काही वाचकांची मला भारीच गंमत वाटते... आवर्जून गूढ कथा किंवा भय कथा वाचतात आणि , "अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी कथा आहे." अशी कमेंट करतात. भय किंवा गूढ ह्या भावनेची निर्मितीचं अज्ञानातून होत असते. ज्या प्रश्नांची सामान्यपणे उकल होत नाही, ज्यांची उत्तरे मिळत नाहीत त्याचेच तर गूढ वाटते ना! अमानवीय शक्तींचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले लोक फारच थोडे असतात... बाकीचे त्यांच्यावर पूर्ण डोळे झाकून विश्वास ठेवणारे लोक ... बहुतेक कथा ऐकीव असतात... त्यामुळे लेखकाला वेठीला धरून, "ही सत्यकथा आहे का?" असे विचारणेही गंमतीशीर नाही का! तरीही भयकथा सुरस वाटतात...👍😊 कारण ह्या गूढाचं एक सुप्त आकर्षण असतं.... वातावरण भारून टाकणारं... लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहुणे राहुणे सगळे बच्चेकंपनी गच्चीवर झोपायला जायचो... तेव्हा भयकथा किंवा भुताच्या गोष्टी ऐकण्यातली गंमत ज्यांनी अनुभवलीये त्यांनाच ही मोहिनी भरून टाकेल. एक उत्तम स्टोरी टेलर फक्त हवाच... लहानपणी असा कुणीतरी असतोच ...👍 आम्ही भावंडे जमलो की एक काका अश्या कथा अगदी रंगवून रंगवून सांगायचा... त्यात अमावस्या असेल तर विचारूच नका... नारळाच्या झावळ्यांच्या सावल्या, वाऱ्याचा आवाज, गुलमोहराची सळसळ करत येणारी शेंग आणि ... आणि निरव शांतता. तर्क कुतर्क काढत बुद्धीच्या दगडावर तासले की भयाची धार बोथट होते. म्हणूनच सांगणारा खरचंं सांगतोय ... हा विश्वास हवा. मग काय तहानेनं घश्याला कोरड पडली तरी पाणी प्यायला जायची हिंमत होत नाही..... असेच एकदा जमलो असू तेव्हा ऐकलेली एक कथा "ओल्या बाळंतिणीची" काकानी कथा सांगायला सुरूवात केली..
"सगळ्या भुतांत पॉवरफुल भूत कोणतं सांगा बरं??? "
असाच प्रश्न विचारून कोणत्याही कथेची सुरुवात होई... आता भूतचं ते त्यात काय सगळी सारखीच ... असं वाटत असेल तर तुम्ही साफ चुकलात... हडळ, खवीस, मुंज्या, झोटिंग असे अनेक प्रकार त्यात आहेत ...
"सगळ्यांत डेंजर असते ती म्हणजे ओली बाळंतीण... एकदा अश्शी मानगूट धरते की आरारा!...सोडतच नाही.... माणूस मग ...(आकाशाच्या दिशेने बोट म्हणजे गेलाच समजा..असा अर्थ घ्यायचा) "
असं म्हणत काका आमच्यातल्या कुणाचीतरी मानगूट आवळून धरे... आणि भीतीची सर्र लहर अंगावरून जायची. घड्याळाची टिकटिक, बुटांचे आवाज, कर्र ss र करणारं दार अश्या आवाजाने भीतीने थरकाप उडायचा. जुनं पडीक घर, खचलेला वाडा , अंधारी रात्र, कोसळता पाऊस अश्या रंगभूमीची कल्पना चितारून भयकथेला सुरुवात व्हायची.
सत्तरच्या दशकातली गोष्ट आहे, तशी जुनीच म्हणायचीे पण अगदी कालपरवा घडली असे वाटावे इतकी ताजी... मी अकोल्याला शिकायला म्हणून साने वाड्यात राहत होतो. साने वाडा म्हणजे कसाबसा जुन्या फळकुटांवर भिंतींनी तग धरून उभा असलेला अगदी जुनाट वाडा... घरातील कर्ती व्यक्ती म्हणजे माई साने. पतीच्या निधनानंतर त्यांचा चरितार्थ कसाबसा त्या ओढीत होत्या. राहत्या 2 खोल्या स्वतःकडे ठेऊन बाकीच्या सगळ्या खोल्यांत भाडेकरी ठेवले होते.. माझ्यासारखी शिकणारी आणिक 2 मुले आणि 2 नोकरी करणारे गृहस्थ असे एकूण पाच जणांचे डबे सुद्धा त्याच देत. पदरात आठ मुलांना सोडून घरातला कर्ता पुरुष सोपानराव दोन वर्षांपूर्वीच निर्वतले होते... त्यामुळे परिस्थिती अत्यंत हलाखीची म्हणावी अशीच होती. त्यांच्या मोठ्या दोघी लेकी अगदी बरोबरीच्या जया ताई आणि नभा ताई... सव्वा वर्षाच्या फरकाने लहान मोठ्या ... त्या काळच्या सोयीस्कर पद्धतीप्रमाणे मॅट्रिक होताच नर्सिंगला गेल्या... आपल्या आईचा संसार सावरायचा , पाठचे 3 भाऊ त्यांचे शिक्षण करायचे, 3 धाकट्या बहिणींची लग्ने करायची अशी स्वप्ने पाहत शिकत होत्या. दोघी अतिशय समजूतदार... नर्सिंग होताच दोघी नोकरीत लागल्या. जया ताईला यवतमाळ मिळाले तर नभा ताईला नागपूरचे मेडिकल कॉलेजचे हॉस्पिटल. दोघी हुशार मेहनती... मी साने वाड्यात राहायला गेलो तेव्हा त्या दोघींना नोकरीला लागूनही काही वर्षे झाली होती. सुट्टीत दोघी यायच्या अधून मधून... भावंडांना खाऊ आईला कापडचोपड , वाणसामान घेऊन येत.
जया ताई यवतमाळला मामाच्या घरी राहत असे म्हणून तिची बचत अधिकची होई... नभा ताई तिच्यामानाने क्वचित घरी येई... यायची ती मोठ्ठी सुट्टी घेऊनच.. नभा ताई म्हणजे बडबडी, प्रसन्न व्यक्तिमत्व , सगळ्यांची चौकशी करणार, गप्पा मारणार. मात्र ह्या वेळी काय झाले होते कोण जाणे?? ती आली तिच् निर्माल्य होऊन... सुकलेल्या निष्प्राण फुलासारखी. वाड्याच्या पायरीवर कुठेतरी शून्यात नजर लावून तासन तास एकटीच बसलेली असायची. तिला आवाज दिलाच कुणी तर अश्या काही नजरेने पहायची की जणू पेटते निखारे... भावंडे तर तिला फटकूनच असायची... एरव्ही सगळ्यांशी लहान होऊन खेळणारी नभा ताई .. चिडचिडी झाली होती... कुणी काही विचारले तर वस्सकन अंगावर ओरडायची... तिचं काहीतरी बिनसलं होतं नक्कीच! आम्हा त्रयस्थ व्यक्तींच्या हे लक्षात आले तर माई साने तर तिच्या आईच .. त्यांच्या लगेचच सारे लक्षात आले असावे... आईपणा आणि गरिबी दोन्ही माणसाला लाचार अगतिक करतात हेच खरे... कसले कसले जप, उपास, शांतीपूजा त्या करू लागल्या. नभा लेक तर होतीच पण आर्थिक आधारही होती. मात्र ह्या सगळ्यांकडे थोडा काळ त्यांचे दुर्लक्ष झाले असावे कारणदेखील तसेच होते.
एक दिवस जया ताई आणि मामा सुद्धा घरी आले.. एका गरजू होतकरू मुलाशी ते जया ताईचे लग्न ठरवू इच्छित होते.. लग्नानंतरही माहेरी आर्थिक मदत करायच्या अटीवर तो तयार झाला... साने वाड्यात आनंद पसरला .. 30शी गाठलेली जया ताई सुद्धा सुखावून गेली होती.. आणि माईंच्या तर आनंदाला पारावार नव्हता... आपल्या लेकीसाठी जे स्वप्न सुद्धा पहायची भीती त्यांना वाटत होती ते प्रत्यक्षात आले होते... ह्या साऱ्यात नभाताईच्या मानसिक आजाराकडे काहीसे दुर्लक्ष होणे हेही साहजिकच होते.एके रात्री मोठमोठ्याने भांडणांचे आवाज येऊ लागले..नभा ताई कर्कश्य सुरात ओरडत होती..
" ताई लग्न नकोस करू तो जाळून टाकेल तुला ... आग.. आग होईल तुझी ... तुझं बाळ तुला देणार नाही....लग्न नको करू ! लग्न नको करू!"
हा आवाज इतका भयावह होता की वाड्यातीलच काय शेजारी सुद्धा गोळा झाले. बहिणीचे लग्न झाले तर सगळा भार आपल्यावर येईल म्हणून ही मत्सरापोटी बहिणीला लग्न करू नकोस म्हणतेय , असा शेरा मारून लोक मोकळे झाले. दिवसेंदिवस तिची प्रकृती अधिकाधिक खालावत गेली... खाण्यापिण्यातून चित्त उडाले... एखाद्या प्राणहीन यंत्रासारखे तिचे शरीर शून्यात भकासपणे पाहत बसले असायचे. तिची झोप पूर्ण उडाली होती... तिच्या साठी माईंनी कुठल्याश्या मांत्रिकाकडून काहीतरी पूजाही करवून घेतल्याचे कानावर आले होते.... मांत्रिकाच्या मते तिला ओल्या बाळंतिणीने झपाटले होते..😢 प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच होती. नभा ताईला गेल्या महिनाभर जळलेल्या लोकांच्या वॉर्डवर ड्युटी लावलेली होती ... तिथल्या बहुतांश पेशंट ह्या विवाहीत स्त्रिया .. कुणीतरी पेटवून दिलेल्या किंवा परिस्थितीच्या काचाने जाळून घेतलेल्या... नभा ताईसारख्या हळव्या मनाच्या युवतीवर त्यांच्या वेदना, त्यांचं तळमळण ह्यानं खोलवर आघात झाले असावेत. नर्सिंग खरेच खूप महान कार्य आहे... अश्या अर्धमेल्या देहांना मायेनं सांभाळणं आणि त्यातही आपलं मन जपून ठेवणं किती अवघड! नभा ताईला तेच नेमकं जमलं नसावं.... अमानवीय शक्तींवर विश्वास ठेवणारे म्हणत झपाटले आहे तर तर्कशुद्ध बोलणारे म्हणत हे मानसिक आजारपण आहे... काय होते कोण जाणे पण घटनांची संगत काही लागत नव्हती.
हिवाळ्यातली मध्यरात्र होती...कडाक्याची थंडी वाजत होती . किर्रर्र किर्रर्र रातकिडे कर्कश्य ओरडत होते... काजळागत काळोख पडलेला.. नक्कीच अमावस्या होती.. परीक्षा तोंडावर आल्याने आम्ही सगळेच अभ्यास करत बसलो होतो. माझी खोली वरच्या मजल्यावर... बाथरूम खालच्या मजल्यावर सगळ्या भाडेकरूंना कॉमन. तसा मी भित्रा अजिबात नाही हं! नेहमीसारखा दार उघडून जीना उतरू लागलो... पाहतो तर काय? नभा ताई खालच्या पायरीवर बसलेली... ओलेती असावी... अनपेक्षितपणे ती तिथे दिसल्यामुळे मी दचकलोच... तिने मान गर्रकन वळवली आणि माझ्याकडे पाहू लागली... त्या अंधारात एखाद्या रानटी प्राण्यासारखे तिचे डोळे लकाकत होते... माझी भयाने वाचाच बसली मी खिळून होतो तिथेच गारठलो... तिने त्याच कर्कश्य आवाजात मला विचारले..
"कुठे निघाला? बोल..."
मी गप्प उभा भीतीने बोबडी वळलेली त्यात थंडीने दात वाजत होते... मी ततपप करत काहीतरी बोलणार एव्हढ्यात माझा रुममेट सुभाष बाहेर आला... त्याच्याही चेहऱ्यावर आश्चर्य असावे...त्याला पाहताच नभा ताई ओरडली...
"कुठेय माझं बाळ? सांग सांग?"
आता मात्र आम्ही घाबरून मदतीसाठी ओरडू लागलो.... सगळे गोळा झाले... माई खजील झाल्या होत्या पण इलाज नसावा... गुरूंचे तीर्थ शिंपडताच नभा ताई एकदम मोठमोठ्याने रडत गयावया करू लागली...
"त्याला सांग माझं बाळ दे... मी निघून जाईल त्रास देणार नाही तुला... मला माझं बाळ दे.. एकदा पहायचं आहे मला .. माझं बाळ..."
म्हणत तिने टाहो फोडला आणि ती बेशुद्ध झाली. तिच्या भावंडांनी तिला उचलून घरात नेले... शप्पथ सांगतो! त्या रात्री नंतर बाथरूमला जायचीही भीती वाटू लागली होती... आम्ही एकमेकांना उठवून सोबतच जात असू... बिचाऱ्या माई सुद्धा घराच्या दाराला कुलूप घालून झोपत... नभा ताईला झोपेच्या गोळ्या देत असाव्यात, तिला बाहेर पडू देत नसत.. पुढचे काही दिवस शांततेत गेले... मात्र आम्ही बाहेर दुसरी खोली शोधू लागलो... असे महिन्याच्या अधेमधे कमी पैसे द्यावे लागतील अशी खोली तरी कशी मिळणार?
आठ दहा दिवस कसेबसे बरे गेले... शेजारच्या खोलीत नोकरी करणारे दोन गृहस्थ, माझे मित्र आणि मी ... आम्ही रात्रीच्या जेवणानंतर बरेचदा पाय मोकळे करायला म्हणून रात्रीचे बाहेर पडायचो... मंदिरापर्यंत चालत जाऊन थोड्या वेळ तिथेच बसायचो... साडे दहाच्या सुमारास शेजारती असायची ... अगदी प्रसन्न शांत वाटायचे... मग जरा दुसऱ्या लांबच्या रस्त्याने घरी परतायचो... हिवाळ्यामुळे हे बाहेर पडणं थोडं कमी झालं होतं ... त्या दिवशी जरा कमी थंडी म्हणून आम्ही सगळे निघालो... मंदिरात कसलेसे कीर्तन होते... आम्ही रंगून गेलो, काळवेळेचं भान काही राहिलं नाही... परततांना बराच उशीर झाला होता... मोकाट कुत्रे अखंड भुंकत होते... आमच्या अंगावर येऊ नये म्हणून रस्त्याने दोन मजबूत काड्या घेऊन निघालो... गप्पा मारत मारत आम्ही नेहमीच्या रस्त्याने जात होतो...रस्त्याने आम्ही आणि कुत्रे ह्यांव्यतिरिक्त चिटपाखरूही नव्हते...अचानक सगळे कुत्रे एका सुरात रडायला लागले... ते रडणं इतकं भयाण होतं की काहीतरी अघटीत घडणार असे वाटू लागले. सुभाष माझ्या मनाची अवस्था जाणून म्हणाला...
"काही नाही रे! थंडी वाजली की रडतात कुत्तरडे."
आम्ही वाड्याजवळच पोहोचलो... आठ दहा पावलांवर वाडा होता...अचानक तीरासारखी धावत कुठून तरी नभा ताई आली आणि एका काळ्या कुत्र्याच्या डोक्यात भला मोठ्ठा दगड घातला... कुई कुई करत ते कुत्रं निष्प्राण झालं..... हे दृश्य खरंय की भास होतोय म्हणून आम्ही सगळे परस्परांकडे पाहू लागलो.... सगळी कुत्रीसुद्धा क्षणभर ते दृश्य पाहून दचकली आणि शेपूट घालून उलट्या पावली पळत सुटली... अचानक नभा ताई खदाखदा बीभत्स हसू लागली...
"कुत्तरड्या! मला मारणार तू .. मीच तुला ठेचून टाकते xx च्या .... xx xx."
अत्यंत अर्वाच्च शिव्या ती देऊ लागली... आतून सगळे धावत बाहेर आले ... सुदैवाने जया ताई घरी होती ... तिने झोपेचे इंजेक्शन दिले आणि तिला घरात नेले... आम्ही भेदरल्या मांजरागत आपापल्या खोल्यांत जाऊन मुकाट झोपलो .. मात्र आता तातडीने खोली सोडायची असे आम्ही सगळ्यांनी ठरवले... दुसऱ्या दिवशी आम्ही तिघे कॉलेज बुडवून आणि नोकरी करणारे दोघे सुट्टी काढून नवीन जागेचा शोध घेत भटकलो... सुदैवाने मंदिराजवळचे एक घर रिकामे होते... जरा महाग पडणार पण इलाज नव्हता.. आम्ही पाच जणांनी मिळून ते दोन खणी घर घेतलं... थोडे थोडे पैसे काढून ऍडव्हान्स देखील देऊन आलो.. घर साफसूफ करायला घरमालकाने दोन दिवस मागून घेतले..... ते दोन दिवस जीव मुठीत धरूनच काढावे लागणार होते. दुसऱ्या दिवशीच सकाळी आम्ही माईंना घर खाली करणार असल्याचे सांगितले... सगळेच सोडणार म्हटल्यावर त्यांना काय कळायला हवे होते ते कळलेच... डोळ्याला पदर लावत त्या म्हणाल्या..
"फार सज्जन आहात रे मुलांनो तुम्ही सारे! माझ्या घरी पोरी असून कधी वाकड्या नजरेने पाहिलं नाही आदराने वागवलं"
वाईट वाटलं पण आमचा इलाज नव्हता. त्यातल्या त्यात मदत म्हणून आम्ही डबा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले... त्यांचा मोठा मुलगा भाऊ आमच्या खोलीवर डबा आणून देणार होता... माऊलीने आमचे पाय धरले..
"फार उपकार झाले पोरांनो!.."
म्हणत त्या रडू लागल्या. त्यांच्या सांत्वनाला आमचे शब्द तोकडे होते.रात्र झाली की आमच्या अंगावर करताच यायचा... त्या वाड्यातली ती आमची अखेरची रात्र होती... भीतीने म्हणा किंवा अनाहूत जाणिवेने म्हणा आम्ही जागेच होतो. पुन्हा तोच कर्कश्य भयाण आवाज आला आणि काळजाचा ठोकाच चुकला... मध्यरात्रीचे दोन वाजले असावे... कडाक्याच्या थंडीत नभा ताई भराभर अंगावर पाण्याचे हंडेच्या हंडे ओतून घेत किंचाळत होती...माई अगतिकपणे रडत होत्या आणि लोक नेहमीप्रमाणे तमाशा पहायला गोळा झाले होते..
"आग ... आग होतेय माझी... पेटवलं पेटवलं त्यांनी मला... माझं बाळ कुठे आहे... आग होतेय आग..."
इतकी वर्षे लोटली अजूनही ते दृश्य डोळ्यांपुढे जसेच्या तसे उभे राहते... अचानकपणे आपल्या आईकडे वळत नभा ताई म्हणू लागली..
"बांगड्या भरा , बांगड्या भरा मला... हिरव्या गार... मेल्यानी पेटवलं ग पेटवलं ... आग होतेय आग..."
सगळे फक्त बघत उभे होते काय करणार?? ड्रमभर पाणी अंगावर ओतून घेतल्याने थकून ती बेशुद्ध पडली आणि हा तमाशा संपला. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही नवीन जागेत पटापट शिफ्ट झालो... त्यांचा मुलगा भाऊ सकाळ संध्याकाळ डबा आणून देई... माईंच्या हाताला उत्तम चव होती... आम्ही त्यांचे घर सोडले तरी माऊली नेहमीसारखा चांगला डबा देत होती... एके रविवारी दुपार झाली तरी डबा काही आलाच नाही... वाट पाहून आम्ही कोपऱ्यावर खानावळीत जेवून आलो.
येतांना काय झाले तो अंदाज घेण्यासाठी साने वाड्यात डोकावलो .... तिथे अकल्पित वाढून ठेकले होते.. दारात नभा ताईचे प्रेत होते ... अर्धवट कसेबसे गुंडाळलेले असावे... रात्री तिने स्टोव्ह उपडा करून जाळून घेतले होते.... माई आणि भावंडे धाय मोकलून रडत होती.. शेजारच्या काकू माहिती पुरवत म्हणाल्या..
"ओली बाळंतीण झोंबली होती बाबांनो! सहजासहजी सोडणार थोडीच होती... काल जाळून घेतलं तशी थोडा प्राण बाकी असतांना ...."मला बांगड्या भरा हिरवा चुडा ... माझं बाळ " अशीच ओरडत ओरडत प्राण गेला... दुर्दैवी पोर."
मला राहून राहून एक कोडं पडलं होतं... ज्या कुठल्या ओल्या बाळंतिणीची नर्स म्हणून नभा ताईने सेवा केली ती हिला खरंच झोंबली असेल??? की संसाराची इच्छा अपूर्ण राहिली त्याने झपाटलं असेल??? खरंच ओली बाळंतीण होती की मनातल्या अनेक ओल्या इच्छांचा वारंवार बळी देऊन आलेलं मानसिक असंतुलन होतं... ते देवालाच ठाऊक! माणसाच्या मनाचा डोह खोल खोल असतो... त्याचा थांग लागत नाही.
यशश्री रहाळकर
Tumchya navin katha upload zalyach roj check karat aste mi. Khup sundar likhan ahe tumch. Oli baalantin vachtana katha samor ghadate asach vatat vachtana . 3-4 Vela vachli hi katha. Dar veles man kasavis hot nabha tai chi avastha vachtana.
उत्तर द्याहटवा