फॉलोअर

बुधवार, १८ मार्च, २०२०

प्रेमा तुझा रंग कसा??

प्रेमा 💘तुझा रंग कसा 💞

            प्रेम म्हटले की लाल गुलाबी रंग डोळ्यांसमोर तरळून जातो... लाल गुलाब 🌹लाल हार्ट❤ गुलाबी भावना 💗वगैरे वगैरे म्हणजेच प्रेम असं काहीसं वाटून जातं.. प्रेम मैत्री असेल तर पिवळा 💛असूही शकेल कधी तर कधी एकतर्फी क्रूर 🖤काळाही असेल .💙आकाशा सारखं नीळ प्रेम ..... म्हटलं तर पटेल का हो?? अश्याच एका अथांग मोठ्या मनाच्या 'त्याची' ही कहाणी.
                निलय गुणवंत कुलकर्णींचा एकुलता एक लेक ... घरात आजी आजोबा काका काकू त्यांच्या 2 मुली आणि निलंयचे आईबाबा असं 9 माणसांचं भरलं गोकुळ ... सगळे एकत्र आनंदात राहत. निलय सगळ्यांचा लाडका . शेजारी राहणारे देवळे कुटुंब त्यांचे अगदी घरोब्याचे...कुटुंबप्रमुख लक्ष्मीकांत देवळेेंचा मोठ्ठा business चा पसारा होता.. घरात त्यांची पत्नीआणी लेक सोहा असे इवले कुटुंब. निलय आणि सोहा अगदी खेळघरापासून एकाच वर्गात ... दोन्ही घरे शेजारी म्हणण्या पेक्षा सख्खे शेजारी म्हणावे असा दृष्ट लागण्याजोगा सलोखा....
                  सोहा 11 वर्षांची होती तेव्हा एका तापाच निमित्त झालं नी सोहाची आई देवाघरी गेली ... या काळात निलयच्या आईनं तिला खूप सांभाळून घेतलं. लक्ष्मीकांत देवळेंनी स्वतः ला business च्या व्यापात बुडवून घेतलं. सोहा वयात येण्याच्या अवघड काळात निलयच्या आईनं ह्या पोरक्या लेकीला मायेच्या पदराआड घेतलं होतं . सोहा बहुतेकवेळ निलयकडेच असे .. त्याच्या बहिणींमध्ये ती रमून जाई . हळूहळू ती त्याच घराचा जणू भाग बनली. सोहा आणि निलय दोघेही वाढत्या वयासोबत एकमेकांचे जिवलग मित्र नी पुढे जाऊन प्रियतम बनले... ह्या गोष्टीला आक्षेप घेण्याचं कुणालाच काही प्रयोजन नव्हतं. सोहा सगळ्यांची लाडकी होती. निलय स्थिरस्थावर झाला की दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ असा विचारही दोन्ही घरून बोलल्या जात होता.
                       निलय त्याच्या नव्यानेच लागलेल्या नौकरीत चांगलाच व्यस्त होता.. इंजिनियरींग पूर्ण होताच त्याला हा जॉब कॅम्पस मध्येच मिळाला. जरा बेताचा पगार पण खुश होता तो ..  आता officialy सोहाच्या वडिलांना लग्नाचे विचारावे असा बेत त्याने पक्का ठरवला. पण तेव्हढ्यात त्याला एका प्रोजेक्ट साठी हैदराबादला जावे लागले... 2 महीने त्याला तिथून हलताच आले नाही... त्या प्रोजेक्ट च्या यशासह निलय प्रमोशन देखिल घेऊनच परतला.
                 दुसऱ्याच दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी तो देवळे काकांकडे गेला... आणि आढेवेढे न घेता त्याने सरळ सोहाचा हात मागितला... आता त्याला लवकरात लवकर सोहा त्याची पत्नी झालेली हवी होती. अपेक्षेप्रमाणे त्याला होकार मिळाला नाही... "सोहाची तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा नाही "असे सांगून देवळे काकांनी नकार दिला. निलयच्या पायाखालची जमीनच सरकली. कालपासून सोहाची आपल्याकडे एकही चक्कर नाही ... एव्हढ्या दिवसांनी आलोय तरी भेटलीही नाही ... हळूहळू एकेक गोष्ट त्याला आठवायला लागली.
घरात तो परतला तोच उध्वस्त होऊन ..घरी त्यानं झाला प्रकार सांगितला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला  "एकदा माझ्याशी बोलायला नको का?? असं अचानक काय झालं ते?" निलयाच्या आईच्याही सोहाच्या वागण्यातील बदल लक्षात आला होता. काहीतरी बिनसलंय नक्कीच! बडबडी सोहा गेले काही दिवस गप्प गप्प होती... त्यांच्या घरी येणं टाळत होती.  काही दिवसांतच तिच्या बाबांनी तिचं लग्न ठरवल्याच निलयला कळलं... अतिशय श्रीमंत बीजवर शिवाय वयाने बराच मोठ्ठा असं ते ठिकाण होतं... एकंदर सोहाला पैसा हवा होता तर... कुलकर्णी कुटुंब मनातून दुखावले.
                  एक दिवस निलयची आई सोहाकडे जाऊन धडकली...अतिताण असल्याने फिकुटलेली निस्तेज अर्धी झालेली सोहा पाहून अक्षरशः पोटात तुटलं .त्यांनी स्पष्ट केलं," इथं मी निलयची नाही तर तुझी आई म्हणून आलेय. काय झालं ते सांग पाहू तुला माझी शपथ" म्हणून  त्यांनी तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. निलयाच्या आईच्या गळ्यात पडून सोहा धाय मोकलून रडू लागली. उरातली जखम तिनं उघडी केली. काही दिवसांपूर्वी घरी राहायला आलेल्या आत्याच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला होता... तिचे पापा नेमके उशीरा घरी आले त्यांना सारेच कळून चुकले पण उशीर झाला होता.अर्धमेला होईपर्यंत त्यांनी त्या नराधमाला चोपले.. बहिणीचा नवरा म्हणून जीव घेता येईना. पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवावी तर बहीण पाय धरून रडू लागली.. तिलाही दोन लग्नाच्या मुली होत्या.. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार शिवाय एकदा तक्रार केली की मीडिया तिखटमीठ लावून बदनाम करणार... तीन मुलींचे आयुष्य उध्वस्त होणार ...असे त्या आत्याने सोहाच्या बाबांना समजावले. सोहाचे कुणालाच काही न सांगता लग्न लावून देण्याचे ठरले. तसेही निलयचे आणि तिचे प्रकरण सगळ्या जगाला ठाऊक होते . घरात घडलेली गोष्ट बाहेर न सांगता दाबून टाकणे शक्य होते.
मात्र सोहाचे निलयवर खरेखुरे प्रेम होते .त्याला अश्या प्रकारे न सांगता फसवून लग्न करणे तिला खरंतर शक्य होते पण तिच्या आत्म्याला ते मंजूर होत नव्हते. तिने निलयला लग्नाला नकार कळविला ....पण त्याच्याविना राहण्याची कल्पना तिला मान्य नव्हती. पाण्याविना माश्याची व्हावी तशी तिची तडफड होत होती. 
              तिच्याशी एक अक्षरही न बोलता तिच्या डोक्यावर थोपटून निलयची आई त्याच्याकडे परतली. आज त्यांच्या संस्कारांची, निलयच्या प्रेमाची आणि त्यांच्यातल्या स्त्री ची परीक्षा होती. घडला प्रकार हृदयावर दगड ठेवून त्यांनी निलयला सांगितला... क्षणभर तो विचारात पडला आणि आईला म्हणाला , 
" हे सारं एक दुःस्वप्नं म्हणून विसरता येईल तिला किंवा accident म्हणून ...जखमा भरून येतात शरीराच्या.. तश्या मनाच्या येतील भरून?" आईनं आश्वासकपणे उत्तर दिलं," कुणी साथ दिली तर कदाचित... " निलयनी आईच्या डोळ्यांत पाहत विचारलं ," तो कुणी मी असेन तर ..." प्रसन्न हसत आई म्हणाली.. " एक स्त्री म्हणून तुझ्यावर केलेल्या संस्कारांसाठी तो माझा सर्वांत मोठा गौरव असेल." 😊
           दुसऱ्याच सकाळी निलय सोहाला भेटला .. तिला एकच वाक्य म्हणाला ," मी लग्न करीन तर केवळ तुझ्याशी. आता मी आयुष्यभर अविवाहित राहावे असे तुला वाटतंय का?" 😢 सोहा त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली... साध्या पद्धतीने दोघांनी लग्न केलं .. तितकंच मायेनं निलयनी सोहाला जपलं देखिल... स्त्री देह म्हणजे पावित्र्याच्या संकल्पना आल्याचं .. ... तिचा दोष असो नसो. फारच थोडे लोक असे असतात जे तिच्या पवित्रतेचा संबंध मनाच्या पावित्र्याशी जोडतात. त्याला निलय आणि त्याच्या आईसारखं मोठ्ठ मन असावं लागतं. आकाशासारखं अथांग सारे उल्कापात ,ग्रहणे सामावून घेणारं...... लग्नानंतराचा पहिला प्रेमदिन होता . सोहानी आपलं प्रेमपत्र लिहायला आवर्जून निळ्या रंगाचा पेपर निवडला...प्रिय निलय... पुढचं सारं तिच्या अश्रूंनी पुरं केलं.
©🔏यशश्री रहाळकर

५ टिप्पण्या:

  1. नेहमीप्रमाणे ,खूप छान कथा.
    निलंय हे नाव खूप आवडले, नावाप्रमाणेच अथांग असे त्याचे प्रेम,अप्रतिम👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान लेख आहे.
    अलक कथा प्रकारातील आहे.
    विषयाची मांडणी छान आहे.
    समाजातील दुष्टप्रवृत्ती व चांगली प्रवृत्ती यांवर आधारित आदर्श मांडला आहे.
    पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान आहे. विषय खूप छान मांडला आहे. शब्दांकन छान.

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!