात नारळाच्या झाडाला टेकून तो उभा तसाच माझ्याकडे रोखून पाहत .... मी जागी झाली तेव्हा थंडी भरून थरथरत होते ...साधारण 9 चा सुमार असावा हे घरी आले .. मी टेरेसचे दार उघडून यांना रस्त्याच्या त्या दिशेला बोट करत काही बोलणार एव्हढात कोसळलेच... किती क्षण किती तास किती दिवस ?? ठाऊक नाही .. मी ऍडमिट होते कुठल्याश्या मोठ्या हॉस्पीटलमध्ये जबरदस्त मानसिक आघात झाला असावा असे काहीसे डॉक्टर म्हणत होते ... मधून मधून मी शुद्धीवर येई अन पुन्हा तो दिसायचा कुठेतरी .... माझ्या भूत भविष्य कर्तमान सगळ्या काळात तो होताच तसाच रोखून पाहत उभा ..
नेमके किती ते माहीत नाही पण काही दिवसांनी मला घरी आणलं ... सौरभ माझे पती माझा हातात हात घेऊन म्हणाले "ए वेडाबाई! किती त्रास करून घेतेस छोट्या छोट्या गोष्टींचा स्वतः ला? एव्हढं काय मनाला लावून घ्यायचं ... कशी दिसतेस बघ आराशात स्वतः ला ." मी आराशात डोकावले ... खरच मी खूप विचित्र दिसत होती ... गालांची हाडं वर आलेली अन बटबटीत डोळे रोखून पाहणारे त्याच्याच सारखे ... मला तो आठवला रस्त्या पलिकडचा ... माझ्या प्रतिबिंबात आरश्यात तोच दिसला मला ... मी... मी किंचाळले ...." कोण आहेस तू? काय हवंय तुला ?का का पाहातोएस असा माझ्याकडे रोखून.." ... हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच जाऊ लागला कधी मला दुधावाल्याच्या जागी तो दिसायचा तर कधी पेपर टाकणारा तोच आहे असे वाटायचे ... भाजीवाला फळवाला तोच असून रोखून बघतोय माझ्याकडे म्हणून मी ओरडायला लागत असे ...स्वतः ला दारखिडक्या बंद करून मी खोलीतच कोंडून घेतलं ... बहुतेक मी झोपायचे अन जुन्या आठवणीत रमायचे, बघत असायचे त्रयस्थपणे... अचानक तो दिसायचा अन मी जागी व्हायचे...झपाट्यानं घटणार वजन अन वाढणार त्याचं गडद अस्तित्व...एव्हाना सौरभची खात्रीच झाली होती की मला मानसिक आजार झाला असावा ....त्यासाठी त्याने सायकियाट्रीस्ट ची अपॉइंटमेंट घेतली .डॉक्टरांचे म्हणणे असे पडले की मला भास होताहेत ..." पण मला तो माणूस दिसतो ...रोखून पाहतो माझ्या कडे " मी ठामपणे म्हणाले ..... डॉक्टरांनी बरीच औषधे दिलीत कशी घ्यायची सांगतांना ते सहज म्हणाले " तुम्हाला तो दिसतोय तो जो कोणी आहे तो पाहतोय ना नुसताच .. काही करत तर नाही ना? अहो विचारा त्यालाच एकदा ... मिळेल उत्तर ? "
डॉक्टरांकडून घरी येईपर्यंत मी याचाच विचार करत होते .मुलांचे सुकलेले चेहरे , नवऱ्याचा ताण काही केल्या सहन होईना मनाशी ठाम निश्चय केला आता हा जो कोणी आहे त्याला भेटायचं आणि विचारायचं का त्रास देतोस असा? का छळ मांडळायस बाबा ??काय हवंय तरी काय तुला ?
मला ना भास होत होते ना वेड लागलं होतं . तो होता हे सत्य होतं अन तेव्हढच सत्य हेही होतं की तो फक्त मलाच दिसू शकत होता .आता इतरांना न दिसणाऱ्या त्याचे गूढ मलाच सोडवायचे होते . भूत किंवा अमानवीय काही असेल का तो ?? माझेच एक मन म्हणाले ... आता ह्या पेक्षा काय होणार ... काय व्हायचे ते होऊ देत ...मी याचा शोध लावणारच ... अखेर मी खंबीरपणे त्याला भेटायला जाण्याचे ठरवले.. रात्रीच्या गोळ्या न घेताच गुपचूप फेकून देत मी झोपेचं सोंग घेतलं ... रात्री सगळे गाढ झोपले ती वेळ साधून मी हळूच दार उघडून बाहेर पडले ... हृदयाची धडधड जवळपास दुप्पट वाढली होती .. निश्चयाने मी गेट ओलांडले ... त्याच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिले...माणूसच होता तो .. अगदी चारचौघासारखा तो तसाच रोखून पाहत होता ... मी जळजळीत द्वेषाने त्याच्यावर प्रश्नांची तोफ डागली .. " लाज नाही वाटत तुला ? का छळतोस असा मला ? वेड लागायची वेळ आली .. जात का नाही तू निघून ... बोल काहीतरी .. सांग रे काहीतरी सांग ..." तीव्र संतापाच्या अखेरीस मी ढसाढसा रडायला लागले ... त्यानी त्याच तीव्र नजरेनं अन भावनाही चेहऱ्याने सुचकपणे त्याचा हात पुढे केला .. मी क्षणभर विचार केला अन माझा हात त्याच्या हातावर ठेवला ...............
सकाळी राजेंच्या घरावर शोककळा पसरली होती . संध्या राजे अचानक घरातून गायब झाली होती. तिच्याकडे लक्ष दिले नाही यासाठी सौरभ स्वतः ला कोसत होता... कुणी ती पळून गेली म्हणत होते तर कुणी जीव दिला म्हणायचे . मध्यरात्री कधीतरी बहादूरने तिला बाहेर पडताना पाहिले ते अखेरचेच ...रखमाबाई सगळ्या सोसायटीत संध्याला भुताने झपाटल्याच सांगत सुटली ... अखेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली गेली " वेडाच्या भरात संध्या राजे बेपत्ता. " ........ संध्या राजेच नेमकं काय झालं .....🙄
(क्रमशः ... अखेरचा भाग लवकरच )
🔏©यशश्री रहाळकर
नाशिक
01/02/19
आता तिसऱ्या भागाची उत्सुकता आहे।
उत्तर द्याहटवातिसऱ्या भागाची उत्सुकता आहे
उत्तर द्याहटवाउत्सुकता जास्त ताणू नकोस.
उत्तर द्याहटवाChhan
उत्तर द्याहटवाबाप रे!! पुढे काय घडलं लवकर सांग बाई
उत्तर द्याहटवा