फॉलोअर

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

इह जन्मनी ... जन्मांतरेच!

स्मशान ही अशी जागा असते जिथं तुमच्या कोण जवळचा आहे ,कोण दूर आहे ... आणि कोण पाठीशी उभा आहे हे प्रकर्षाने जाणवते. माणसा- माणसांतील अंतरे मोजण्याचे कोणतेही परिमाण उपलब्ध नसले तरी स्मशानाची फुटपट्टी तुम्हाला माणसांची, नातेवाईकांची आणि सो कॉल्ड आप्तेष्टांची खरीखुरी ओळख पटवून देत असते. बाबांना जाऊन पंधरा दिवस झाले... ह्या पंधरा दिवसांनी मला माणसांचे खरेखुरे चेहरे दाखवले.... आपले आपले म्हणत ज्यांच्यासाठी जीवाचं रान करतो ते खरंच आपले असतात का? जाणारा व्यक्ती तर केव्हाच काळाच्या पल्याड गेलेला असतो... मागे राहतं त्याचं शरीर.  डेड बॉडी ... आपल्या भवतालच्या असंख्य पसाऱ्यातली एक निर्जीव वस्तू... अशी वस्तू जी अत्यंत पेरिशेबल आहे... योग्य समारोप न केल्यास अनेक रोगराईचे मूळ होऊ शकते ... मात्र हा तो देह असतो जो काही क्षणांपूर्वी आपला जिव्हाळ्याचा कुणीतरी असतो.... म्हणूनच हा अंतिम निरोप जितका आवश्यक तितकाच अवघड, नकोसा असतो.... बाबांचा मृत्यू अत्यंत सहज ,नैसर्गिक असला तरी लोकांना हजारो प्रश्न पडलेले होते... सांत्वनाचे म्हणून येणारे फोन अनेक सुरांत बोलायचे... काही मृतदेहाची कोरोना तपासणी करून घ्यायला सांगत होते तर काही आम्हाला किती दुःख झाले हे पटवून द्यायच्या प्रयत्नात होते..... काहींनी काहीही विधी करूच नका असा सल्ला दिला तर काहींना आम्हाला बोलावून संकटात पाडू नका असे सांगायचे होते. त्यांची भीती, त्यांना वाटणारी काळजी, त्यांना झालेले दुःख.... ह्या साऱ्या पसाऱ्यात आमचे दुःख मुकाट्याने एका कोपऱ्यात हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून बसले होते. कोरोनाच्या ह्या जीवघेण्या पार्श्वभूमीवर कुणी भेटीला यावे अशी अजिबात अपेक्षा नव्हती... सगळ्यांसमोर आरोग्याच्या अनेक विवंचना आहेत , तसे येणे सगळ्यांच्या दृष्टीने धोक्याचे आहे.... सारे सारे अगदी सहज मान्य करण्याजोगे आम्ही सारेच सूज्ञ आहोत... मग ही गोष्ट लोकांना कंठशोष करून पटवून का द्यावी लागत होती?? कोण जाणे. बहुतेक फोन आमची खूपच इच्छा असूनही येऊ शकत नाही हे convince करणारे होते. It's OK!  तुमच्याजागी मी असते तरी आलेच नसते.... ह्यात काही चुकीचे नाही. 

पंधरा दिवसांनी नाशकातली एका दूरच्या नातेवाईक बाईंचा फोन आला... आता दूरच्या म्हणूयात... सुरुवातीला नमनाला घडाभर तेल घालत .. आमच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी कसे येणे टाळले ... त्यांना त्यांच्या जीवाची चिंता नाही पण माझ्या घरी वृद्ध लोक आहेत त्यांची काळजी म्हणून त्या कश्या आल्या नाहीत वगैरे साद्यंत सांगितल्यावर हळूच तिकडचे कुणी आले होते का? कोण कोण होते? वगैरे चौकशी CID style सुरू झाली. "कुणीच आले नव्हते म्हणजे तेच योग्य आहे नाही का!" असे उत्तर मिळताच ..

 "शेजारी पाजारी तरी जमले होते का?की....(एक दीर्घ पॉज) " 
 
असा अत्यंत खोचक प्रश्न त्यांनी विचारला.. पूर्वीची मी असते ना तर त्या बाईंची दातखीळ बसेपर्यंत ऐकवले असते... पण मी म्हटले ना आता मला राग येत नाही... कीव वाटते... पुढचे 15 मिन मी शांतपणे त्यांच्या सगळ्या खोचक प्रश्नांची उत्तरे दिली.  पंधरा दिवसांनंतर माझ्या बाबांच्या अंत्यविधीला किती माणसे होती हे विचारून काय मिळणार होते ? की महानगरपालिकेच्या गाडीने उचलून नेले असे त्यांना विचारायचे असावे..... त्यांच्या आणि माझ्या सुदैवाने माझे खांदे समर्थ होते आणि जोडीला माझे पती आम्ही दोघे पुरेसे होतो... बाबा असतांना अगदी वेळ आली तेव्हा मी एकटीने त्यांना उचलून सगळे काही केले होते.... आता तर ते नश्वर देहात उरले होते... त्यांना गाडीत/ ऑटोमध्ये बसवतांना त्यांचे डोके धडकू नये म्हणून मी कायम डोक्यावर हात ठेवायचे, हळुवारपणे प्रेमाने आधार देत त्यांना न्यायचे... आता त्यांनाही आधार नको होता आणि माझ्याच डोक्यावरचा हात त्यांनी केव्हाच काढून घेतला होता. 

बाबांनी आयुष्यभर मला माणसं जोडायला सांगितले.. ते स्वतः खूप लोकांना धरून होते ...मी मात्र एकलकोंडी आणि फार कुणाशी जमवून न घेणारी... त्यांच्या सुदैवाने आणि माझ्या पूर्वपुण्याईने मला कधीही मदतीची गरज लागली आणि अर्ध्या रात्री दार वाजवले ना तरी धावून येणारे शेजारी लाभले... ते असतांना त्यांना हॉस्पिटलाईझ करतांना अनेकदा चार जणांना आवाज द्यावा लागला आणि तेही काळ वेळ न पाहता धावून आले... त्यांच्या पश्चातही माझे शेजारी, माझ्या मैत्रिणी, ह्यांचे मित्र खंबीरपणे पाठीशी उभे होते. शेजारच्या काकू शेवटपर्यंत आईसोबत बसलेल्या होत्या... माझी 90 कुटुंबांची सोसायटी... सगळे भेटीला आले शेवटपर्यंत थांबले , नंतरही पुन्हा येऊन भेटून गेले. तीन दिवस चहा, नाश्ता ,जेवण अगदी वेळेवर गरमागरम आणून दिलं... माझ्या घरातील वयस्कर लोकांची जराही आबाळ होऊ दिली नाही. काळवेळ पाहून दोघी मैत्रिणींनी आपल्या नवऱ्याला सुट्ट्या काढायला  सांगितले... आमचे जुन्या घरचे शेजारी काका सावलीसारखे अखंड ह्यांच्यासोबत होते... अगदी पहिल्या दिवसापासून ते 14व्या पर्यन्त. माझ्या पाठीवर हात ठेवायला माझ्या मैत्रिणी धावून आल्या... त्यातल्या दोघी जणींकडे तर गेल्या महिन्यांत सासू आणि वडील गेले तरी मी भेटायला जाऊ शकले नव्हते.... ते त्यांनी मनात अढी करून ठेवलेले नव्हते. त्यातल्या दोघींबद्दल तर दीर्घकाळ ...माझ्या मनांत गैरसमजाचे हजारो विषारी नाग मी पाळून ठेवले होते... "ताउम्र तेरी मुहोब्बत की गुलामी कुबूल है।" असं एका शायराने म्हटले होते ते पटले नव्हे अनुभवले. काय संबंध होता ह्या सगळ्या लोकांचा माझ्या बाबांशी??  माझ्याशी तरी कोणतं नातं होतं?? कोरोनाची भीती त्यांनाही होतीच की, त्यांचीही लहान मुलेबाळे होती, त्यांच्याही घरी वयस्कर लोक होते... पण कदाचित ह्या भीतीपेक्षा माझ्यावरील त्यांचे प्रेम काकणभर अधिक होतं. मी गळ्यात पडून रडले तेव्हा किंवा माझ्या पाठीवर धीराचा हात फिरवताना त्यांना कोरोनाची आठवण झाली नाही तर आपल्या आधाराची हिला गरज आहे एव्हढेच त्यांनी समजून घेतलं. मैत्री हे जगातलं सगळ्यांत पवित्र नातं आहे कारण ते कोणत्याही समस्या घेऊन येत नाही उलट चटकन समस्या सोडवतात, शंका /प्रश्न उपस्थित करत नाही, मान-अपमानाची तलवार परजून घावही घालत नाहीत.

खरं सांगते... ह्या जगातली सगळ्यांत महागडी गोष्ट आहे रडायला खांदा मिळणे.... कितीही किंमत मोजली तरी हा खांदा कुठेही विकत मिळत नाही. तो तुमचा तुम्हालाच कमवावा लागतो.... बाबा जाता जाता आयुष्यभर पुरणारी शिदोरी देऊन गेलेत. आयुष्यात माणसं जोडणे खूप महत्वाचे आहे.. वेळेला कोण /कधी/ कुठून..... आपल्यासाठी नक्कीच धावून येतो. बाबांच्या शेवटच्या निरोपाला त्यांच्या कुलगोत्राचे म्हणावे असे कुणीही नव्हते... म्हणजे आई दुसऱ्या गोत्रातून आलेली आणि मी दुसऱ्यात गोत्रात गेलेली... मात्र आमचे शेजारी, माझ्या मैत्रिणी, ह्यांचे मित्र , ऑफिसमधील कलीग ह्या सगळ्यांचे ह्याच जन्मीचे नाहीत तर जन्म-जन्मांतरीचे काहीतरी नाते निश्चित असणार ह्याची मला खात्री आहे. नातं म्हणजे मान-अपमान ,इगो ,मोठेपणा नाही तर आपलेपणा आणि निखळ प्रेम. 

बाबांचे सगळे दिवस मी विधिवत केले मी स्वतः घाटावर जाऊन रोज प्रत्येक विधीचा आणि मंत्रांचा अर्थ गुरुजींकडून समजावून घेतला... अगदी मंत्राग्नि म्हणजे काय, विवाह वेदिवरील अग्नी आमंत्रित करून त्याचे विच्छेदन केले जाते ...तो अर्धाच अग्नी त्यांच्या मालकीचा असतो... मही श्राद्ध नावाची फार सुरेख कल्पना आहे... ज्या धरणीने आजवर गत व्यक्तीच्या देहाचे भरणपोषण केले तिचे आभार मानले जातात. सपिंडी श्राद्ध म्हणजे वरील तीन पिढ्यांमधील पितरांमध्ये गत व्यक्तीला समाविष्ट केले जाते... ह्या वेळी प्रेत योनीतून पितृस्थान प्राप्त होते. तेराव्याचे श्राद्ध, चौदाव्याचा होम मंत्रोच्चारण ह्या साऱ्यांमुळे घरावर आलेले दुःखाचे सावट मोकळे होण्यास मदत होते. ह्याविधी निरर्थक नाहीत तर ह्या विधींमध्ये दुःख पिऊन टाकण्याची ताकद आहे... हे सारे विधी देह नश्वर आहे पण आत्मा अविनाशी आहे हेच सांगत असतात. आत्मा कुणी पाहिलाय...? पण आठवणी आहेत ना!  गेली तीन वर्षे सोडली तर बाबांच्या शेकडो आठवणी आमच्यापाशी आहेत.

 सकाळी उठून चहा करणारे बाबा... बाबा अप्रतिम चहा करायचे त्यांच्या सारखा चहा फक्त त्यांच्या एका मामेबहिणीला करता येतो बाकी कुणालाच नाही ..... भरपूर दुधाळ आणि तरीही कडक. बाबा स्वयंपाकसुद्धा उत्तम करायचे, आईची बदली झाली असल्याने ,मी कणिक भिजवणे,पोळ्या करणे आईकडून नव्हे तर बाबांकडून शिकले ... बाबा आयुष्यभर स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे , शुभ्र परीट घडीचे. त्यांचं वाचन अफाट होतं... सर्वंकष होतं... मला वाचनाचं व्यसन आहे ते त्यांच्यामुळेच. "वाचनाचं व्यसन " हा त्यांचाच शब्द ... हातात घेतलेलं पुस्तक मी संपवल्याशिवाय खाली टेकवत नाही...  बाबा म्हणायचे, "हिचं बेवड्या सारखं आहे बाटली संपेपर्यंत हलणार नाही☺️" कित्येकदा मी रात्रभर पुस्तक वाचायचे तर दोन वेळा उठून कॉफीचा कप त्यांनी माझ्याजवळ ठेवलेला असे. ते सार्वजनिक वाचनालयाचे कार्य सामाजिक कार्याच्या भावनेतून करत, मग ताजी पुस्तके म्हणजे माझी दिवाळी असे.  लोकसत्ताची शनिवारची पुरवणी चतुरंग मला जाम आवडायची, ते व्यवस्थित सगळ्या पुरवणीचा गठ्ठा बांधून ठेवत... मी सुट्टीत घरी आले की तो घेऊन बसायचे. बाबा माझे खूप चांगले मित्र होते... त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलताना भीती वगैरे कधी वाटलीच नाही.  मला कधीच कोणती गोष्ट मागावी लागली नाही किंवा हट्ट तर करावाच लागला नाही... आधीच ती वस्तू बाबांनी आणलेली असे, मला एखाद्या राजकन्येसारखं वाढवलं त्यांनी.... अगदी आत्ता आत्ता पर्यंत कपड्यांच्या दुकानात नेऊन  "काय घ्यायचं ते घे ग ! बापाची पेन्शन वाढलीये..." असं म्हणणारे बाबा जसेच्या तसे आठवतात मला. माझ्या जन्माच्या वेळी आईच्या काकूंनी त्यांना आधी मुलगा झाल्याचे सांगितले मग थोड्या वेळाने मुलगी झाली असे कसे सांगू असे त्यांना वाटून त्या भीत भीतीच बाबांकडे आल्या तर बाबा खळखळून हसत म्हणाले, "त्यात काय झाले? मुलगा काय नि मुलगी काय.. काही फरक पडत नाही मला... बाळ आणि आई ठीक आहे ना!"  बाबा आयुष्यभर आपल्या शब्दावर ठाम राहिले... मी मुलगी आहे म्हणून वाढवतांना त्यांनी काहीच फरक केला नाही. मी दहा वर्षांनी असेन...  मी वगळता आजूबाजूच्या सगळ्यांना भावंडे होती मी त्यांना विचारले ,"मला का बहीण किंवा भाऊ नाही हो? " 
 
  बाबा म्हणाले, "तू देवाचा प्रसाद आहेस. प्रसाद एकदाच घेतात सारखा सारखा हात पुढे करून मागायचा नसतो." 
  
तेव्हा कितपत कळलं होतं कोण जाणे ?...पण बाबांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती.. ते चिडून कधी अंगावर ओरडले नाही. एक दिवस मी मुकेशची त्यांच्या आवडीची सगळी गाणी ऐकत बसले ..  मी इतकेदा आजवर ती ऐकली होती की मला ती मधल्या म्युझिक सहीत तोंडपाठ झाली आहेत...खूप गोष्टींची उजळणी करायची आहे पण ती करण्यापूर्वी ह्या तीन वर्षांना कुठेतरी भिरकावून गाडून टाकायचे आहे... म्हणून हा लेखप्रपंच.  आपला आनंद जर शब्दांमधून व्यक्त होऊ शकत असेल तर दुःख सुद्धा शब्दांत मावत असणार... मनांत बोचणारे सारे क्षण धुवून टाकतं मन स्वच्छ केलंय मी ... बाबा नीळ देऊन शुभ्र कपडे चमकवायचे तसं. आता त्यांच्या सगळ्या हव्याहव्याश्या आठवणींची आवर्तने सहज करता येतील.

बाबा! तुमच्या स्मरणाशिवाय एकही आनंदाचा क्षण येणार नाही ह्याची खात्री आहेच ; पण त्या प्रत्येक क्षणी येणारे तुमचे स्मरण अनेक आनंदाच्या क्षणांचा आठव करून देणारे असेल , अशी ग्वाही माझं मन मला देतंय. सदैव प्रसन्न असणारे, मनमोकळ्या गप्पा मारणारे, खळखळून हसणारे, यारों के यार .... बाबा तुम्ही चिरकाल स्मरणात आनंदाचा गाभा बनून राहाल... विनम्र अभिवादन!
🔏©️यशश्री रहाळकर

२ टिप्पण्या:

  1. तिनही भाग वाचले, मनाला भिडले,
    वाचकाचीच ही अवस्था , तर लेखकाची मांडताना व हे सर्व स्विकारतांना काय झाली असेल ?
    खूपच संमिश्र भावनांची कालवाकालव आहे यात!
    प्रेम, संस्कार, हतबल, त्याग, साहस, करुणा, क्रोध, नम्रता, स्वार्थ, कुचकट, धाडस, समर्पण आणि न सांगता येणारे असे अनेक चेहरे दिसुन गेले. कुठलीही भावना शब्दात मांडणे खरेच अवघड पण तीही कला किती समर्थपणे पेललीस तू ! बाबांसारख्या महान व्यक्तिमत्वाला तुझ्यासारख्या धाडसी, कर्तृत्ववान मुलीकडून दिलेली ही शब्दरूपी श्रद्धांजली खूपच शोभुन दिसते.
    🙏🙏🙇‍♀️

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!