फॉलोअर

गुरुवार, १२ मार्च, २०२०

पुरणपोळी

                         बालपणीचा प्रदीर्घ काळ एकमेकींसोबत काढलेल्या  आम्ही 7/8 माहेरवाशीणींनी एकाच वेळी आपापल्या माहेरी यायचे आणि  मस्त धम्माल करायची ठरवले. मध्यंतरी खूप वर्षांचा काळ  गेला होता .. प्रत्येकीच्या सुट्ट्या वेगळ्या, आधी मुले लहान म्हणून मग त्यांच्या परीक्षा म्हणून...  
निमित्ताने चार-दोन दिवस जो तो गावी येऊन जाई पण भेटीचा योग काही येईना. आता मात्र व्हाट्स अँपच्या कृपेने संपर्कात असणाऱ्या आम्ही ठरवून एकत्र जमलोच . आमची घरे अगदी लागूनच त्यात इतके वर्षांचा घरोबा..एक मोकळं कौटुंबिक वातावरण झालं आहे. कुणाच्याही घरी कधीही जावं नी तयार पदार्थ अगदी शिळ्या पोळीचा फोडणीचा कुचकरा सुद्धा मस्त चापावा.. "बस ग !" म्हटलं की जेवायला बसावं इतका अनौपचारिक मोकळेपणा माणसांत होता. दुपारच्या वेळी उन्हे चटचटू लागली अन् आमची बैठक बसली... एव्हाना आमची अजून मर्कट सदृश्य अवस्थेतील कार्टी दंगा करून , दमून गार कुलरपुढे आडवी झाली होती... जरा मोठे कुमारवयीन वारसदार मोबाइलमध्ये डोके खुपसून बसले होते... मस्त निवांत वेळ एकीकडे गप्पा आणि एकीकडे पत्त्यांमधील बदाम सातचा डाव रंगात आला होता... जिचे जास्त पॉईंट तिला संध्याकाळी कुल्फीची ट्रीट द्यावी लागणार म्हणून सगळ्या चुरशीने खेळत होत्या.
                       एकीच्या आईने मस्त गारेगार वाळ्याचे पन्हे दिले... तर दुसरीची आई मस्त फतकल मारून शेजारी बसत कांदा टोमॅटो चिरु लागली... कुणाच्या तरी आईने शेव आणली तर कुणाच्या आईने कैऱ्या... अशी आमच्या सोबत आमच्या आई लोकांची मैफिल रंगली..

"आता जरा थांबून भेळ खाऊन घ्या ग पोरींनो!" 

म्हणत फर्मान सुटला तसे या ही वयात आम्ही कसे आईला घाबरतो असा अभिनय करत आम्ही खेळ बाजूला केला... एव्हढ्यात दारावर हाक ऐकू आली..

"माय वं ! पुरनपोळी वाढ वो !"

जरा लक्षपूर्वक शांत होण्याचा इशारा करत आम्ही ऐकू लागलो. पुन्हा हाक आली...

"पुरनपोळी वाढ वो माय!"

" काय ग बाई , भलतेच फॉरवर्ड भिकारी आहेत गावाकडले..? डायरेक्ट पुरणपोळीच मागताहेत..."
एक म्हणाली... आणि आम्ही अक्षरशः खदाखदा हसत सुटलो..घुडघ्यांवर हाताने जोर देत , कांदा चिरणाऱ्या काकू उठल्या , तिथूनच जोरात..

"चंदे! मेले कुठे उलथली होतीस. साजूक तुपातला शिरा लावून ठेवला होता तुझ्यासाठी"

तेव्हढ्यात दुसऱ्या काकू दार उघडत म्हणाल्या, 
"चंदे ! तू तर पौर्णिमेचाच चंद्र झालीस...लोणचं ठेवा काढून सांगून जे गेलीस ते आज उगवलीस."

हे चंदा प्रकरण काय आहे म्हणून आम्ही मोठ्या उत्सुकतेने पाहू लागलो. चंदा...दारातून तरातरा आत येत असता आम्हाला पाहून दाराशीच थबकली.

"पाहुणे नव्हे ग पोरी आल्यात माहेरपणाला"

एका काकूंनी सांगताच चंदा चटकन आत आली . कोपऱ्यात अंग चोरून बसून घेत आम्हाला टकामका पाहू लागली. आमच्याच वयाची असेल चंदा... जरा लहानच असेल. ऊसाच्या चिपाडागत देह, काम करून रापलेलं अंग, त्यात मूळचाच अमावस्येच्या चंद्राचा रंग.... डोळे मात्र पाणीदार टपोरे आणि धारदार नाक. आम्ही कोण ?कोणाच्या मुली आहोत ,कुठल्या गावांना असतो अशी ओळख परेड झाली... अन् चंदा आमच्याकडे पाहून मोकळं हसली... तसे तिचे पांढरेशुभ्र मोत्यांसारखे दात लकाकून गेले.

"माय ! लक्षुम्याच आल्या घरला."

म्हणत चंदाने लोटांगण घातले... आम्हाला हसू आवरत नव्हते. काकूंनी भेळेच्या प्लेट भरल्या पहिली ताटली चंदा पुढे ठेवत... "किती दिवस उपाशी?? " असे खुणेनेच विचारले... चंदाने 3 बोटे नाचवीत खुणेनेच सांगितले. लगेच एका काकूंनी 2/3 पोळ्या भाजीही आणून ठेवली... चंदा आमच्या सोबत चवीने खाऊ लागली. एक पोळी खाऊन झाली तशी उरलेल्या पदरात गुंडाळू लागली तसे आईने दटावले...

"चंदे पोटातल्या जीवाचा तरी विचार कर... घरी न्यायला देईन मी तुला चार."

चंदाला पाचवा महिना लागला होता... ही तिची सातवी खेप... पैकी 3 पोरं जिवंत होती. पोटात अन्न जाताच भूक शांत झाली तशी चंदा मजेत गप्पा मारू लागली..

"हे आंबट गोड लै भारी काय म्हणत्यात याले??"

" याला भेळ म्हणतात ...अजिब्बात नाव घ्यायचं नाही सांगून ठेवते" म्हणून काकूंनी दटावलं .... त्यांच्याच सुरात सूर मिसळत आई म्हणाली 

"नाही तर काय? केव्हढ्या हसल्या तुझ्या पुरणपोळीला पोरी.. एकदा  कधीतरी होळीच्या दुसऱ्या दिवशी हिला पुरणपोळी दिली... तेव्हापासून पुरणपोळीच मागते ... वेडी कुठली !"

सगळ्या हसल्या तशी चंदाही खळखळून हसली. मग पुरणपोळी मागताना किती भारी वाटतं हे चंदा रंगवून सांगू लागली . मग तिच्या आणि आमच्या आई गँगच्या गप्पा रंगल्या. आईच्या कॉटनच्या मऊसूत जुन्या साड्या तिने बाळासाठी राखून ठेवायला सांगितल्या... कुणाकुणाला शोपा, ओवा, मेथ्या असे गरजेचे सामान वाटूनच दिले. आमच्या आयाही मान डोलावत खुशीने होकार देत होत्या. उन्हे कलली तशी चंदा उठली... भराभर अंगण झाडून काढू लागली .  झाडांना आळी केली पाणी घातले... वाळलेल्या पानांचा कचरा वेचून फेकला. "येते वो माय! " म्हणत पोळ्या घेत झपाझपा निघून गेली.
                     आमच्या गावच्या वस्तीपासून जरा लांब मोकळे मैदान होते . तेथील हापशीला (Hand pump) भरपूर पाणी असायचे.. त्याच्या शेजारी पाल ठोकून (तात्पुरत्या कपड्यांच्या झोपड्या) भटक्या जमातींचे लोक बरेचदा राहायला येत... कधी लमाण, कधी पाथरवट तर कधी पारधी. चंदा पाथरवट होती.... तिच्या कबिल्यात 6 कुटुंबे ,4 गाढव, 2 खेचर नि एक घोडा होता........ माणसे अगणित असावी. सहा महिने वर्षभर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे लोक मुक्काम हलवीत असत... मात्र गेली 2 वर्षे चंदाचा कबिला गावातच मुक्काम ठोकून होता . माणसांना वीटभट्टीवर काम मिळत होते. शिवाय मजुरी भरपूर म्हणजे दारूचे पैसेही सुटत होते. एकदा पाटा-वरवंटा विकायला म्हणून आलेली चंदा.. आमच्या आई गँगची लाडकी बनली. चंदा सुरेख दगडी खल बत्ते बनवायची... आम्ही आलो तसे टाकवलेले पाटे घेऊन आली नी घ्या म्हणून आग्रह करू लागली. आमच्या फ्लॅट मध्ये कुठे ठेवणार म्हणून आम्ही नकार देऊ लागलो. आमची जागा लहान आहे एव्हढे तिला बरोबर कळले . दुसऱ्याच दिवशी तळहाता एव्हढे इवले पाटे-वरवंटे आणि वाटीएव्हढे दगडी खल बत्ते घेऊन चंदा हजर.. काय सुरेख कलाकृती होती ती! आम्ही अगदी अँटिक शो पीस म्हणून ठेऊन घ्यायचे ठरवले... "पैसे किती देऊ?" असे विचारले तर चंदा आपले शुभ्र दात चमकवीत म्हणाली...

" पैका नग माले .माजी आठवन म्हनून ठिऊन घ्या ."

आतून आई गँग बाहेर आली नि तिला दटावू लागली,

"ते काही नाही. चंदे ! ..पैसे घे सगळ्यांकडून... सगळ्या मोठ्या घरच्या राण्या आहेत चांगल्या...100₹ कमीत कमी होतातच प्रत्येकीचे"

"काय माय? भयनी हायेती माज्या.. पैका नग"

अखेर चंदा पैसे न घेताच गेली... आम्ही अवाक होऊन पाहत राहिलो. चंदा सगळ्यांना जीव लावायची..आमच्या चार आठ दिवसांच्या मुक्कामात आम्हालाही 'चंदा' आपलीशी वाटू लागली.. गावात अजूनही सारे दारावर विकायला येते. ऊसाचा रस, बोरे, डाळ फुटाणे, मुरमुरे... आम्हा मैत्रिणींचे टोळके कुणाकडे तरी एकत्रच असायचो... मग एखादीची आई कुणातरी विक्रेत्याला थांबावे नि सगळ्यांना काहीतरी खायला प्यायला घेतले जाई. वरच्या मजल्यावरून हाक मारली की चंदा हजर होई... तिलाच आधी खाऊ देऊन मग आमचा नंबर लागे.. ती चांगलीच गपिष्ट होती.. आम्हाला तोंडी लावणेच मिळाले जणू.
                   चंदाचे जग आम्ही पाहिलेल्या गुलाबी सुरक्षित जगाहून फारच निराळे होते. ती जन्मली अन आई गेली... रागाने बापाने तिला एका तांडे वाल्याला विकून टाकली... तांडेवाला भला माणूस होता.. तिला पोटभर जेवू घालायचा.. मारझोड करत नसे... पोटभर जेवण आणि मारझोड नाही ,हे चांगुलपणाचे दाखले आमच्या शब्दकोशात नव्हतेच. हे तर आमचे माणूस म्हणून मूलभूत अधिकार होते. चंदा 8 वर्षांची असतांना तो भला माणूसही गेला... त्याच्या बायकोने चंदाला दुसऱ्या एका माणसाला विकले... तो ही माणूस भला होता . त्यांच्या जमातीत पोरींना भरपूर हुंडा देऊन लग्न होत.. त्याने आपल्या पोराशी चंदाचे लग्न लावून दिले. चंदा 9 वर्षांची आणि मुलगा 27 वर्षांचा... त्याने एखाद्या कोठेवालीला विकले नाही... भला माणूस म्हणायचे. 12व्या वर्षी चंदा वयात आल्यापासून सातव्यांदा गर्भवती होती... तिच्या जिवंत राहिलेल्या तीन मुलांची नावेही मोठी गंमतीदार होती...सचिन, राहुल आणि युवराज...
आम्ही तिला गंमतीने म्हणालो,

"चंदा! सगळी क्रिकेटर्स ची नावं आहेत. क्रिकेट टीम पुरी करणार तू एकूण 11 पोरं."

"बाबू जित्ता हाय तवर पोरं हुतील."

चंदा सहज म्हणाली... बाबू तिचा नवरा.  अधून मधून पोलीस पालावर येत आणि चोर म्हणून बाबूला पकडून नेत... हा त्यांचा जीवनातील अविभाज्य आणि सवयीचा भाग होता. आमचे डोळे विस्फारले... मग चंदाची मुलाखत सुरू झाली.

"बाई ग ...तुला भीती नाही वाटत."

"न्हाय बा! भ्याच कशाले? हथला पोलीस साहेब भला मानूस हाये."
आम्ही कपाळावर हात मारून घेतले...

"भला म्हणजे कसा ग?" एकीने चटोर प्रश्न केलाच.

"म्हंजे बाबूला मारत न्हाई. माले घरकाम दितो.. नजर वाईट ठिवत न्हाई."
बराच भला माणूस होता म्हणायचे... तिच्या अब्रूला हात घालत नाही तर काही दिवस घरची धुणीभांडी करून घेतो म्हणायचे... असा न तसा देहाचा वापर..

"तुझा बाबू चोऱ्या का करतो पण?"

"न्हाई बा! बाबू कंदीच चोरी करत न्हाई... म्या तरी करन पन त्यो न्हाई"

आमची उत्सुकता थंडगार झाली होती... म्हणजे बाबू पालं वाला घर नसलेला... म्हणून त्याला वाट्टेल तेव्हा धरून न्यायचे, त्याला सोडवण्याच्या बदल्यात त्याच्या बायकोकडून राबून घ्यायचे... भयंकर! सगळे कल्पनातीत होते. न्याय हा शब्द आहे केवळ..... वास्तव नाहीच,असे वाटू लागले

"तू चोरी करतेस चंदा?"

खळखळून हसत चंदा म्हणाली,

"एकदा पाव चोरले म्या दुकानातून. लैच भूक धरवना.
एकदा कापडं बी चोरल्यात... अंग झाकाले. का करावं??"

आम्ही गपगार.. चंदा पुढे म्हणाली...

"पन आता सोल्ड ....माय म्हंते चोरी पाप हाये ...करू नको ग बाय माझे?" 

चंदा आमच्या आई गँगचे सारे ऐकायची... सगळ्यांनाच 'माय' म्हणायची. आमच्या आई आणि तिचं नातंच जगावेगळं होतं..... विलक्षण होतं. उभयतांना एकमेकांचे दुःख चेहरा पाहून कळायचे. एव्हढ्यात कलिंगडाच्या कापा आल्या अन् आम्ही सगळे तुटून पडलो.
                   आम्हा सगळ्यांची माहेरची घरे प्रशस्त बैठी मागे पुढे भरपूर अंगण असणारी. त्यात हौसेने झाडे लावलेली.... आमच्यापैकी केवळ दोघींनाच भाऊ तेही हैद्राबाद आणि बंगलोरला सेटल झालेले.. मोकळ्या हवेची आणि ऐसपैस वागण्याची सवय असणाऱ्या आमच्या पालकांचे शहरात मन रमत नसे. गड्या आपला गाव बरा! म्हणत गावीच राहिलेल्या ह्या वयस्कर लोकांचे आयुष्य मोठे नीरस ,एकसुरी. पिल्ले उडून गेलेल्या पक्ष्यांसारखे..... आई गँगचेही आता वय झालेले, शरीर थकत जाणारे. झाड लोट, उचल दडप आता होईनाशी झालेली... चंदा कायम त्यांच्या हाताशी असायची. अंगण झाड, झाडांना पाणी घाला,पडदे उतरवून धुवून दे,गव्हाला ऊन दाखव.. असली अवजड कामे ती सहज करायची... नवल हे की एक पै चाही मोबदला न घेता. कुणाच्या जड पिशव्या उचलून आण, कुणाच्या मुरगळलेल्या पायाला तेल चोळून दे, कुणाच्या लोणच्याला कैऱ्या आंबे फोडणीने फोडून दे... असली कामे ती अत्यंत आनंदाने करायची. ती सगळ्यांना माय म्हणायची आणि माय मानायचीही. कोणत्याही कामाचा चंदा मोबदला घेत नसे, तिला तो नकोच होतो.   
                         चंदा भिकारी नव्हती, चोर तर त्याहून नव्हती. ती उपाशी होती... तिची भूक मायेची होती, प्रेमाच्या दोन शब्दांची होती . आयुष्यभर पोरक्याने जगलेल्या त्या जीवाला आईची माया हवी होती... ती तिला आमच्या आईंकडून भरभरून मिळत होती.... पुरणपोळीच्या पोटात दडलेल्या पुरणासारखी. 'पुरण' भारीच कौशल्याचा पदार्थ... भल्याभल्या सुगरणींची परीक्षा घेणारा .. वरवर मऊसूत माया आतून खमंगपणा राखून असणारा....दुसऱ्याच भांड्यात खमंग शिजलेले, गोड पुरण .....पोळी पोटात घेते तेव्हा ती बनते 'पुरणपोळी'... त्या मायेची सर कशालाच नाही.पोटच्या पोरीवर अन् जन्मदात्या आईवर कुणीही माया करेल मात्र ना नात्याच्या, ना जातीच्या, ना आर्थिक वर्गाच्या... दुसऱ्याच्या पोरीला पोटाशी धरून माया करणे... सोपे नाही.फार मोठं मन लागतं त्याला. अगदी पुरणपोळी सारखं दुसऱ्याला सामावून घेता यायला हवं, आपलंसं करता यायला हवं... ते आमच्या आई गँगला किती सहज जमले होते.
एव्हढ्यात नेहमीची कासारीण दारी आली...

"बांगडया भरून घ्या ग पोरींनो!" 
आईने आवाज दिला... तशी आम्ही अंगणात रिंगण घालून बसलो...  

"चंदे! कुठे निघालीस ? बैस हो ... तू काय परकी आहेस. हिलाही बांगड्या निवडा ग .. "

एकीची आई म्हणाली, तसा खाली मान घालून गुपचूप निघून जाणाऱ्या चंदाचा चेहरा उजळला.. तिनेही बसून घेतलं... आमच्या आई गँग मधील प्रत्येकीपुढे आपले हात नाचवत अत्यंत आनंदाने आपल्या बांगड्या ती दाखवू लागली.. प्रत्येकीच्या आईने हाताचा मोर करून छान आहे म्हटले की तिला भारी आनंद वाटायचा.
सगळ्यांपुढे चहाचे कप धरत आई म्हणाली,

"उद्या सगळ्या सकाळी माझ्याकडे जेवायला या ग!"
आम्ही आळीपाळीने एकमेकींकडे जाऊन खादाडी करीत असू...आम्ही माना डोलावल्या.

"काय बेत करू सांगा बाई काही सुचत नाहीये."

 "पुरनपोळी कर वो माय!"
आम्ही चंदाच्या थाटात एकसुरात उत्तरलो.

"चहाटळ ! कुठल्या.." म्हणत आम्ही आणि आई गँग हसत सुटलो... चंदाही आपले शुभ्र दात झळकवत हसत होती..एकीकडे डोळ्यांत वाहणारे अखंड पाणीही पुसत होती

©🔏 यशश्री रहाळकर

३ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!