फॉलोअर

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

अपूर्ण

                     डॉ. शर्मिष्ठा नाडकर्णी सोनगावच्या जिल्हा रुग्णालयात स्त्री रोग आणि प्रसूती तज्ञ म्हणून रुजू झाल्या.  हा तसा अतिदुर्गम म्हणावा असा भाग ... आजूबाजूच्या शहरांशी फारसा संपर्क नसलेला काही खेड्यांचा, तालुक्यांचा हा पुंजका. व्यापाराच्या दृष्टीनेच शहराशी संबंध ,बाकी शेतीवाडीत मग्न लोक. गेले काही वर्षांत आरोग्य सेवांच्या अभावाने येथे गर्भवती महिला आणि प्रसूती दरम्यानच्या मृत्यूचे प्रमाण विलक्षण वाढले आणि शासनाला जाग आली... मग येथेच जिल्हा रुग्णालयाची स्वतंत्र इमारत उभारून मोठ्या सोयीसुविधा निर्माण केल्या मात्र ह्या आडगावात पूर्णवेळ महिला डॉक्टर मिळणार तरी कोण? डॉ. शर्मिष्ठा का कुणास ठाऊक येथे येण्यास तयार झाल्या. त्यांना शेजारचे बैठे घर, कामाला पूर्ण वेळ नोकर, माळी , गाडी ड्रायव्हर अश्या अनेक सुविधांसह मोठे आर्थिक पॅकेज देण्यात आले. आर्थिक पॅकेजचा मोह पडावा अश्यांपैकी डॉक्टर शर्मिष्ठा नव्हत्याच..... खरंतर त्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्या अक्षरशः खोऱ्याने पैसा ओढत होत्या... मात्र त्यांच्या आयुष्यात एक क्षण असाही आला की हे सारे सोडून लांब कुठेतरी निघून जावेसे त्यांना वाटले आणि त्यांनी सोनगावची वाट निवडली. गव्हाळ वर्ण, काळेभोर टपोरे डोळे,सात्विक तरीही प्रचंड आत्मविश्वासाने उजळलेला चेहरा आणि लहानशी इवली चण.. त्यांच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत मातृत्व होतं. साध्या सुती फिकट साड्या नेसणाऱ्या , वय चाळीशीच्या आत -बाहेर... त्यांच्या साधेपणाकडे पाहून त्या प्रतिथयश स्त्री रोग तज्ञ असतील असा विश्वासच बसत नसे.
                        सोनगावच्या रुग्णालयाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा मंत्री महोदयांच्या हस्ते पार पडला, त्याचा फार मोठा गाजावाजा मीडियाने केला. फॉलिक ऍसिड, लोह किंवा तत्सम गर्भवतींना गरजेच्या असणाऱ्या गोळ्यांचा मोफत वाटपही सुरू करण्यात आला. रुग्णालयात 10 कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात आली. यातले बहुतेक सगळेच शहरात राहून अप डाऊन करणारे दोघेच स्थानिक म्हणावे असे, पैकी एक शिपाई देवधर... सगळे ह्याला "देवा" म्हणायचे . आणि दुसऱ्या नर्स साठे बाई. नर्स चंद्रकला साठे बाई चांगल्या अनुभवी होत्या आधी बरीच वर्षे वेगवेगळ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केले होते... आता सोनगाव हे त्यांचे मूळ गाव म्हणून त्यांनी बदली मागून घेतली होती. साठे बाईंची गावात सगळीकडे ओळख होती. डॉक्टर शर्मिष्ठाना स्वयंपाकाची बाई पाहून दे, घर लावून दे, झाडांची रोपे माळी बुवांना आणून दे अशी सगळी कामे झटपट करून नर्स साठे बाईंनी "डॉक्टरीण बाईंना" मोठीच मदत केली होती. डॉक्टर शर्मिष्ठाला ह्या "डॉक्टरीण बाई" संबोधनाची मोठी गंमत वाटे.... सारा गावच त्यांना तसेच संबोधायचा. गावातली माणसे चांगली होती... त्यांना आदराची वागणूक मिळायची.... वेळप्रसंगी स्वतःहून मदत करायची. दोन चार दिवसांत घर, हॉस्पिटल सगळं नीट सुरळीत झालं... मात्र असे असूनही फारसे पेशंट हॉस्पिटलकडे फिरकत नव्हते. एकाट दुकट काही त्रास होणाऱ्या वयस्कर स्त्रिया येत मात्र गर्भवती स्त्रिया अजिबात फिरकत नसत. डॉक्टर शर्मिष्ठा हा काय प्रकार असावा? म्हणून काळजीत पडल्या. त्यांनी नर्स साठेंकडे ह्या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी मोठी खरी मेख सांगितली.. मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक भराभर पोट फाडतात अर्थात सीझेरियन करतात ...असा त्या अडाणी गावकऱ्यांचा समज होता. डॉक्टर शर्मीष्ठांनी कपाळाला हात लावला..... ह्या वेडेपणावर हसावं की रडावं हेच त्यांना कळेना.  त्यांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये सुद्धा त्यांनी अगदीच रेअर केस मध्ये, अत्यावश्यक झाले तेव्हाच सिझेरियनचा निर्णय घेतला होता. 
                      एक दिवस अचानक हे सारेच चित्र बदलले.  एक आजीबाई आपल्या सुनेला घेऊन आल्या ... आजीबाई चांगल्याच खमक्या असाव्या.सून नाजूक अर्धमेली... तिलाच पोर म्हणावे अश्या वयाची... बाळ आडवे आल्याने पुरती अडली होती. दोघींच्याही अंगावर भरपूर दागिने होते मात्र पोर फिकुटलेली पांढरी निस्तेज ...वय फार तर 20 असेल आणि हे तिचे तिसरे बाळंतपण होते. आजीबाई काहीही करायला तयार होत्या कारण दोन नातींच्या पाठीवर आता नातू जन्माला येणार असल्याचे भाकीत कुणीतरी केलेले होते.आजीबाई हात जोडून म्हणाल्या..

"डाक्टरीन बाई ..काय बी करा पोरगा वाचला पाहिजे "

त्या बिचाऱ्या पोरीच्या डोळ्यांत दोनच टप्पोरे अश्रू डॉ. शर्मीष्ठांनी पाहिले... नर्स साठे बाई तयारीला लागल्या ... बाळ बाळंतिणीची सुखरूप सुटका झाली पुढे त्या तालेवार घराण्याच्या पुत्रजन्माचा जल्लोष झाला.... आणि हॉस्पिटलचे ग्रह बदलले...आता डॉक्टरीण बाईंच्या हाताला गुण असल्याचे लोक बोलू लागले आणि एकुणात उपचाराला येणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ झाली.काही दिवसांनी ती पोर आपल्या आईला घेऊन डॉ. शर्मीष्ठांना भेटायला आली. आईनं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं... 

"माझी पोर तुमच्यामुळं वाचली बाई तुम्ही देवमानूस आहात"

डॉ. शर्मीष्ठांना हे नवीन होतं... त्यांनी मायेने त्या मायलेकींची चौकशी केली... "लेक खूप नाजूक आहे तब्येतीने ....तिची काळजी घ्या" असेही बजावले. बाळाचीही चौकशी केली ...

"पोरगं झालं सुटले बाई एकदाची." ती म्हणाली.
ऐन विशीतच बरंच काही सहन केलेलं दिसतंय हिने... मुलीची आईच मग पुढे म्हणाली.....

"हिच्या धन्याची पहिली बायकू माजी भाच्ची ... पहिल्याच बाळतपणात गेली... पोरगी झाली व्हती... कुनी फिकिरच केली न्हाई ... माय मेल्यावर होती तरी आठ दिवस."

बापरे! काय भयंकर आहे हे.... नुकतीच जन्मलेली पोर आई गेल्यावर उपाशी मेली... शहरातच अख्ख आयुष्य काढलेल्या डॉ शर्मीष्ठांसाठी हा मोठ्ठा धक्का होता. शहरात क्रूर माणसे नव्हती असे नाही पण ह्या थराची क्रूरता त्यांनी ऐकली , पहिली नव्हतीच. बाई पुढे बोलू लागल्या..

"बरी गेली ... सुटली बिचारी ह्या नरकातून. पुडं तिच्या जागी माही मोठी ल्येक देल्ली... पण तिले 2 वर्सात काय पोर बाळ झालं न्हाई मंग ही धाकटी देल्ली. हिला 2 पोरीं झाल्या... आता ह्या खेपला ल्योक झाला नस्ता तं त्याहिनी हिच्या बी उरावर सवत आनली असती."

मायलेकी पुन्हा पुन्हा आभार मानून परतल्या. डॉ.शर्मीष्ठांना अचानक खूप खूप थकवा जाणवू लागला... कुणीतरी जणू हातापायातले त्राणचं काढून घेतले असावे... नर्स साठे बाई त्यांचा उतरलेला चेहरा पाहून सारेच समजून गेल्या असाव्या. पुढच्या एक दोन तपासणीसाठी आलेल्या पेशंटना दुसऱ्या दिवशीची वेळ  देऊन त्यांनी डॉक्टरीण बाईंना आराम करायला जायला सांगितले. डॉ. शर्मिष्ठा घरी जाऊन आडव्या झाल्या... शारीरिक ताणापलीकडे मानसिक ताणाने त्या प्रचंड खचल्या असाव्या. संध्याकाळी  जरा उशिराच नर्स साठे बाई त्यांच्यासाठी कॉफी आणि बिस्किटे घेऊन गेल्या. नर्स चंद्रकला साठे बाई मोकळ्या होत्या स्वभावाने... त्यांच्याशी बोलून बरं वाटायचं... खरंतर मोकळं वाटायचं डॉ शर्मीष्ठांना. साठे बाई आयुष्याचं तत्वज्ञान कोळून प्यायल्या होत्या... त्यांचा नवरा परागंदा झालेला असल्याचे शिपाई देवा एकदा म्हणाला. त्यांनी सहज एक दिवस साठे बाईंकडे कुटुंबाची चौकशी केली. हसत हसत साठेबाई म्हणाल्या... 

"कुटुंब म्हणावं असं काही न्हाई ... दहावीला होती बाप मेला म्हणून आईनी घाईघाईत लग्न उरकून टाकलं .. एक पोरगी पदरात घेऊन वर्षभरात परतली... नवरा जो गायब झाला तो सहा महिने उगवलाच नव्हता. जातांना अनेकांकडून पैसे उचलले होते.. खूप देणी करून गायब झाला... घरातले सामानसुमान ,भांडीकुंडी विकून देणी फेडली सगळी आणि आईकडे आली. तिनेच कुणाकुणाच्या हातपाया पडून नर्सिंग ला घातले... दोन वर्षे माझी पोरही सांभाळली. मी नोकरीत लागले हळूहळू आम्ही तिघी मायलेकी मज्जेत जगू लागलो.."

"चला बरं झालं.. एकमेकींच्या आधाराने जगता आहात. आता पोरीला शिकवा चांगलं, मोठी करा."

विषण्ण हसत चंद्रकला बाई सांगू लागल्या...

"इतकं सोपं असतं आयुष्य तर किती बरं झालं असतं. पाच सहा वर्षांनी नवरा परतला. चारचौघींसारखा माझा संसार सुरू व्हावा , अशी वेडी आशा आईला वाटून गेली.  नवरा नाही म्हणजे मी अपूर्ण... अश्या अर्धवट आयुष्याला काय अर्थ? असं सगळं समजावून पुन्हा संसार सुरू झाला... नवऱ्याला फुकटच अन्न आणि बायको दोन्ही मिळत होते. खरं सांगते... त्याला आयुष्यभर पोसायची तयारी होती माझी. त्याच्या विडीकाडीला पैसे द्यायची ...महिन्यातून एकदा दारूलाही द्यायची. वाटलं संसाराचं पूर्णत्व ह्यातच आहे.. नवरा , कुटुंब , मुलं बाळं.... दुसऱ्यांदा दिवस गेले . नवऱ्याला मूल हवं होतं... सहावा महिना चालू होता ... नवरा पुन्हा गायब. गेल्या वेळ सारखं प्रचंड कर्ज काढून ठेवलेलं होतं... दुसरी पोरगी आणि अवाढव्य देणी दोन्ही माझ्या पदरात घालून हा माणूस पळून गेला होता."

आवंढा गिळून वाहणाऱ्या अश्रूंना माघारी लोटत चंद्रकला बाई आपली कर्मकहाणी सांगू लागल्या..
"इतके घाणेरडे माणसं येऊन उभे राहायचे दारात ... खूप वाईट बोलायचे मला, माझ्या लेकींना विकून टाकण्याच्या धमक्या द्यायचे... त्यांचे कर्ज फेडणे शक्यच नव्हते मला... शेवटी पोलिसांकडे तक्रार केली...ह्या साऱ्यात काळजीने खंगून आई गेली.... 3 वर्षे देणी फेडत होते मी ...कसे काढले आम्ही ते दिवस आमचे आम्हाला माहीत."

इतका वेळ डोळ्यांत अडवलेले पाणी बाहेर पडलेच...
"थोड्या थोडक्या नाही दहा वर्षांनंतर नवरा परत आला. नातेवाईक, शेजारी सगळीकडे जाऊन रडून आला माझे पाय धरले... पुन्हा पुरुषाशिवाय बाईचा जन्म अपूर्ण, पोरींना बाप हवाच अशी आळवणी जो तो करू लागला. मात्र ह्या वेळी मी त्याला घरात घेतले नाही माझ्या मुलींना अश्या बापाची आणि मला अश्या भेकड पुरुषाची मुळीच गरज नव्हती. त्यापेक्षा मला माझं अपूर्णत्व मान्य आहे... ह्या समाजात कितीही काहीही केलं ना तरी बाई अपूर्णच असते... कधी सासरी नांदली नाही म्हणून , कधी पोर झालं नाही म्हणून , कधी मुलगाच झाला नाही म्हणून तर कधी नवरा टिकवता आला नाही म्हणून .... शेवटी बाई म्हटली की अपूर्णच.... असू देत अपूर्ण! ह्या लोकांना कधी कळणार आहे कोण जाणे?... बाई म्हणजे नवऱ्याची गुलाम आणि मुलं जन्माला घालणारं यंत्र नाही.... ह्या असल्या अपूर्णतेच्या व्याख्या ज्या कुणी गाढवांनी मांडल्या असतील त्यांची तर xxx xxx " 

कडाकडा बोटे मोडीत अस्सल इरसाल शिव्यांची बाराखडी उच्चारली..... सोज्वळ सात्विक डॉ. शर्मीष्ठांना त्या शिव्या आणि तो संताप मनातून आवडलाच.. ... साठे बाईंना टाळी देत त्या हसत सुटल्या. तेव्हढ्यात देवा शिपाई काय चाललंय म्हणत डोकावला...

" हे बघा आले पूर्णपुरुष.. नरदेहधारी नारायण..."

 साठे बाईंनी वरकडी केली... आणि दोघी खळखळून हसू लागल्या. आज खूप दिवसांनी डॉ. शर्मिष्ठा मनापासून हसल्या होत्या. गेले काही महिने इतका ताण त्यांनी वाहिला होता की जगणं जणू काही त्या विसरूनच गेल्या असाव्या. गेले चार महिने अपूर्ण... अपूर्ण! हा शब्द त्यांच्या आयुष्यात थैमान घालत होता... इतकं सोपं साधं तत्वज्ञान आपल्याला का कळले नाही?
                   डॉ. योगेश नाडकर्णी आणि डॉ शर्मिष्ठा ह्यांचा प्रेमविवाह... आता यशस्वी म्हणता येणार नाही.. पण तेव्हा त्यांच्या मित्रमंडळात चांगलाच चर्चिल्या गेलेला. डॉ. योगेश बालरोगतज्ज्ञ... दोघांच्या लग्नाला 21 वर्षे झालेली... हॉस्पिटलचा अवाढव्य पसारा आणि अखंड कामात स्वतःला झोकून दिलेलं. पाहिली काही वर्षे बाळाची वाट पाहूनही दिवस न गेल्याने डॉ शर्मीष्ठांनी सगळ्या टेस्ट करवून घेतले... त्यांच्या  गर्भाशयातील काही दोषांमुळे त्या कधीही आई होऊ शकणार नव्हत्या. एक स्त्री म्हणून कोसळलेल्या शर्मिष्ठाला डॉ. योगेश अगदी सहज म्हणाले होते..

"नाही तर नाही. काय गरज आहे आपल्याला . आपले हे हॉस्पिटल म्हणजे एक मुलंच आहे . आपल्याला ते वाढवायचे ... विसरून जा हे सगळे आपण दोघे आहोत ना एकमेकांना."

काय अभिमान वाटला होता डॉ .शर्मीष्ठांना आपल्या निवडीचा. आपल्यातला एव्हढा मोठा दोष किती सहज स्वीकारला ह्याने... मनावर उपकारांचं ओझं घेऊनच त्या वावरल्या होत्या. आता सारे सुरळीत झाले आहे असे वाटत असतांनाच एक दिवस होत्याचं नव्हतं झालं.

               त्यांच्या एका वॉर्ड बॉयच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी आधार म्हणून घेण्यात आलेली त्याची विधवा पत्नी डॉ योगेश ह्यांच्या बाळाची आई होणार होती. अश्या गरजू बाईशी आपल्या नवऱ्याने ठेवलेले संबंध हा प्रचंड मोठा धक्का होता तिच्यासाठी मात्र त्याहून मोठा धक्का तर अजून बाकी होता. डॉ. योगेशना स्वतःचा वारस म्हणून मिळणारे हे मूल हवे होते पण त्यासाठी त्या बाळाच्या आईशी लग्न करण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांना समाजात मिरवायला पत्नी आणि मुलाला वाढवायला दायी म्हणून डॉ शर्मिष्ठा हव्या होत्या.  जन्मानंतर त्या बाळाला रीतसर दत्तक घेण्याचा त्यांचा विचार होता.... त्यांच्या दृष्टीने हा साधा सरळ व्यवहार होता ह्यात सगळ्यांचं भलंच होणार होतं. नवरा नसलेल्या आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या त्या गरीब बाईला त्यांनी पूर्णत्व मिळवून दिलं होतं तर मूल जन्माला न घालू शकणाऱ्या आपल्या बायकोच्या पदरात आपलं मूल घालून तिला ते पूर्णत्व प्राप्त करून देणार होते . 

" तुझ्यासारख्या मूल जन्माला न घालू शकणाऱ्या स्त्रिला हे नीतिमत्तेचे दाखले देणे शोभत नाही शर्मिष्ठा... तुझं अपूर्णत्व मी बिनबोभाट झाकून नेलंय आता त्याची परतफेड कर."
किळस वाटावी असे त्याचे शब्द ऐकून शर्मिष्ठाने घर सोडले... आईकडे गेली खरी पण बहीण, भाऊ, भावजय आणि एव्हढेच नव्हे तर आई सुद्धा परिस्थितीचा स्वीकार करायला सांगू लागली...

"कुठल्यातरी अनाथाश्रमातून दत्तक घेतलं असतं की मूल .. तसंच समज. शर्मिष्ठा दोष तुझ्यात आहे तू स्त्री म्हणून अपूर्ण आहेस.. तू त्यांना त्यांचं मूल दिलं असतंस तर हा प्रश्नच उद्भवला नसता." 

आईचे शब्द डोक्यात घणाचे घाव बसवावेत तसे बसत होते .. त्यातच सोनगावच्या ह्या रुग्णालयातली संधी मिळाली आणि डॉ. शर्मीष्ठांनी त्या साऱ्या पासून दूर येथे येऊन राहणे पसंत केले. मात्र आज त्या मनानी खूप खूप स्थिर झाल्या होत्या. साधारण दोन चार दिवसांआड जाब विचारायला यायचा तसा डॉ.योगेशचा फोन रात्री आलाच....

"शर्मिष्ठा.. काय ठरवलं आहेस तू? माझ्याकडे फार वेळ नाही. ही तुझी समाजसेवेची नाटकं करून झाली असतील, डोकं जागेवर आलं असेल तर परत ये. मला माझ्या बाळाचा जन्म तुझ्याच हातून सुखरूप व्हायला हवाय."

एकेक शब्द जुळवत ठामपणे डॉ. शर्मिष्ठा म्हणाल्या,

"माझे अपूर्णत्व मला मान्य आहे,नव्हे केव्हाच मी ते स्वीकारले सुद्धा आहे. मात्र ते पूर्ण करायला तुझ्यासारख्या भेकड पुरुषाची गरज पडावी इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. एका गरीब ,  बिचाऱ्या असहाय स्त्रीचा गैरफायदा घेऊन जन्माला येणाऱ्या तुझ्या त्या अनौरस बाळाची आई होऊन कोणतेही पूर्णत्व मला प्राप्त करायचे नाही. दोन दिवसांत माझे वकील डिव्होर्सची नोटीस देतील तुला... मला काहीही घाई नाही. गमावण्यासारखं आता माझ्याकडे तरी काहीही उरलं नाही... हॉस्पिटल माझंही आहे त्यावरचा हक्क मी सोडणार नाही... तुला काय करायचं ते करून घे. आता सारखा फोन करून त्रास देऊ नकोस."
म्हणत डॉ. शर्मीष्ठांनी रिसिव्हर आपटला. आज खूप दिवसांनी त्या शांत झोपल्या.
🔏©️ यशश्री रहाळकर





1 टिप्पणी:

  1. सोरोगेटचाच प्रकार आहे हा . फक्त नितीमत्ता सोडून एका गरीब स्त्रीवर लादलेला. हा व्यभिचार आहे हे माहित असूनही पति महाशय म्हणतात की मी तुझ्या वर उपकारच करतोय. पति-पत्नी यांच्यातील नातेसंबंध प्रामाणिक पणावर एकमेकांच्या विश्वासावर घट्ट टिकलेला असतो.एखादा निर्णय ( नातेसंबंधातील) दोघनी मिळून घेतला असेल तर ठिक आहे. अन्यथा नाही.
    सौ. यशश्री यांनी लेख परखड आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी स्त्रीत्वाला न्याय देणारा लिहिला आहे.स्त्रीने कधीच स्वत:ला अपूर्ण मानू नये ही गोष्ट छान मांडली आहे सर्वांना खासकरून स्त्रियाना लेख खूप खूप आवडेल .लेख खूप खूप आवडला.समाजाला मार्गदर्शक म्हणून असेच लेख लिहित रहावे ही सदिच्छा आहे
    श्री व सौ.जे.एस.शिंदे.कोल्हापूर.

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!