मला माणसांमध्ये कथा सापडतात की कथेत माणसे भेटतात???? ... असा प्रश्न नेहमीच पडतो. कधीकधी 100% वास्तव दर्शवणारी कथा लिहिली की वाचकांच्या प्रतिक्रिया असतात, "काहीही काय! असं होऊच शकत नाही." तर कधीकधी पूर्णतः कथा कल्पनेवर बेतलेली असली तरी वाचक ," ही तर अगदी माझी कथा !" असेही म्हणू लागतात. मात्र ही कथा ते दाहक वास्तव आहे जे तुम्हाला अगदी सहजपणे तुमच्या आजूबाजूला सापडेल. .... ह्यातली पात्र काल्पनिक न वाटता जिकडे तिकडे ती जिवंतपणे तुमच्या समोर उभी राहतील. कदाचित ह्यापुर्वीही अशी व्यक्तिमत्वे तुम्हाला भेटली असतील पण त्यांच्या दुःखाचे कंगोरे, त्यांच्या वेदना ह्यांची नव्याने अनुभूती निश्चित झाल्याविना राहणार नाही. नमनाला घडाभर तेल घातल्यावर मी मूळ कथेकडे वळते.... वयाच्या 59 व्या वर्षी.... रिटायरमेंट नंतर पुष्पा बाईंनी , 56 वर्षांचे आपले सहकारी दिघे सरांसोबत "लिव्ह इन" मध्ये राहण्यास सुरुवात केली.... ही बातमी धडकली आणि जुन्याच काय नव्याही पिढीने तुच्छतेने टवाळी करण्यास सुरुवात केली. जुन्या पिढीतल्या लोकांना ही कृती म्हणजे त्यांच्या महानतम संस्कृतीला नरकात ढकलणारी, गंगेत बुडवणारी वगैरे वाटत होती ...... तर त्यांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीला हे असं म्हातारचळ लागल्यागत वागणं पिकल्या पानाचा हिरवा देठ वाटत होतं. शाळेच्या ग्रुपवर सुद्धा ह्या विषयाची खमंग आणि सवंग चर्चा रंगली... मी ह्या विषयांत उडी घ्यायचीच नाही ठरवलं होतं; कारण एकतर तळ्याकाठी बसून गोटे मारून चिखल उडवणं आपल्याच्याने होत नाही. अश्या वेळी मी डायरेक्ट चिखलात उतरते... मी ताबडतोब पुष्पा बाईंना फोन केला आणि थोडा वेळ मागितला....
"बोल ग तू ... तुला कधीपासून वेळ मागावा लागतोय मावशीकडे??"
तिचा आवाज इतका साधा आणि सच्चा होता की मी ते चिखल वगैरे विसरूनच गेले. तिने आधी माझी नेहमीसारखी चौकशी केली, मग आईची चौकशी केली.... नंतर आपली बाग आणि नवीन लावलेली झाडे यावर भरभरून बोलू लागली... आवाजात एव्हढा आनंद , एव्हढा उत्साह मी पूर्वी कधीही अनुभवलाच नव्हता. मी तिला आणि ती मला माझ्या जन्मापासून ओळखते... माझी आई आणि ती एकाच शाळेत शिक्षिका... आई वयाने काही वर्षे मोठी.... तरीही दोघी अगदी घट्ट मैत्रिणी. आई रिटायर्ड झाल्यावर गाव सोडून पुण्यात निवांतपणे राहायला म्हणून आली. तसे गावाकडे अधून मधून जाणे व्हायचे... सगळ्यांशी फोनवरूनही गप्पा सतत सुरू असायच्या. पुष्पा मावशी आणि आईचा तर आठवड्यातून एकदा तरी फोन व्हायचाच. मी मुद्दाम वाट वाकडी करून ऑफिस सुटल्यावर आईकडे गेले... आयती कॉफी घेत सहज बोलावे तसे विचारले..
"काय म्हणतेय तुझी लाडकी मैत्रीण.....??"
माझा प्रश्न पूर्ण व्हायच्या आत आई करड्या स्वरांत म्हणाली...
" पुष्पा आणि दिघे सरांबद्दल बोलायचंय का तुला?"
मी चाट... आईने तर विकेटच काढली.
"म्हणजे तुला कल्पना आहे ह्या प्रकरणाची?"
"हो आणि मुळात ते प्रकरण नाही."
आई शांतपणे म्हणाली. रिटायर्ड होऊनही आईच्या आवाजाची धार आणि उच्चारातली जरब जबराट होती. माझ्या डोळ्यात डोळे घालून तिने थेट प्रश्न केला...
"तुला नेमकी काय माहिती आहे ग पुष्पावती राजे बद्दल ?? जो तो उठतोय आणि वाट्टेल ते बोलत सुटलाय ..."
म्हणजे आईकडे अनेकांनी आडून आडून चौकशी केलेली दिसतेय... अश्या वेळी गप्प बसण्यातच फायदा असतो. एकीकडे उपम्याचा रवा भाजत आणि दुसरीकडे सगळा राग कांद्यावर काढत ... आईचे स्वगत सुरू झाले.
"अख्खे आयुष्य एकटीने काढले, उदास असायची, लग्न कार्यात एकटीच कुठेतरी बसायची... तेव्हा केला का तिचा विचार कुणी? पाठच्या बहीण भावंडांसाठी तर फक्त ATM होती .. पैसे पाहिजे असले आयते की हिची आठवण येणार. तिच्या आयुष्यातले प्रश्न सोडवले का कुणी?? आता प्रश्न पडलेत प्रत्येकाला."
मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि पांढरेशुभ्र नारळ घालून सजलेल्या उपम्यावर मी माझं लक्ष केंद्रित केलं.. आईची अखंड बडबड सुरूच होती. तिच्या संतापाचा उद्रेक झाला की ती अशी धबधब्यागत कोसळत राहते... लहानपणीपासून पाहून हे पक्क ठाऊक झालं होतं मला.
"तिच्या त्या महास्वार्थी बहिणीचा आणि चोंबड्या भावजयीचा फोन येऊन गेला... मला मानभावीपणाने म्हणाल्या, "तुमचंच ऐकतील त्या! त्यांना म्हणा ह्या वयात हे शोभत नाही... लग्न वगैरे करू नका "... अशी खरडपट्टी काढली ना दोघींची .. चरकातून ऊस काढून पिळावा तसं शोषण केलं तिचं ..... आताही तिच्यानंतर विम्याच्या पैश्यांचीच काळजी ह्यांना... "
पुष्पावती राजे उर्फ पुष्पाबाई डि. एड. पूर्ण होताच , जेमतेम 20व्या वर्षी ओळखीतून एक शाळेत लागल्या. नेमके त्याच वर्षी क्लार्क असलेल्या त्यांच्या वडिलांनी काहीतरी पैश्यांची अफरातफर केली आणि त्यांची नोकरी गेली. आता पाठचा भाऊ धाकटी बहीण आणि आई वडील आणि सगळ्या चरितार्थाचा भार पुष्पाबाईंवर येऊन पडला. तो काळच असा होता... वडील निर्वतले किंवा काही विपन्न दशा आलीच तर सगळे पोरांचे लेंढार जबाबदारी ह्या गोंडस नावाखाली मोठ्या अपत्यावर येत असे... मोठा मुलगा असेल तर त्याचे गरीब कष्टाळू मुलगी बघून लग्न तरी होई पण मुलगी असली तर संपलेच सारे!... पुष्पबाईंचेही फारसे वेगळे झाले नाही. ह्या मुलीचे लग्न करायला हवे , ही गोष्टच आईवडिलांनी हद्दपार केली. सुरुवातीला काही नातेवाईक , मित्रमंडळी ह्यांनी काही स्थळे सुचवून पहिली पण रिकामटेकड्या विड्या फुंकत बसलेल्या तिच्या वडिलांना आता काम करणे मान्यच नव्हते. एका बरोबर काम करणाऱ्या विधुर शिक्षकाने थेट पुष्पाबाईंनाच लग्नासाठी विचारले...... आईने पदर पसरून मोठा तमाशा केला... "धाकट्या भावंडांना आणि मला वीष दे मगच लग्न कर" असेही आई म्हणाली. हे कलियुग आहे इथे माणूस सर्वांत आधी स्वतःचा विचार करतो... स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पिल्लावर पाय ठेऊन उभी राहणारी माकडाची कथा म्हणजे कलियुगातील दाहक वास्तव आहे. माणसाकडे काही अंशी स्वार्थ सुद्धा असलाच पाहिजे.... नुसते त्यागानी हात रिकामेच राहतात... आणि त्या त्यागाची जाणीव असतेच असेही नाही. पुष्पाबाईंनी त्यागाची निवड केली आणि हळूहळू त्या पैसे कमवणारी मशीन झाल्या..... त्यापलीकडे माणूस म्हणून ह्या मशीनच्या काही गरजा असतील हे कुणाच्याच गावी नव्हते.
वर्षे सरत होती... 2 वेळेचं जेवण आणि वर्षाला 2 जोडी सुती साड्यांशिवाय पुष्पाबाईंच्या गरजा असूच नयेत अशी तजवीज घरच्यांनी केली. पगार हाती येण्याच्या आधीच उधारीवर खर्च केलेले असायचे... मग पुष्पाबाई ते फेडत बसायच्या. ह्या साऱ्यात पैसे मागणे आणि ते देणे हा व्यवहार उरलाच नव्हता. भावंडे मोठी झाली. बहिणीने पळून जाऊन लग्न केले... तिची परिस्थिती अगदीच बेताची. भावाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि निरुद्योगी भटकणे सुरू केले... एक दिवस तोही लग्न करून बायको घरात घेऊन आला. आता पुष्पाबाईंची रवानगी स्वयंपाकघरात झाली. झोपायला पलंग तर नाहीच पण पुरेशी झोप घेणेही कठीण झाले. बापाच्या संसाराचा गाडा ओढता ओढता भावाच्या संसाराचा गाडा त्या कधी ओढू लागल्या हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. पुष्पाबाईंच्या पैश्यांवर आपला हक्क अबाधित रहावा म्हणून बहिणीने आपली लेक शिक्षणाच्या निमित्ताने पुष्पा मावशीकडे पाठवली ... वर माझ्या लेकीवर तिचा फार जीव अगदी पोटच्या मुलीसारखा... माय मरो मावशी जगो वगैरे आळवण झाली. बहिणीने आपली लेक पुष्पा बाईंच्या गळ्यात अक्षरशः बांधली.
"तरुण वयात त्याग करून देवमाणूस होण्याचं व्यसन एकदा लागलं ना की ते सुटता सुटत नाही बघ! "
आई त्राग्याने म्हणाली
"ताईचे इतके उपकार आहेत की कातड्याचे जोडे करून घातलेत तरी फिटणार नाही. असे गोड गोड वाक्य आई म्हणाली की पुष्पा वाट्टेल ते करायला तयार असायची. कित्येकदा आम्ही सगळ्या मैत्रिणींनी तिला समजावले आपलं नसतं ग कुणी! पण ह्या वेडीला कळतंच नव्हते."
आई आठवेल तसं भरल्या आभाळाने बरसाव तसं ओतत होती.....
"पुष्पाच्या भावाच्या मुलांची शिक्षणे, बहिणीच्या मुलीचे शिक्षण लग्न सारे पुष्पाच्या पैशावर निभावले. खरं सांगायचं तर दोन वेळची गिळायची सोयही पुष्पाच्या करत होती. पण त्या सगळ्यांत तिचे स्थान काय तर केरपोतेरे! भावजय तर परकिच होती ,तिला प्रेम वाटावे अशी अपेक्षाच नव्हती पण पाठच्या बहिणीनेही तिची किंमत केली नाही. मला आठवतं पुष्पा पहिल्यांदाच खूप सुरेख जरा भारीतली सिल्कची साडी घेऊन आली होती भाचीच्या लग्नात नेसायला....इतकी खुश होती ती तिचा तो आनंदी चेहरा आजही आठवतो मला... मात्र बहिणीने स्पष्ट शब्दांत "तुला काय करायची आहे इतकी भारी साडी ... तुला कोण पाहणार आहे." म्हणत भावजयीला टाळी देत दात काढले. ज्या भाचीच शिक्षण लग्न सारे पुष्पानी केले ... अगदी लग्नाच्या 3 तोळे सोन्याची सोयही कर्ज काढून पुष्पाने केली... त्या भाचीने पुष्पाला जोडीने नमस्कारही केला नाही. त्या दिवशी ती न जेवताच मांडवातून परतली हे कुणाच्याही गावी नव्हतं... माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडली... माझं कुणीही नाही ग मी एकटी पडलीये म्हणत तिचं ते कोसळणं .. मी पाहिलंय"
आईचे डोळे तिच्याही नकळत भरून आले... माझी आई अशी मुळूमुळू रडणारी मुळीच नव्हती.. माझ्याही नकळत माझे डोळे भरून आले... केव्हढी ही थट्टा... एका स्त्री च्या आयुष्यभराच्या त्यागाची! आई शांतपणे म्हणाली..
"एक स्त्री म्हणून आपण तिला समजून घ्यायला हवे ग!.... गेल्या वर्षी पुष्पाची आई गेली आणि मागच्या महिन्यात वडील वारले... भावाने राहते घर विकायला काढले. पुष्पाने पदोपदी हातपाया पडून विनवले की असे करू नका , माझ्या आयुष्यातले उरलेले दिवस येथे राहू द्या. आता रिटायर्डमेंट नंतर मी कुठे जाणार? भावजयीने ठणकावले... "तुम्ही तुमची सोय करायला हवी होती पुष्पाताई... भावाच्या घरात किती काळ राहणार आता एखाद्या महिला सदन ला तुमची सोय करा आणि निवांत आयुष्य काढा." बहिणीने तर मी बाई गरीब म्हणत हातच झटकले... वयाच्या साठीत बेघर होण्याची वेळ आली पुष्पावर."
"बापरे ! किती भयंकर आहे हे... "
मला कल्पनाच करवत नव्हती.
"ह्या काळात दिघे सरांनी तिला आधाराचा हात पुढे केला. दिघे सर स्वभावाने एकदम उमदा माणूस आठ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या पत्नीची मनोभावे सेवा केली.. अगदी शेवटपर्यंत. त्यांना एकच मुलगा तोही परदेशात कुठेतरी कायमचा सेटल झालेला... त्यांनी स्पष्टच पुष्पबाईंना माझ्या घरी रहाल का विचारले... सुरुवातीला दडपण होतं तिच्यावरही मग मात्र कुणाचीही भिड न बाळगता तयार झाली.... आता दोघेही एकमेकांच्या आधाराने आनंदात आहेत ... सरांची अजून काही वर्षे नोकरी बाकी आहे. दोघे मिळून गरीब गरजू मुलांच्या शिकवण्या घेतात... पुष्पाने तर त्या घराचं रूपच बदलून टाकलंय... सुरेख बाग लावलीये घराभवती... त्यात मस्त झोपाळा लावून घेतलाय हौसेने... दिघे सरही भला माणूस आहे... पुष्पाच्या हयातीत तिला त्यांच्या राहत्या घरातून कुणीही बाहेर काढू शकणार नाही अशी कागदोपत्री सोयच त्यांनी करून ठेवली आहे."
"एका विशिष्ट वयानंतर शारीरिक सुखाची ओढ नसते ग ! ओढ असते ती प्रेमाच्या दोन शब्दांची, मायेच्या आधाराची... ह्या नात्यातून दिघे सर आणि पुष्पा दोघांनाही आधार मिळतोय तर काय चुकीचे आहे सांग बरं ह्यात?? "
मनांत विचारांचा मोठा कालवा झाला होता... एक मात्र नक्की होतं पुष्पा मावशी असो किंवा दिघे सर ... प्रत्येकाला आनंदाने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्यात काही पाप नाही... कधीकधी समाजाच्या आखीव रेखीव चौकटी पल्याडही सोज्वळ नाते असू शकते...
पुढच्याच आठवड्यात काहीतरी कामानिमित्त आई गावी जायला निघाली... बरेच सामान तिकडून आणायचे असल्याने गाडी करूनच जाण्याचे ठरले... आई निघायच्या वेळेला मी धडकून काही रोपे गाडीत ठेऊन दिली... आईच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून मी म्हणाले...
"पुष्पा मावशीच्या बागेसाठी देतेय ग! तिकडे सोनचाफा मिळत नाही ना... आणि हा मोगरा तिला आवडतो म्हणून. तिच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा सांग माझ्याकडून...."
आई मान डोलावत प्रसन्न हसली.
"..... आणि हो ! तिला माझा निरोप सांग सगळी झाडं लाव म्हणा बागेत फक्त ते सतत दुसऱ्याच्या अंगणात फुले उधळणार परीजात तेव्हढं लावू नकोस."
आई मान डोलावत प्रसन्न हसली.
"..... आणि हो ! तिला माझा निरोप सांग सगळी झाडं लाव म्हणा बागेत फक्त तो सतत दुसऱ्याच्या अंगणात फुले उधळणारा कृतघ्न पारीजात तेव्हढा लावू नकोस."
©️🔏 यशश्री रहाळकर
Khup khup chan
उत्तर द्याहटवाKhup sunder likhan
सुरेख 👌
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाफारच सुरेख. एकदा त्याग करायचे व्यसन लागले की मग दुसरे काहीही सुचत नाही... हे फारच छान तऱ्हेने समजावून सांगितले आहे.
उत्तर द्याहटवा