फॉलोअर

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

वानप्रस्थाश्रम


आईबाबांच्या लग्नाच्या 40व्या वाढदिवसाला अचानकपणे भेट देऊन सरप्राईज द्यायचे आणि लहानशी पार्टी करून चार दिवस मज्जा करायची... असं गुप्त प्लॅंनिंग बरेच दिवस मुक्ता आणि मंदार करत होते. मोठी मुक्ता लग्नानंतर पुण्यात सेटल झालेली...  फॅशन डिझायनर स्वतःचे बुटीक चालवणारी ....तिचा नवरा आनंद आर्किटेक्ट तर धाकटा मंदार बंगलोरचा टिपिकल आयटीयन... त्याची बायको अर्पिता बँकर. ह्या दोघांनाही एकेक लेक...सोहा आणि सना. 10 वर्षांची सोहा आणि 7 वर्षांची सना ...ग्रॅनी आणि ग्रँडपाला भेटायला अगदी आतुर झाल्या होत्या.... ते दोघे म्हणजे धम्माल मस्तीची पर्वणीच.. हवा तो खाऊ , हवी ती शॉपिंग आणि खेळायला भरपूर वेळ असणारा सवंगडी ... म्हणजे आजी आजोबा, असे समीकरण असल्याने नातींना कधी एकदा त्यांच्या गळ्यात पडतो असे झाले. मंदार अर्पिता आणि सना आदल्याच दिवशी रात्रीच्या फ्लाईटने पुण्यात पोहोचले .आणि भल्या पहाटे मुक्ता, आनंद आणि सोहा सोबत नाशिकच्या रस्त्याला लागले. रस्ताभर पोरींची बडबड आणि मोठ्यांच्या राहून गेलेल्या गप्पा मनसोक्त होत होत्या.
                   बाबांना रिटायर्ड होऊनही आठ वर्षे होऊन गेली होती... मात्र दोघांनीही नाशिकलाच रहायचे ठरवले होते. मुक्ता आणि मंदार सतत त्यांना आपापल्या घरी येण्याचा आग्रह करीत.. दोघांनीही आपापल्या प्रशस्त  फ्लॅट मध्ये एक बेडरूम खास आईबाबांची म्हणून राखून ठेवली होती. जावई आनंद आणि सून अर्पिता दोघांचेही आई-बाबांशी मस्त गुळपीठ होते...मात्र आई-बाबा त्यांच्या घरी जात ते परतीचे तिकीट काढूनच. पहाटे ट्रॅफिक कमी असल्याने रस्ता अगदी भराभर संपला आणि सगळे घरी पोहोचले सुद्धा.... पाहतात तो काय? दाराला भलंमोठ्ठ कुलूप. अर्पिता मंदारवर डाफरत म्हणाली, "तरी मी तुला म्हणाले होते आपण निघण्यापूर्वी त्यांना कळवूया. त्यांचा वेगळा प्लॅन असू शकेल... पण तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते ना!" प्रवासाने शिणलेल्या मंदारचा आवाज चढणार तोच मुक्ताने मध्ये उडी घेत, "हो ना! चुकलेच आमचे .. आई- बाबांना सरप्राईज देता देता आम्हीच सरप्राईज झालो." तेव्हढ्यात शेजारच्या फ्लॅटमध्ये बर्वे काकूंना ह्यांची चाहूल लागली असावी.. लगेच पुढे होत त्यांनी ,"या ना.. बाळांनो!" म्हणत सगळ्यांना घरात घेतले.पाणी वगैरे देत त्यांच्या हातावर घराच्या किल्ल्या टेकवत बर्वे काकू म्हणाल्या... "कालच सकाळी दोघे गावाला गेले. किल्ल्या नेहमीप्रमाणे माझ्याकडे ठेवून जातांना मला म्हणालेही उद्या मुले येतील त्यांना द्या." मुक्ता चटकन म्हणाली, "... म्हणजे आम्ही येणार हे माहिती होतं त्यांना.??" बर्वे काकूंच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य टिपत मंदार म्हणाला, "काकू कुठे जातोय काही सांगून गेलेत का?? किंवा काही निरोप??" बर्वे काकू क्षणभर आठवून म्हणाल्या, "कुठे जाताहेत ते काही सांगितले नाही पण बरंच सामान होत. बहुदा मोठ्ठी ट्रिप असावी."
                      त्यांनी दोघांचेही मोबाइल नंबर try केले पण व्यर्थ ...  तेही संपर्क क्षेत्राबाहेर होते. सगळ्यांच्या उत्साहावर पाणी पडलं.. नाराजीने घराचे दार उघडताच त्यांना एकापोठोपाठ एक आश्चर्याचे धक्के बसू लागले... त्यांचं जुनं दोन बेडरूमच घर अगदी उजळून निघालं होतं.. घराला नवीन रंग, मोजकं फर्निचर आणि ऊत्तम सजावट कलेेली दिसत होती. दर्शनी भागातल्या सेंटर टेबलवर काही गिफ्ट पॅक केलेली दिसत होती... त्यावर प्रत्येकाचे नाव घातलेले होते. सगळे स्वयंपाकघर आवरून ठेवलेले होते .. बहुदा मोजके भांडे ठेवून बाकी रिकामे केलेले होते.. टेबलवर डब्यांना पदार्थांच्या नावांच्या चिठ्ठ्या घातलेल्या होत्या. दोन बेडरुमचे रुपडेही पार बदलले होते. एका बेडरूमच्या दारावर मुक्ता ,आनंद आणि सोहा ह्यांचा फोटो सुरेख फ्रेम करून लावलेला होता तर बरोब्बर दुसऱ्या बेडरूमच्या दारावर तसाच मंदार, अर्पिता आणि सनाचा सुरेख फोटो झळकत होता. मुक्ताने भरल्या डोळ्यांनी आत पाऊल टाकलं. सुरेखसा नवा कोरा डबल बेड तिथे होता. एका कोपऱ्यात सुरेख ड्रेसिंग टेबल ... त्यांवर दोन आकर्षक पेरफ्यूमच्या  बॉटल्स देखील होत्या. त्या बेडरूमच्या भिंती तिच्या आवडत्या लव्हेंडर रंगात न्हाऊन निघाल्या होत्या .. एका गडद भिंतीवर तिचे बालपणापासून ते सोहच्या जन्मापर्यंतचे  सुरेख क्षण फोटोफ्रेममधून भिंतीवर नटले होते... , "ही नक्कीच आईची आयडीया असणार... आई खूप रसिक आहे बाबांना हे असलं काही जमायचं नाही." मुक्ता सहज बोलून गेली. आत्ता अगदी पहिल्यांदा माहेरी आल्यासारखं कडकडून आईच्या गळ्यात पडावं असं तीव्रतेने तिला वाटलं. तितक्यात एक एन्व्हलप तिला सापडलं... त्यात पत्र असावं.. त्यावर "मुक्तासाठी..." असं लिहिलेलं होतं..."सुरेख मोत्याचं अक्षर हे मात्र बाबांचंच! "  अधाश्यासारखं झटापट करत तिने इन्व्हलप उघडले... 
"प्रिय मुक्ता...
हे घर तुझे आहे कायम असणार... तुला नक्कीच वाटलं असणार ही सगळी सजावट तुझ्या आईची कल्पना .. कसे वाटले माझे सरप्राईज?? तुझे सगळे फोटो म्हणजे माझा खजिना , तुझी आठवण आली की पाहत बसायचो.. आज तुझा तुझ्या सुपूर्त करतो आहे.
बाबा." 
मुक्ताला भरून आलं... आज कित्येक वर्षांनी पुन्हा जणूकाही सासरी निघालोय आणि बाबांच्या गळ्यात पडून रडतोय असे क्षणभर वाटून गेले. बाबा मुळात मितभाषी... त्यात मुक्ता मुलगी म्हणून तिचे आणि बाबांचे फारसे संवाद तिला आठवत नव्हते. जुजबी कामापुरते बोलणे असायचे. मुक्ता अभ्यासात बेताची रुपानेही अगदी चारचौघींसारखी... त्यात जेमतेम 21व्या वर्षी ओळखीतूनच आनंदच स्थळ सांगून आलं आणि अगदी सहज होकार येत सारं जुळून आलं... मुक्ताची तेव्हा ह्या अनपेक्षित विवाहयोगाने भयंकर चिडचिड झाली.... आईने स्पष्टच सुनावलं...

"चांगला मुलगा, उत्तम घर, अतिशय चांगली माणस... हे सगळं नशीबाने मिळतं. नाही म्हणायला नखरे करायला तू अप्सरा आहेस असं वाटतंय का तुला? उद्या कुठला राजपुत्र येणार आहे मागणी घालायला?" 

"मी नकोशी झालीये ना तुम्हाला? द्या हाकलून घराबाहेर... " दिवसभर मुक्ताची तणतण सुरूच होती. ती खूप दुखावल्या गेली होती....डोळ्यांतून गंगा यमुना वाहत होत्या. रात्री बाबा शांतपणे तिच्या जवळ बसले आणि मायेने डोक्यावर हात ठेवून म्हणाले..

"बाळा ! तुझ्यावर आम्ही लग्न लादतोय का हे?? तुझी इच्छा असल्याशिवाय तुला कुणीही लग्न करायला भाग पाडणार नाही. आणि तुझ्याच घरातून तुला कुणी कसे काढेल बाहेर...?? मला कळतंय तुला वेळ हवाय आपण तो नक्कीच घेऊया."

बाबांनी त्याप्रमाणे वर्षभर तरी लग्न करायचे नाही कळवून टाकले... योगायोगाने आनंद वर्षभरासाठी दुबईला एका प्रोजेक्ट वर गेला आणि परतल्यावर थाटात लग्न पार पडले. 

"बाबा किती छान समजून घ्यायचे आपल्याला!"

                   मुक्ताच्या अश्रूंनी पत्र ओलेचिंब झाले होते .बाबांचे पत्र तसच हातात घेऊन धक्का बसल्यागत मुक्ता दुसऱ्या बेडरूममध्ये डोकावली... तिथेही असेच चित्र होते... भिंतींना मंदारचा आवडता मोतीया रंग एक भिंत गडद चॉकलेटी  आणि त्यावर मंदारच्या अगदी लहानपणापासूनचे सगळे बक्षिसे मिळवतानाच्या क्षणांचे फोटो... त्याच्याहीसाठी नवा डबलबेड... शेजारी सुरेख टेबल लॅम्प... बाजूला पुस्तकांचं नवं कोर कपाट आणि त्यात नीट मांडून ठेवलेली मंदारच्या खास आवडीची काही पुस्तक. त्याच्याही हातात एक लिफाफा होता. ह्या लिफाफ्यातले पत्र आईचे होते .

"प्रिय मंदार
      तुझ्यापाशी शब्दांत व्यक्त करणे कदाचित जमले नाही . पण तुझ्या प्रत्येक लहानमोठ्या यशाचा मला कायम खूप खूप अभिमान वाटला. असाच मोठा हो राजा! आशीर्वाद!
आई"

मंदारला चर्रर्रकन मनावर आघात करणाऱ्या आठवणी बोचून गेल्या. लहानपणापासूनच मंदार अतिशय हुशार फक्त अभ्यासातच नव्हे तर सगळ्याच स्पर्धा ,खेळ सगळ्यांत उत्साहाने भाग घ्यायचा आणि त्याने भाग घेतला की बक्षीस त्याचेच असे... मात्र त्याच्या कोणत्याच बक्षीस समारंभाला त्याच्या आईचे कधी येणे होत नसे... खरंतर इतरांचे आईवडील दोघेही असत त्यांचे कौतुक आनंद बघून मंदारला आपल्या आईचा राग येई... टिन एज वेडं वय! आपल्या आईला आपले मुळीच कौतुक नाही असेच त्याला वाटायचे. बिचारी आई कधी आजी आजारी असे, कधी आजोबा पडले असायचे तर कधी पणजीला एकट सोडून येणं तिला जमायचं नाही. आज मंदारला जाणवलं... किती वाईट वाटत असेल तिला आपल्या मुलाच्या कौतुकाच्या सहभागी होता येत नसतांना... किती शांतपणे धीरगंभीरपणे ती सतत सेवा करत असायची. दोघा भावंडांनी भरल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं.... सतत दडपणाखाली असलेले, कुणाच्यातरी तब्येतीची काळजी करणारे, सतत पैश्यांच्या विवंचनेत असणारे बाबा...... रात्रीची जागरणे करून डोळ्यांखाली काळी वर्तुळे उमटलेली आई... सतत अंथरुणातील व्यक्तीचे करून करून जेवणाची वासना उडालेली निस्तेज आई दोघांच्याही डोळ्यांपुढे तरळून गेली. त्यांच्या तारुण्याची कित्येक वर्षे ह्याच साऱ्यात गेली होती... दवाखान्याच्या वाऱ्या तर इतक्या की तिथला स्टाफ देखील त्यांच्या परिचयाचा झाला होता. ह्या साऱ्यापासून त्यांनी मंदार आणि मुक्ताला प्रकर्षाने लांब ठेवले होते... त्यांची शाळा , क्लासेस ,अभ्यास कशातही जराही बदल होऊ दिलेला नव्हता.... डबा देणे किंवा इतर सेवेला कधीही त्यांना पिटाळले नव्हते... बाबा नेहमी म्हणत ,

 " ही आमची जबाबदारी आहे.. तुम्हाला त्याचे ओझे नको."

           काय चाललंय नेमकं ?? ... हे कुणालाच कळत नव्हतं. एव्हाना अर्पिताने स्वयंपाक घरातील खाऊचे डबे उघडून बघायला सुरुवात केली.... आश्चर्य म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा एकेक खास पदार्थ त्यात होताच.  "सगळे पदार्थ खास आईंनी केलेले दिसताहेत." त्याच्या जवळ रेसिपींची डायरीही ठेवलेली होती. एव्हाना मुलींनी गिफ्ट भराभर उघडले... एका सुरेख पेटीत एक cd ठेवलेली दिसत होती. ह्यात नक्कीच काहीतरी असेल म्हणून आनंदने झटपट लॅपटॉप वर play केली.त्यात चक्क आईबाबांनी एक विडिओ तयार करून ठेवला होता. दोघेही समोर बसून मस्त गप्पा मारत असावे असे स्वरूप होते... सगळेच भवताली गोळा झाले..... 
आई बोलू लागली....

"मुलांनो कसे आहात ? आज आमच्या लग्नाचा 40 वा वाढदिवस तो जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असे आम्ही केव्हाच ठरवले होते. तुम्ही आज सरप्राईज द्यायला येणार असल्याची कुणकुण आम्हाला सोहा आणि सनाच्या गप्पांमधून लागली होतीच... आम्ही कुठे आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?? तर आम्ही जिथे आहोत तिथे खूप मजेत आहोत. काही महत्वाच्या सूचना आणि माहिती तुम्हाला असावी म्हणून हा सारा प्रपंच केला. ही माहिती प्रत्यक्ष भेटून देणे आम्हाला कदाचित शक्य नव्हते.... 
अर्पिता, किचनमध्ये ठेवलेल्या डायरीत श्री केटरर्स चा नं आहे. तिथे तुम्हा सगळ्यांच्या आवडीच्या जेवणाची ऑर्डर आधीच दिली आहे...  फक्त फोन करून मागवून घे... प्रवासाने थकले असाल मस्त गरम जेवून घ्या. आनंदच्या आवडीच्या नारळाच्या वड्या, मंदारसाठी बेसनाचे लाडू आणि चिमण्यांनो तुमच्यासाठी सुद्धा खाऊ करून ठेवला आहे. 
मंदार ,तुझ्या नावाच्या बॉक्स मध्ये काही महत्वाची कागदपत्रे आहेत काही fd, काही इतर savings आणि विशेषतः घराची सगळी आवश्यक कागदपत्रे  नीट ओळीने लावली आहेत. घर तू आणि मुक्ता दोघांचे आहे. 
मुक्ता , तुझ्या बॉक्स मध्ये बँकेच्या लॉकरच्या चाव्या आहेत . तिथे तुझे नाव आधीच जोडले आहे. ह्या लॉकरमध्ये सना आणि सोहासाठी एकसारखे दोन नेकलेस करून ठेवले आहेत. ह्या लॉकरमधील दोन बांगड्या आणि पोहेहार स्त्रीधन म्हणून तुझे आहे... मला जे माझ्या आईने दिले ते मी लेक म्हणून तुला सोपविले. .... बाकीचे सगळे दागिने मात्र अर्पिताचे आहेत.. ते ह्या घराण्याचे आणि तुझ्या बाबांनी मला घातले आहेत.  मंगळसूत्र मात्र मी गळ्यापासून वेगळे करू शकली नाही. शिवाय तीन पिढ्यांची चांदीची लहानमोठी भांडी आहेत.. खरेतर ती विकून पैसे तुम्हाला द्यावे असा सुज्ञ विचार तुझ्या बाबांचा होता मात्र आम्ही वस्तूत आठवणी जपणारी माणसं .. मोडणं जमलं नाही. .. तुम्ही सोयीप्रमाणे मोडून किंवा वाटून घ्या.
घरातील बरेचसे जुने सामान काढून घर राहण्यायोग्य ठेवले आहे... तुम्ही सगळे वाट्टेल तेव्हा आरामाला ,बदल म्हणून राहायला या. मुक्ता तुला कधीही तुझे माहेर संपले असे वाटायला नको." 

बोलता बोलता गळा भरून आल्याने आई क्षणभर थांबली.. मुक्ता मटकन खालीच बसली... काय आहे तरी काय ह्यांच्या मनात?? मुक्ताला आठवले.... आईचे वडील नाना आजारी पडले तसे नाशकातच येऊन राहू लागले... मुक्ता 2 वर्षांची होती तेव्हापासून ना तिला कधी आजोळ मिळाले ना आईला कधी माहेर... आईला आयुष्यभर काय वेदना होत असतील ... ते तिच्या एका वाक्यातून मुक्तापर्यंत पोहोचले . मुक्तासाठी आयुष्यभर हक्काचं घर ,माहेर असावं अशी सोय आईने करून ठेवली होती.  मंदारच्याही क्षणभर पायाखालची जमीनच सरकली... अशी निरवा निरवीची भाषा का?? आपण काही चुकीचे वागलोय का? आपण नकळत दुखावलं का त्यांना??

बाबा जणूकाही सारे दिसत असल्यागत म्हणाले, 

" अरे अरे असे घाबरून जाऊ नका ! तुमचे कुणाचेच काही चुकले नाही.तुम्ही आमची दोन अत्यंत गुणी , शहाणी आणि प्रेमळ मुले आहात.मुक्ता आणि मंदार इतकेच आनंद आणि अर्पिताही आमच्यावर माया करतात... त्यांचे प्रेम आपलेपणा सारे काही जाणवले वेळोवेळी... मात्र हे प्रेम असेच आठवणीत बांधून शेवटचा प्रवास करावा म्हणतोय. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही दोघेही आम्हाला आपापल्या घरी आरामात सुखात ठेवायला अगदी तयार आहात... पण खरं सांगू! पुढे पुढे नात्यांचाही काच होतो आणि उरते ते कोरडे कर्तव्य. आज आम्ही धडधाकट आहोत , विचार करू शकतोय उद्या कदाचित परावलंबी होऊ ... अश्या वेळी वेळ हातातून निघून गेलेली असते."

बाबा क्षणभर थांबले... आई बोलायला लागली...

"मी आणि हे दोघेही एकुलते एक अपत्य. तुम्ही आहात ना अगदी तसेच आम्ही खूप प्रेमळ मुलं. ... आम्हा दोघांचे आईवडील ,आजेसासूबाई अशी पाच वृद्ध माणसे आम्ही सांभाळली.... फार काही जगावेगळं केलं असं मुळीच नाही हं! ते कर्तव्य होतं आमचं .. आम्ही प्रेमान पार पाडलं इतकंच ...जुनी खोडे मजबूत दिर्घायुष्यी... जोपर्यंत रग आहे तोवर खूप कष्ट करणारी... मात्र एकदा अंथरूण धरले की संपलेच सारे. जीवन आणि मृत्यू हे दोन्ही टप्पे सुरेख आहेत पण मधला एक टप्पा भयंकर कंटाळवाणा आहे... त्यात माणूस खऱ्या अर्थाने जगत नाही आणि जगासाठी मरतही नाही."

बाबा आईच्या खांद्यावर हात ठेवत आधार देत म्हणाले

"माझे बाबा नशीबवान म्हणायचे .. पहिल्याच हृदयविकाराच्या झटक्यात सुटले. हॉस्पिटलचे तोंडही त्यांनी कधी पहिलेच नाही. मात्र माझी आई... आठ महिने अंथरुणावर तळमळत होती. हिची आई चार सहा महिनेच होती पण बाबा सहा वर्षे अंथरुणाला खिळून होते...तर माझी आजी तिच्या वयाच्या 92 वर्षेपर्यंत होती. एका विशिष्ट वयानंतर हॉस्पिटल आणि डॉक्टर हा केवळ समाधानाचा भाग बनतो. शरीर बरे होत नाही तर झिजत जाते... सतत डॉक्टर, औषधे, हॉस्पिटलच्या फेऱ्या ह्यातच आमचे अर्धे आयुष्य गेले आहे... ह्या साऱ्यात बरेचदा तुमच्यासारख्या गोजिरवाण्या मुलांवरही आमच्याकडून अन्याय झाला असेलही.."

बाबांचा गळा भरून आला...हात जोडले त्यांनी... आई  पुढे बोलती झाली...

"असं आपल्याच आई वडिलांना मृत्यूची वाट पाहत ....तळमळत पाहणं अत्यंत क्लेशकारक असतं... सारं सुरळीत आयुष्य उलथून जातं.. हतबलतेने बरेचदा निष्कारण चिडचिड होते. आयुष्यभरातील सारे आनंदाचे सुखाचे क्षण संपून त्या जागी त्यांच्या डोळ्यात उरते ती लाचारी... हा क्षण ही वेळ कधीही तुमच्यावर येऊच नये हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. आपापल्या मधुर आठवणी हृदयात साठवूनच एकमेकांचा निरोप घेऊया... कुणाचे ओझे व्हायला नको आणि कुणाचे आयुष्य कर्तव्याच्या नावाखाली भरडले जायला नको."

आईचे वाक्य संपायच्या आतच बाबा म्हणाले...

"आपल्या संस्कृतीनुसार ब्रम्हचर्य , गृहस्थाश्रम ह्याना आपण अनन्यसाधारण महत्व देतो मात्र सोईस्करपणे वानप्रस्थाश्रम मात्र टाळतो. वृद्ध मातापित्याची सेवा करणे हे जर मुलांचे कर्तव्य असेल तर हळूहळू विरक्तीची वाट चालणे हेही आईवडिलांचे कर्तव्य असायलाच हवे. आम्ही आमची सोय एका आश्रमात केली आहे उरलेले दिवस तेथेच पार पाडू असे सध्यातरी ठरवले आहे... आमचा शोध घेऊन भेटायला येऊ नका.. पुन्हा पुन्हा आम्हाला मोहात पाडणे तुमच्या फारसे हिताचे नाही. आम्ही देहदान आणि अवयवदानाचा फॉर्म भरला आहे... कायद्यानुसार डेथ सर्टिफिकेट तुमच्यापर्यंत पोस्टाने येईल...... आमच्या अखेरच्या प्रवासाला आम्ही निघतो आहोत.... आयुष्य किती आहे , कसे आहे माहीत नाही मात्र आमच्या साऱ्याच कर्तव्यातून आज तुम्ही मुक्त झालात. तुम्हा सगळ्यांना खूप आशीर्वाद! सोहा आणि सनाला गोड गोड पापा ! "

आई-बाबा दोघांनी हात जोडत हात हलवत निरोप घेतला आणि विडिओ बंद झाला. ह्या अनपेक्षित धक्क्याने सगळेच भेदरून गप्पगार झाले होते... तेव्हढ्यात श्री केटरर्स च्या माणसांनी जेवणाचे पार्सल आणून दिले.... सोबत एक भला मोठ्ठा केक सुद्धा होता. त्या केकवर सगळ्यांचा गेल्या दिवाळीतला सुरेख फॅमिली फोटो होता... सुखद क्षणांची मनात साठवण करत विरक्त होण्याचा  अनोखा प्रवास "वानप्रस्थाश्रम".
 
©️🔏 यशश्री रहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

1 टिप्पणी:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!